छोरियां कम है के? क्रिकेटच्या नव्या अध्यायाचा आरंभ!
By Meghana.dhoke | Published: January 18, 2023 09:22 AM2023-01-18T09:22:14+5:302023-01-18T09:22:43+5:30
भारतीय महिला क्रिकेट आयपीएलच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहे. भारतीय क्रिकेटचं लोकशाहीकरण होण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
मेघना ढोके, संपादक, लोकमत सखी डिजिटल
भारतात केबल टीव्ही आणि सॅटेलाइट चॅनेल्स नुकतेच दाखल झाले होते. त्या जुन्या काळातली ही गोष्ट. १९९३ हिरो कप सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क तत्कालीन क्रिकेट अॅडव्हायजरी बोर्डानं स्टार टीव्ही या खासगी वाहिनीला दिले. देशात पहिल्यांदाच कुठल्याही खासगी वाहिनीला क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क मिळाले. त्याविरोधात दूरदर्शनने न्यायालयात दाद मागितली. मात्र १९९५मध्ये त्यासंदर्भात निकाल देताना न्यायालयानं स्पष्ट केलं की, क्रिकेट सामने दाखवण्याचा अधिकार फक्त सरकारी वाहिन्यांनाच असला पाहिजे असं काही नाही. हा निर्णय इतका पायाभूत ठरला की त्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघानं खेळलेला प्रत्येक सामना देशात घरोघर 'लाइव्ह' दिसू लागला. नव्यानं आलेल्या खासगी चॅनेल्सना क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क मिळू लागले आणि क्रिकेट बाजारपेठेशी जोडलं गेलं. आजच्या भाषेत सांगायचं तर क्रिकेट थेट 'कन्झ्युमर ड्रिव्हन' झालं. त्याच नव्वदच्या दशकात देशात मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी स्वागताचे गालिचे घातले गेले.
जागितिकीकरणाचं वारं देशात वाहू लागलं होतं. त्या वाऱ्यावर क्रिकेट स्वार झालं आणि क्रिकेटला एक 'हिरो' मिळाला, सचिन तेंडुलकर त्याचं नाव. मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा केवळ गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रिय 'ब्रॅण्ड' बनला. म्हणता म्हणता क्रिकेटच्या लोकप्रियतेची आणि आर्थिक उलाढालीची सारी परिभाषाच बदलून गेली.. सुमारे ३० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आता नव्या संदर्भात पाहण्याचे निमित्त म्हणजे देशात खेळवल्या जाणाऱ्या आता होऊ लागली आहे. महिलांच्या आयपीएल प्रसारणाचे हक्क 'वायकॉम १८' या कंपनीने विकत घेतले आहेत. ही कंपनी बीसीसीआयला ५ वर्षांसाठी ९५१ कोटी रुपये देणार आहे. कोट्यवधी रुपयांना थेट प्रक्षेपणाचे हक्क विकले गेले ही भारतीय महिला क्रिकेटसाठी जमेची बाजू आहे. कारण त्यामुळे आता पुरुष आयपीएलप्रमाणे महिला आयपीएलही घरोघर 'लाइव्ह' पाहायला मिळेल. 'क्रिकेट कन्झ्यूम' करण्याच्या नव्या काळात महिला क्रिकेट बाजारपेठेशी जोडले जाईल. मुळात भारतीय क्रिकेटची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे.
जागितिकीकरणाचं वारं देशात वाहू लागलं होतं. त्या वाऱ्यावर क्रिकेट स्वार झालं आणि क्रिकेटला एक 'हिरो' मिळाला, सचिन तेंडुलकर त्याचं नाव. मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा केवळ गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रिय 'ब्रॅण्ड' बनला. म्हणता म्हणता क्रिकेटच्या लोकप्रियतेची आणि आर्थिक उलाढालीची सारी परिभाषाच बदलून गेली.. सुमारे ३० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आता नव्या संदर्भात पाहण्याचे निमित्त म्हणजे देशात खेळवल्या जाणाऱ्या महिलांच्या आयपीएल प्रसारणाचे हक्क 'वायकॉम १८' या कंपनीने विकत घेतले आहेत. ही कंपनी बीसीसीआयला ५ वर्षांसाठी ९५१ कोटी रुपये देणार आहे. कोट्यवधी रुपयांना थेट प्रक्षेपणाचे हक्क विकले गेले ही भारतीय महिला क्रिकेटसाठी जमेची बाजू आहे. कारण त्यामुळे आता पुरुष आयपीएलप्रमाणे महिला आयपीएलही घरोघर 'लाइव्ह' पाहायला मिळेल. 'क्रिकेट कन्झ्यूम' करण्याच्या नव्या काळात महिला क्रिकेट बाजारपेठेशी जोडले जाईल. मुळात भारतीय क्रिकेटची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे.
दोन्ही अर्थानी पैसा म्हणून आणि स्वप्न म्हणूनही. आजही या देशात तरुण होणारी लक्षावधी मुलं क्रिकेटपटू होण्याची स्वप्नं पाहतात. आयपीएलने त्या स्वप्नांना घसघशीत आर्थिक मोबदल्याच्या शक्यतांचं खतपाणी घातलं. उदाहरणच सांगायचं तर २०२३ ते २०२७ या काळात पुरुष आयपीएलचे प्रक्षेपण अधिकार ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क निराळ्या कंपनीला आणि ओटीटीचे हक्क निराळ्या कंपन्यांना अशीही हक्कविक्री आता होऊ लागली आहे. त्या सर्व शक्यता आता महिला क्रिकेटच्या पुढ्यातही येऊन ठेपल्या आहेत. कुठलाही सामना प्रेक्षकांना घरात बसून थेट पाहता आला तर त्या खेळातले खेळाडू ओळखीचे होतात, थरार कळतो, हार-जीतीशी प्रेक्षक व्यक्तिगत पातळीवर जोडले जातात. आणि त्यासोबत येतो बाजारपेठेतला पैसा. दुसरीकडे संघात समावेश होण्याच्या खेळाडूंच्या शक्यता वाढतात आणि नवे खेळाडू घडावेत म्हणून काही पायाभूत सुविधा, पूरक सोयी उभ्या राहतात.
पुरुष क्रिकेटमध्ये जसा पैसा खळाळतांना दिसतो, तसा पैसा महिला क्रिकेटमध्ये दिसण्याच्या शक्यतांमुळेही मुलींनी क्रिकेट खेळावं म्हणून आईवडील आणि नातेवाईक त्यांच्या पाठीशी उभे राहतील 'मेरी छोरीया छोरोंसे कम है के असं आपला समाज आणि पालक तेव्हाच अभिमानानं सांगतात जेव्हा मुलीही नावलौकिक आणि पैसा कमवू लागतात. भारतीय महिला क्रिकेटच्या पाठीशी तर बीसीसीआयसारखी प्रचंड धनाढ्य संस्था उभी आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये बीसीसीआयचे मानद सचिव जय शहा यांनी भारतीय क्रिकेटसाठी समान वेतन धोरण जाहीर केलं. महिला क्रिकेटपटूंनाही पुरुष क्रिकेटपटूइतकंच वेतन मिळण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला; जो सर्वस्वी पथदर्शी आणि क्रांतिकारक आहे. त्यामुळेच आता भारतीय महिला क्रिकेटचं नव्या इनिंगसाठी सज्ज होणं हा भारतीय क्रिकेटचं लोकशाहीकरण होण्याचा दृष्टीने खऱ्या अर्थाने अधिक मोठा टप्पा ठरावा.