अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

By सुधीर लंके | Published: May 29, 2024 07:08 AM2024-05-29T07:08:23+5:302024-05-29T07:08:49+5:30

झाडांची साल सोलावी तसे काश्मीरमधले डोंगर खरवडलेले दिसतात. धुळीचे लोटच्या लोट सर्वांच्याच अंगावर येताहेत. विकासाच्या गर्दीत इथला स्वर्ग टिकेल का?

Special article on interpretation: Kashmir's heavenly beauty and the 'Balance' of development | अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

काश्मीरमध्ये फिरतानाचा ताजा अनुभव हल्ली हे सांगतो की, आता तिकडेही उन्हाळ्यात उकाडा जाणवतो. दुपारी उन्हाचे चटके बसतात. श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये फॅन, एसी चालवावा लागतो. प्रवासासाठी वातानुकूलित वाहन लागते. कारण रस्त्यांवरील धूळ आणि गर्मी नकोशी होते. बर्फाच्या नदीवर (ग्लेशियर) उभे असताना उबदार कपड्यांची गरज भासत नाही. थोडक्यात काश्मीरमधूनही थंडी पळाली आहे. 

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग संबोधले जाते. जम्मू-काश्मीर सरकारच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये २७ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. एकेकाळी दहशतवादी कारवायांनी पोखरलेल्या या भूमीत पर्यटक आता न डगमगता फिरू लागले आहेत. काश्मीरची जनता आणि पर्यटक यांच्यात एक नाते होतेच. ते नाते आता आणखी खुले व बिनधास्त झाले आहे. ३७० कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा होता. यात संरक्षण व इतर काही निर्णय वगळता त्या राज्यातील विकासाचे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकार तेथील सरकारच्या संमतीशिवाय घेऊ शकत नव्हते. आता ‘३७०’ हटले. त्याचे फायदे-तोटे व त्यामागील राजकारण काय, याची चर्चा भविष्यातही झडत राहील; पण ‘३७०’शिवाय काश्मीरसमोर मोठे सामाजिक व पर्यावरणीय धोके वाढून ठेवलेले असल्याचे तेथे फिरताना जाणवते. काश्मीरात २१ डिसेंबर ते २९ जानेवारी या कालावधीत हाडे गोठविणारी थंडी असते. कारण सर्वत्र बर्फ असतो. या कालावधीला तेेथे चिल्ला-ए-कलां म्हणतात; पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हल्ली डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान आढळते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

या तापमानामुळे या खोऱ्यातील हिमनद्यांचे साठे लवकर वितळतात. मैदानी प्रदेशांच्या तुलनेत येथील तापमानात १.२ अंशाने वाढ झाल्याचे अहवाल आहेत. याचे परिणाम तेथील केशरच्या उत्पादनापासून अनेक बाबींवर होत आहेत. उन्हाळा जाणवू लागला आहे. वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे हवेचे प्रदूषण आले आहे. जम्मू ते बारामुल्ला ही रेल्वेसेवा ऑगस्ट २०२३ ला खुली होणार होती; पण ती अद्याप सुरू नाही. त्यामुळे पर्यटक व लष्करी वाहनांच्या एनएच ४४ वर  अक्षरश: रांगा लागतात. जम्मू ते श्रीनगर हा चारपदरी रस्ता व श्रीनगरहून पुढे लडाखपर्यंतचा महामार्ग साकारण्यासाठी अनेक बोगदे खोदणे सुरू आहे. त्यासाठी काश्मिरी पहाडांचे अक्षरश: लचके तोडले गेले आहेत. झाडांची साल सोलावी तसे डोंगर खरवडलेले दिसतात. यातून भविष्यात लॅण्ड स्लाईडिंगचे मोठे धोके दिसतात. 

मोठमोठे डोंगर खोदल्याने धुळीचे लोटच्या लोट पर्यटकांच्या आणि तेथील गावांच्याही अंगावर येताहेत.  या महामार्गामुळे पूर्वीची डोंगराच्या कुशीतील छोटी नागमोडी वळणे व सभोवतालची गावे हे सौंदर्य संपले अन् निरस, धोपट निव्वळ रस्ता तो उरला. महामार्गाने गावेच गिळून टाकली. औद्योगिक युनिटसाठी ५ हजार ३२७ भूखंड मागणीचे प्रस्ताव या प्रदेशात आले आहेत. त्यामुळे काश्मीरने नैसर्गिकपणे जपलेल्या येथील भूखंडांचे काय होणार? हा गंभीर प्रश्न आहे.

ऊर्जानिर्मितीसाठी या खोऱ्यात मुबलक पाणी असताना काश्मिरात वीजटंचाई आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हाही प्रमुख मुद्दा होता. रोजगारासाठी पहाडांवर घोडे घेऊन पर्यटकांना फिरविणारे, स्लेज राइडसाठी पर्यटकांचे ओझे ओढत त्यांना बर्फील्या पहाडांवर नेणारे अनेक तरुण व बुजुर्ग येथे भेटतात. यातून या प्रदेशाची रोजगाराची गरज जाणवते. एकीकडे दऱ्याखोऱ्यांत फिरणारे मेंढपाळ काश्मिरी पहाडांवर लाकूड व मातीपासून बनविलेल्या नैसर्गिक घरांत राहतात. दुसरीकडे पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्याठी काँक्रीटच्या चारपदरी रस्त्यांची  धोरणे आहेत. एकीकडे चिनार. दुसरीकडे बोेगदे. ३७० पेक्षाही काश्मीरमधील हा झगडा मोठा वाटतो. निसर्ग आणि विकास, प्रदेशाची अस्मिता आणि राष्ट्रीय धोरणे असा हा झगडा आहे. काश्मीर स्वर्ग आहेच; पण विकासासाठीची नवी धोरणे तिथले स्वर्गीय सौंदर्य टिकू देतील का?

सुधीर लंके (sudhir.lanke@lokmat.com)

Web Title: Special article on interpretation: Kashmir's heavenly beauty and the 'Balance' of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.