अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 08:32 AM2024-05-30T08:32:22+5:302024-05-30T08:33:03+5:30

वाघ ही जंगलात जाऊन बघायची ‘गंमत’ नाही...त्यामुळे त्यासाठी वाट्टेल ते करायला सोकावलेल्या उद्धट माणसांनी जंगलापासून लांब राहावे, हे बरे!

Special Article on Jungle Safari including Tiger sight seeing | अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?

अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?

रमण कुलकर्णी, मानद वन्यजीव रक्षक, कोल्हापूर, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

विषय सुरू होतो वर्तमानपत्रातल्या एका बातमीनं. जंगलाच्या राजाला त्याला त्याच्या घरातच घेरणाऱ्या माणसांचा उच्छाद सांगणारी आणि थेट फोटोच दाखवणारी ती बातमी! वाघांना बघायला म्हणूनच केवळ जंगलात जाऊन त्यासाठी वाट्टेल ते करायला सोकावलेल्या माणसांचा हा उच्छाद काही नवा नव्हे. 

फूड पिरॅमिडचा म्हणजेच अन्न त्रिकोणाचा विचार केला तर सर्वांत अग्रस्थानी येतो तो वाघ. तो भारतातून नामशेष होण्यापासून वाचावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती झाली ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दूरदृष्टीतून. व्याघ्र प्रकल्पाचा सरळ साधा अर्थ आहे की, वाघ वाचवायचा असेल तर तृणभक्षी प्राणी वाचले पाहिजेत आणि ते वाचवायचे असतील तर त्यांचा अधिवास म्हणजेच वने त्यातील वनस्पती, गवताळ कुरणे यांचे संरक्षण, संवर्धन झाले पाहिजे. वाघ वाचला तर सर्व जैवविविधतेचे संरक्षण ओघानेच होणार हा त्यामागचा उद्देश. पण कालांतराने सर्व व्यवस्थापन व्याघ्रकेंद्री झाले. जेथे वाघ तेथेच जैवविविधता असा समज पसरवला गेला. तसेच वन्यजीव पर्यटन म्हणजे व्याघ्र दर्शन हे रूढ झाले. वन्यजीव छायाचित्रण म्हणजे वाघ असे समजून त्याच्या छायाचित्रणासाठी चढाओढ सुरू झाली.

१२-१५ वर्षांपूर्वी ‘वाघ दिसणे’ इतके सहजसाध्य नव्हते. पण वनविभागाचे योग्य नियोजन आणि संरक्षण, संवर्धन यातून वाघांची संख्या वाढली. पूर्वी फक्त ताडोबाच्या गाभा क्षेत्रातच दिसणारे वाघ आज बफर झोनसह चंद्रपूरच्या इतर संरक्षित क्षेत्रातही दिसू लागले आहेत. त्यात वेगवेगळे इव्हेंट आणि पर्यटन वाढीच्या नावाखाली वाघ केंद्रस्थानी आला, वन पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढले. 

वन्यजीव पर्यटनाचा केंद्रबिंदू  ठरला वाघ. देशी-विदेशी पर्यटक वाघ बघण्यासाठी गर्दी करू लागले. सोशल मीडियावर वाघांचे वेगवेगळ्या मुडमधले फोटो झळकू लागले आणि यातूनच वाघ्र पर्यटन नको तितके फोफावले. खरंतर महाराष्ट्र हे तसे विस्तीर्ण राज्य. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या प्रांतातल्या वनांचे प्रकार, पर्जन्यमान हे विभिन्न आहे पण वन विभागाचे व्यवस्थापन सर्व ठिकाणी एकसारखेच!  पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न आहे. पण इथल्या जैवविविधतेच्या संवर्धन, संरक्षणात अक्षम्य दुर्लक्ष झाले, का? - तर याठिकाणी व्याघ्र दर्शन नाही! व्याघ्र दर्शनासाठी विदर्भातील जंगलांवर पर्यटकांचा दबाव वाढला. वनस्पतींचे निरीक्षण करणे, त्या ओळखणे, त्यांचे महत्त्व समजून घेणे, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवणे यासारख्या आनंददायी तसेच संवर्धनात हातभार लावणाऱ्या उपक्रमांना म्हणावी तशी चालना देण्यात वनविभाग कमी पडला हेही खरेच!

वनांचे आणि वाघांचे संवर्धन करायचे असल्यास स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य अनिवार्य आहे. स्थानिकांना विविध योजना, पर्यटन यातून रोजगार मिळणे आवश्यक आहे. पण सर्वच ठिकाणी असे झाले नाही. जेथे वाघ तेथेच पर्यटन आणि जेथे पर्यटन तेथे रोजगार असा समज करून वन विभागाने आपले धोरण ठरवले आणि मग हवशानवशा पर्यटकांचा ओढा  व्याघ्र प्रकल्पांकडे वाढला. या उद्धट आणि बेशिस्त पर्यटकांमुळेच ताडोबातले स्थानिक गाइड आणि जिप्सीच्या वाहनचालकांना शिक्षा भोगावी लागली, हे दुर्दैवी आहे. वाघ दाखवलाच पाहिजे आणि तो पण जवळून या काही लोकांच्या हट्टापायी त्यांचा रोजगार हिरावला गेला! 

ताडोबा हे काही प्राणी संग्रहालय नाही. घरातले मांजरदेखील धोका वाटल्यास आक्रमक बनते. ‘माया’सारख्या शांत वाघिणीने देखील एका महिला वनरक्षकाचा बळी घेतला होता. इतक्या गाड्यांनी घेरलेल्या वाघाने जर एखाद्या गाडीवर हल्ला केला असता तर ? - मग त्या वाघाच्याच डोक्यावर नरभक्षक असल्याचा शिक्का मारला गेला असता. वन्य प्राणी आणि वने ही फक्त पर्यटनासाठी नसून या परिसंस्था आपल्या जगण्या-मरण्याचा अविभाज्य घटक आहेत. वनांमुळे शुद्ध हवा, पाणी, संसाधन मिळते आणि या वनांचा संरक्षणकर्ता  वाघ आहे. त्याचा आदर करा. निसर्गात वाघांबरोबरच इतरही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत. गंमत म्हणून वाघ ‘बघायला’ जाणाऱ्या पर्यटकांना आडकाठी करण्याची वेळ आली आहे.

-रमण कुलकर्णी (pugmarkartgallery@gmail.com)

Web Title: Special Article on Jungle Safari including Tiger sight seeing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.