‘तुम्ही’ कितीही काड्या लावा, ‘आम्ही’ पेटणार नाही... 

By अतुल कुलकर्णी | Published: May 7, 2022 06:13 AM2022-05-07T06:13:01+5:302022-05-07T06:13:42+5:30

राजकीय नेत्यांचे आग भडकावण्याचे प्रयत्न यावेळी सामान्य माणसांनी हाणून  पाडले. धार्मिक सलोखा बिघडला तर आपणच उघड्यावर येतो; हे लोकांना कळले आहे!

special article on loudspeakers politics behind that two religions leaving in good way came to know politics now | ‘तुम्ही’ कितीही काड्या लावा, ‘आम्ही’ पेटणार नाही... 

‘तुम्ही’ कितीही काड्या लावा, ‘आम्ही’ पेटणार नाही... 

googlenewsNext

अतुल कुलकर्णी,
संपादक, लोकमत, मुंबई

“आजवर झालेल्या दंगलींनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे. त्यावेळी झालेल्या जखमा, गमावलेली माणसं आम्ही आजही विसरलेलो नाही. तुमच्या राजकारणासाठी आमचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. कोरोनामुळे तसेही आम्ही प्रचंड अडचणीत आहोत. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करून आमच्या उरल्यासुरल्या धंद्यांवर पाणी फिरवू नका...” -  मुंबईतील एक व्यापारी गृहस्थ सांगत होते. नाव लिहीत नाही कारण लगेच जात-धर्माचे  हिशेब होणार! 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चाललेल्या गदारोळामुळे सामान्य माणूस उद्विग्न झाला आहे. याआधी  धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे आले, त्या त्या वेळी कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने दगडफेक, तणाव असे प्रकार सर्रास झाले.  ही पहिली वेळ होती ज्यावेळी अवघ्या महाराष्ट्रात  पक्षीय मतभेद झुगारून लोकांनीच धार्मिक सलोखा राखण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला.

औरंगाबाद शहरात हिंदू-मुस्लीम व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन गणपतीची आरती केली. रमजान ईद निमित्त एकमेकांना मिठाई भरवली. लाडसावंगी गावात हनुमान मंदिर कलश मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांनी पुष्पवृष्टी केली. सांगली जिल्ह्यात ब्राह्मण समाजाने काढलेल्या परशुराम जयंतीच्या मिरवणुकीवर आणि शिवसेनेने काढलेल्या मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मशिदीच्या मनोऱ्यावरून पुष्पवृष्टी करण्यात आली.  शिर्डीतील साई मंदिराचे ध्वनिक्षेपक सुरू करावे अशी मागणी शिर्डीतल्या मुस्लीम समाजाने केली. एका समाजाच्या मिरवणुकीत, दुसऱ्या समाजाने येऊन सरबते-पाण्याचे वाटप केले... या घटना टोकाच्या विखारी वातावरणात माणुसकीचा गहिवर दाखवणाऱ्या होत्या.

राज्यातील एकोपा आणि सामंजस्य टिकविण्याचे काम सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही दबावाला न घाबरता पुढे येऊन केले. ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नक्कीच नाही. तुम्ही आम्हाला एवढे गृहीत का धरता? यावरूनच लोकांमध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांबद्दल तीव्र संताप आहे. 

मुंबईत अत्तर विकणारा एक दुकानदार हताशपणे सांगत होता, माझ्या अत्तराचा सुगंध जात-धर्म बघून कमी-जास्त होत नाही. दोन्ही समाजाचे लोक माझे अत्तर नेतात. त्यांच्या आनंदामुळे माझा व्यवसाय एवढी वर्षे टिकून आहे. त्याला नजर लावण्याचा अधिकार या राजकीय नेत्यांना दिला कोणी..? याचे उत्तर आज तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. 

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा वाद  शिगेला पोहोचलेला असताना महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून, महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्च काढला. गांधीजींच्या पुतळ्यासमोर  ‘शेतकरी चालिसा’ वाचली. “राजकीय भोंगे बंद करायला सांगा आणि आमचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी द्या”, असे साकडे त्यांनी महात्मा गांधींना घातले. लोक मंदिरापुढे महाआरती करत आहेत, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती मंत्रालयाच्या दारासमोर उभे राहून म्हणत आहोत, असे  माजी आमदार विनायकराव पाटील उद्विग्नपणे म्हणाले, तेव्हा  त्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेण्यासाठी उभा असलेला पोलीसही चार पावले मागे सरकला...!

- ही साथ महाराष्ट्रभर पसरली तर याच राजकारण्यांची काय अवस्था होईल हा प्रश्न आज एकाही नेत्याच्या मेंदूला स्पर्श करताना दिसत नाही. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी धर्माच्या गोळीचा अचूक उपयोग होतो. हे वर्षानुवर्षे सिद्ध होत आले आहे. याच इतिहासातून माणसं बोध घेतात... चार हिताच्या गोष्टी शिकतात... हे गेल्या आठवडाभरातल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. लोकांना धार्मिक विद्वेष नको आहे. दंगली नको आहेत. त्यामुळे कसे नुकसान होते हे त्यांनी अनुभवलेले आहे. महागाईने कंबरडे मोडलेला मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस  चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, मुलाबाळांना बऱ्यापैकी शिक्षण मिळावे, कुठेतरी नोकरी मिळावी यासाठी जीवतोड मेहनत करत असतो.  धार्मिक तेढ निर्माण झाली तर आपल्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फिरणार आहे, हे तो अनुभवातून शिकला आहे.  त्यामुळेच इतकी माथी भडकाविण्याचे प्रयत्न झाले; पण लोक शांत राहिले. 

जे कोणी विद्वेषाचे राजकारण करू पाहत आहेत त्यांना ही मोठी शिकवण आहे. यातूनही कुणी बोध घ्यायला तयार नसतील, तर धर्माच्या नावावर राजकारण करू पाहणारे देश आज कुठे आहे..? याचा इतिहास  साक्षीला आहेच.

Web Title: special article on loudspeakers politics behind that two religions leaving in good way came to know politics now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.