अन्वयार्थ>> २०२४ : या नव्या वर्षात इतके झाले तरी पुरे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:48 AM2024-01-08T07:48:44+5:302024-01-08T07:52:08+5:30
नव्या वर्षात दिलासा देणाऱ्या, उत्साह वाढवणाऱ्या, महत्त्वाच्या काही बातम्या आपण सांगू, लिहू शकू का? त्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील!
-डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद
आणखी एक वर्ष संपले. त्याचा लेखाजोखा आता मांडावा काय? आपण काय मागे टाकले आहे याचा आढावा घटकाभर थांबून घ्यावा काय? यावर्षी आपण एकही युद्ध लढलो नाही, ही चांगली बातमी आहे काय? क्षमा करा; पण आपण १६०० लष्करी जवान गमावले आहेत. ते आपले भाऊ होते. आपल्याला सुखात राहता यावे म्हणून आपल्या सीमांचे रक्षण करत होते. रस्त्यावर जाणारे बळी किंवा आत्महत्या या सर्वाधिक बळी घेतात असे वाटेल, पण दहशतवाद्यांविरुद्ध कराव्या लागणाऱ्या कारवायांमध्ये सर्वांत जास्त बळी जातात हे आपल्याला ठाऊक आहे काय? अगदी दहाच दिवसांपूर्वी आपले चार जवान मरण पावले. त्यातला एक अवघ्या २८ वर्षांचा होता. घरी परत आल्यावर त्याचे लग्न होणार होते. दुसऱ्या एका मुलाची आई त्याची वाट पाहत होती. कुटुंबातला तो एकमेव मिळवता होता. महाराष्ट्रात सैनिकांच्या विधवांची संख्या सर्वांत जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अनपेक्षित हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. या सगळ्या कहाण्या वेदनादायी आहेत आणि त्याचा शेवट दृष्टिपथात येत नाही. तिरंग्यामध्ये गुंडाळलेले सैनिकांचे मृतदेह गावाकडे येणे सुरूच आहे. कधी कधी हे असहनीय होते.
ही झाली आपल्याकडची कहाणी. पण तिकडे युक्रेनमध्ये हजारो लोक मरण पावले. रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाचा धक्का ओसरत नाही तोच इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात संघर्ष उद्भवला. त्यातही हजारो लोक मरण पावले. मोठ्या संख्येने त्यात मुले होती. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे विकलांग झाली. मग ते त्यांचे व्यक्तिगत आयुष्य असो, रोजीरोटी किंवा सामाजिक जीवन, सगळे उद्ध्वस्त झाले.
आता या नव्या वर्षात तरी जरा दिलासा देणाऱ्या, उत्साह वाढवणाऱ्या, महत्त्वाच्या काही बातम्या आपण सांगू, लिहू शकू का? अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सापडलेल्या सैनिकांच्या विधवांना एक समाज म्हणून एकत्र येऊन आपण काही मदत करू शकू? समाज म्हणून आपण एकत्र निधी गोळा करू, देणग्या मिळवू किंवा त्यांचे आयुष्य पुन्हा उभे राहावे म्हणून अन्य कुठल्या प्रकारची मदत आपणहून करू?त्यांच्यासाठी आपण लोकनिधी जमवून देऊ शकतो का?
अगदी छोट्या प्रमाणावर समाजाच्या सर्वस्तरातून पैसे मिळवता येतील असे वाटते का? शेजारी तात्पुरते घर उपलब्ध करून देतील, स्थानिक दुकानदार कपडे, फर्निचर किंवा जीवनावश्यक वस्तू देतील, त्यांचे नवे घर उभे करायला स्वयंसेवक मदत करतील असे काही शक्य आहे? ऐक्य भावाने, दयाबुद्धीने आणि उदारपणे मदत केली गेली तर त्यांना प्रत्यक्ष आधार मिळेल आणि त्यांच्या लढ्यात ती कुटुंबे एकटी नाहीत हे त्यांना जाणवेल. ऐक्याची ताकद त्यातून अधोरेखित होईल. सहानुभाव जागेल आणि सर्वांच्या मनात एक आशेचा, मायेचा ओलावा पसरेल.
आपल्यापैकी प्रत्येकाकडे सांगण्यासाठी नव्या वर्षाची कहाणी असेल. त्यासाठी आपल्याला स्वप्नं पाहावी लागतील. माझी स्वप्ने करुणेवर उभी राहणारी आहेत. तुमच्या स्वप्नांचा आधार काय? ऐक्य आणि शाश्वत गोष्टींसाठी सामूहिक दृष्टी असलेले जग मी पाहतो. धावपळ चाललेल्या शहरात गगनचुंबी इमारतींच्या बाजूला मी निसर्ग फुलताना पाहतो. शिक्षण केवळ ज्ञानासाठी नको आहे, तर त्यातून सहानुभाव, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता निपजली पाहिजे. अत्याधुनिक औषधांच्या मदतीने आयुर्मान तर वाढले पाहिजेच, पण कुठल्या गोष्टीची कमतरताही भासता कामा नये. लोक अर्थपूर्ण कामात गुंतलेले असावेत. पारदर्शक सरकारचे स्वप्न मी पाहतो. जे सर्वांना बरोबर घेईल, जबाबदारीने वागेल. निर्णय प्रक्रियेत विविध मतांचा आदर होईल.
संवाद आणि राजनीतीतून सर्व वाद सोडवले जात आहेत आणि आक्रमणाची जागा सामंजस्याने घेतली आहे असे स्वप्न मी पाहतो. देशात अब्जाधीशांबद्दल चर्चा होण्याऐवजी गरिबी दूर होत आहे असे चित्र मला दिसते.