भारतातील कम्युनिस्ट चळवळीची शंभर वर्षे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:34 IST2024-12-26T08:49:36+5:302024-12-26T09:34:25+5:30

कष्टकरी समूहाच्या भल्यासाठी आणि खऱ्या जनस्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारा कम्युनिस्ट विचार बळकट होणे लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्त्वाचे आहे!

Special article on One hundred years of the communist movement in India | भारतातील कम्युनिस्ट चळवळीची शंभर वर्षे !

भारतातील कम्युनिस्ट चळवळीची शंभर वर्षे !

डॉ. भालचंद्र कानगो
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते

दिनांक २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूर येथे 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'ची स्थापना झाली. 'आयटक' या पहिल्या कामगार संघटनेची स्थापना मुंबई येथे ३१ ऑक्टोबर १९२० रोजी झाली होती. जागतिक पातळीवर नवीन कामगार व त्यांची संघटित शक्ती उभी राहात होती. १९१७ च्या सोव्हिएत क्रांतीनंतर १९१८ साली आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची (आय.एल.ओ.) ची स्थापना झाली होती. पहिल्या महायुद्धानंतर राजेशाही व साम्राज्यशाही विरोधी असंतोष व मानवी हक्कांची जाणीव जगभरात वाढली व त्यातूनच अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्या. भारतातही कलकत्ता, लाहोर, लखनौ, मुंबई, मद्रास वगैरे भागांतून कार्यरत असणाऱ्या कामगार चळवळीतील पुढारी एकत्र आले. त्यांनी एकीकडे काँग्रेस अंतर्गत राहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी रेटली व दुसरीकडे स्वतंत्र भारतात कष्टकरी जनतेचा हक्क, न्याय व समता यांना पुढे नेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.

१९२० नंतर काँग्रेस अंतर्गत प्रस्थापित वर्ग व उच्चवर्णीयांचे वर्चस्व झुगारून म. गांधींच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचा आवाज वाढला व असंख्य बहुजनांतील जनता स्वातंत्र्यलढ्याशी जोडली गेली. एकीकडे या जन उठावाचा परिणाम म्हणून कम्युनिस्ट पक्षाची निर्मिती तर दुसरीकडे प्रस्थापित, जुने हितसंबंध धोक्यात आले म्हणून त्यांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाही त्याचवर्षी झाली.

संघाने स्वातंत्र्य चळवळीपासून स्वतःला लांब ठेवले तर कम्युनिस्टांनी त्या चळवळीत स्वतःला व संघटनेला झोकून दिले. ब्रिटिशांनी दडपशाही करून कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली व पेशावर खटला, कानपूर खटला व मिरत खटला दाखल करून कम्युनिस्ट पक्षाच्या बहुतेक नेत्यांना कारागृहात अडकवले. कम्युनिस्ट आंदोलनामुळे कामगार, शेतकरी, आदिवासी व कष्टकरी समूह स्वातंत्र्यलढ्याशी जोडला गेला. कम्युनिस्ट आंदोलनामुळे संस्थानिक, जमीनदारांच्या विरोधातील चळवळी वाढल्या, लोकशाही हक्क जाणिवा वाढल्या. या वातावरणामुळे समाजवाद व धर्मनिरपेक्षता ही नवी तत्त्वे पुढे नेण्यासाठी बळ मिळाले.

कम्युनिस्ट आंदोलनाने १९३५ साली अखिल भारतीय किसान सभा आणि एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. शेतकरी व विद्यार्थी स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले.

त्याचप्रमाणे इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) व प्रगतिशील लेखक संघटना (पीडब्ल्यूए) ची स्थापना करून लेखक, कवी, कलाकार यांच्यामार्फत प्रागतिक विचार आणि मूल्यांचा प्रचार-प्रसार केला. १९४४ साली बंगालच्या भीषण दुष्काळात जनतेला साह्य करण्यात चळवळीने मोठी भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर १९५२ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणून कम्युनिस्ट पक्षाने स्थान मिळवले. ते १९७१ पर्यंत कायम होते. १९५६ मध्ये केरळ प्रांतात पक्ष सत्तेवर आला व १९५८ च्या अमृतसर काँग्रेसमध्ये पक्षाने लोकशाही पद्धतीनेच या देशात क्रांती होईल व राज्य करावे लागेल, याची खात्री दिली.

कम्युनिस्टांना लोकशाही विरोधक ठरविण्याचे षड्यंत्र प्रस्थापित सत्ताधारी वर्ग सातत्याने करत असतो व त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वैशिष्ट जनतेसमोर येऊ नये म्हणून पद्धतशीररीत्या प्रचारही केला जातो. साम्राज्यवादाला विरोध हे वैशिष्ट असल्यामुळेच पोर्तुगीजांविरुद्ध 'गोवा मुक्तिसंग्राम' व फ्रेंचांविरुद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामात कम्युनिस्टांनी पुढारीपण शिवाय जमीनदारी व राजेशाहीविरुद्धही केलेच; लोकचळवळी उभारल्या.

भारतीय संघराज्य मजबूत करण्यात भाषावार प्रांतरचना महत्त्वाची ठरली. त्यासाठी कम्युनिस्टांनी पुढाकार घेतला. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी कॉ. डांगे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दिलेला लढा व योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतरही कर्मवीर दादासाहेब गायकवाड व क्रांतिवीर नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमीनमुक्तीचा लढा लढण्यात पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली.

स्थापनेचे शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना कम्युनिस्ट पक्ष व चळवळीसमोर नवीन आव्हाने उभी राहात आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी मजबूत संघटन व परिस्थितीचे नव्याने आकलन करून पुढे जाण्याची गरज आहे. हे ओळखून पक्षाने भारतीय राज्यघटनेची मूल्ये जपण्यासाठी व्यापक एकजूट उभारून पुढे जाण्याचे ठरवले आहे. स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्यायासाठी जात व वर्ग संघर्षाची सांगड घालणे, पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत विकासाची कास धरणे, लोकशाही संवर्धनासाठी उजव्या शक्तीचा मुकाबला करणे हे यापुढच्या वाटचालीचे मुख्य सूत्र असेल! कष्टकरी समूहाच्या भल्यासाठी व खऱ्या जनस्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारा हा विचार अबाधित राहो, ही शुभेच्छा!

Web Title: Special article on One hundred years of the communist movement in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.