चराचरांतील पांडुरंगाची प्रचिती घेणारी अमेरिकेतील वारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 08:25 AM2024-07-17T08:25:37+5:302024-07-17T08:26:24+5:30
अमेरिकेत अनेक शहरांत वारकरी जोडले गेले आहेत. पंढरपूर यात्रा काळात हे वारकरी आपापल्या शहरात विठुनामाच्या गजरात रोज पाच मैल चालतात!
प्राजक्ता पाडगावकर, अटलांटास्थित वारकरी
पांडुरंग चराचरांत आहे, झाडात, पाना-फुलांत आहे हा दृढ विश्वास मनात ठेवून गेली चार वर्षे महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर निसर्गवारी सुरू आहे। कोविड काळात महाराष्ट्रात वारकरी चालू शकत नव्हते, तेव्हा तो वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू झाला। दूरदेशी वसलेल्या, विठ्ठलभक्तांसाठी ही पर्वणी ठरली. अमेरिकेत अटलांटा येथे निसर्गवारी सुरू केल्यानंतर तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी जवळजवळ १५० वारकरी मिळून एका महिन्यात १०,००० मैल इतके अंतर चालले. आता यात अमेरिकेतील इतर अनेक शहरांतून वारकरी जोडले गेले आहेत. कॅन्सस सिटी, शार्लेट, वे एरिया, युटाह आणि अमेरिकेबाहेर लंडन, बर्लिन इथूनदेखील मंडळी चालतात. हळूहळू हा उपक्रम अनेक शहरांत रुजू लागला आहे।
मूळ वारीच्या संकल्पनेपेक्षा ही थोडी निराळी वारी आहे. देहू ते पंढरपूर हे अंतर साधारण १५५ मैल इतके असून, वारकरी हे अंतर २१ दिवसांत पूर्ण करतात. इथे अमेरिकेत आणि इतरत्र हे अंतर एका महिन्यात पूर्ण करतात.
स्वतःच्या घरापाशी अथवा कुठेही दररोज साधारण पाच मैल इतके चालून, त्याची एका सामूहिक गुगल स्प्रेडशीटवर रोज नोंद ठेवली जाते. तसेच रोज प्रत्येक वारकऱ्याला ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे एक निरूपण, एक अभंग पाठवला जातो. पाच मैल चालायला साधारण एक तास चाळीस मिनिटे लागतात. तेवढ्या वेळेची अभंगांची प्लेलिस्ट जिओ सावन आणि स्पोटिफायवरून वारकऱ्यांना पाठवली जाते, जेणेकरून एकटे चालतानादेखील कानात विठुनामाचा गजर सुरू राहील. प्रत्येक शहराच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारा वारकरी जोडले जातात.
निसर्गवारीचा उद्देश पंढरपूर गाठणे नसून, चराचरांत पांडुरंगाची प्रचिती घेत राहणे, निसर्गाशी तादात्म्य राखणे असा आहे। त्या अनुषंगाने वारकरी रोज चालताना एखादा सुंदर सूर्योदय, सूर्यास्त कॅमेऱ्यात बंदिस्त करतात, तर कधी एखादा सुंदर सूर्योदय, सूर्यास्त कॅमेऱ्यात बंदिस्त करतात, तर कधी एखादा पक्षी, हरिण किंवा झाड! कुठेही जिथे निसर्गातील किमया बघून मनात आनंद, कुतूहल अथवा कृतज्ञता दाटून आली, तोच क्षण पांडुरंगाचा, त्याच्या प्रचितीचा असे आम्ही सर्व निसर्ग वारकरी मानतो!
चालण्याचा उद्देश वजन घटवणे, व्यायाम करणे, कोणत्याही धाकाने अथवा भीतीने चालणे असा नसून, निसर्गाकडे कृतकृत्य होऊन बघणे, आपण निसर्गाचा एक घटक आहोत अशा भावनेने निसर्गात वावरणे, त्यातील दैवी शक्तीची अनुभूती घेणे, निसर्गाला शरण जाणे हा हेतू आहे. दरवर्षी अनेक वारकरी इथल्या बागा, जंगलं, अभयारण्ये आणि नॅशनल पार्कस् येथे चालतात, सभोवतालच्या निसर्गात स्वतःला पूर्णपणे सामावून घेतातः निसर्गात रमतात!
वारीच्या शेवटच्या दिवशी, आषाढी एकादशीला सगळे मिळून एक मैल एकत्रित चालताना मात्र अगदी मूळ वारीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, मंडळी पारंपरिक वेशांत, डोक्यावर पांडुरंगाची मूर्ती घेऊन, तुळशी घेऊन चालतात, विठुनामाचा गजर करत, टाळ चिपळ्यांच्या ठेक्यावर नाचत तल्लीन होतात। मग स्थानिक झाडांची निवड करून वृक्षारोपण करतात, जेणेकरून सर्वांना पांडुरंग येणारी अनेक वर्षे निसर्गात भेटू शकेल! दरवर्षी नवीन कलाकार स्वतःची कला सादर करत, भजन, अभंग सादर करतात आणि संपूर्ण परिसर विठ्ठलमय होऊन जातो। अगदी काही महिन्याचे तान्हे बाळ आणि त्याला बावागाडीतून घेऊन निसर्गात चालणारी त्याची आई, ते पार नव्वदी गाठलेले आजोबा-आजी असे सगळेच वारीत सामील होतात!
पाऊस अथवा वादळ असेल तेव्हा अनेक जण घरातल्या घरातही चालतात। सातत्य आणि भक्ती महत्त्वाची! यात कोणत्याही कर्मकांडाचा अंतर्भाव नाही, त्यामुळे वारीची लहानपणीची आठवण असलेली इतर धर्माची, भाषेची माणसेही या वारीत सामील होतात. अशी ही अनोखी निसर्गवारी, दूरदेशी असलेल्या विठ्ठलभक्तांना या अनोख्या सोहळ्यात समाविष्ट करून घेते!