नरेंद्रभाई आणि लतादीदी : सुमधुर बंधाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:52 AM2024-09-28T06:52:25+5:302024-09-28T06:54:39+5:30

चाळीस वर्षांहून अधिक काळ रूजलेले या दोघांमधले स्नेहाचे नाते परस्परांबाबत आदर, देशाबद्दलचे अपरंपार प्रेम आणि कौटुंबिक जिव्हाळ्याने विणलेले होते.

Special article on PM Narendra Modi love and respect for Lata Mangeshkar remains | नरेंद्रभाई आणि लतादीदी : सुमधुर बंधाची कहाणी

नरेंद्रभाई आणि लतादीदी : सुमधुर बंधाची कहाणी

हृदयना‌थ मंगेशकर
ख्यातनाम संगीतकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझी बहीण लता मंगेशकर यांच्यामधले नाते एकमेकांबद्दलच्या आदराच्याही पलीकडचे होते. चाळीस वर्षांहून अधिक काळ रूजलेले हे नाते परस्परांबाबत आदर, आपल्या देशाबद्दलचे सामायिक प्रेम आणि कुटुंबासारखे बंध यांनी विणलेले होते. माझ्या बहिणी आशाताई, उषाताई, मीनाताई आणि कुटुंबातील इतरांसह आम्ही सगळे याचे साक्षीदार आहोत. दीदी त्यांना प्रेमाने नरेंद्रभाई म्हणत असे. त्यांच्यासाठी दरवर्षी राखी पाठवत असे आणि ते नेहमी दूरध्वनी अथवा पत्राच्या माध्यमातून तिला प्रतिसाद देत असत. ‘आमची आई गुजराती होती’ याची आठवण दीदी नेहमी नरेंद्रभाईंना करून देत असे आणि त्यांच्यासाठी गुजराती पदार्थ हटकून घरात रांधले जात.

सप्टेंबर २०१९ मध्ये, दीदीच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या वेळी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर होते. विमानात चढण्यापूर्वी, त्यांनी वेळात वेळ काढून तिला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. उत्तरादाखल दीदी म्हणाली, ‘प्रणाम, नरेंद्रभाई!’ त्यावर पंतप्रधान मोदी उस्फूर्तपणे म्हणाले, ‘दीदी, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात. मी तुमचे आशीर्वाद मागायला हवेत.’ त्यावर दीदी त्यांच्या प्रेमळ स्वभावानुसार म्हणाल्या, ‘व्यक्तीची महानता त्याच्या कृतीतून प्रतीत होते. वयाने नव्हे!’ या दूरध्वनी संभाषणादरम्यान दोघेही भावुक झाले होते. त्याच महिन्यात मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ संभाषणात दीदींना दिलेल्या शुभेच्छा आणि त्यांच्या दूरध्वनी संभाषणाचे ध्वनिमुद्रण प्रसारित करत लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी दीदी आणि उषाताई यांना प्रतिष्ठेचा ‘ताना रीरी’ पुरस्कार प्रदान केला. २०१० मध्ये त्यांच्या जन्मगावी वडनगर इथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. दीदी प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकली नाही, पण उषाताई मात्र अगदी आवर्जून गेली होती. दीदीला गुडघेदुखीचा त्रास आहे, हे समजल्यानंतर मोदींनी गुजरातमधून तज्ज्ञ डॉक्टरांना तिच्या तपासणीसाठी पाठवले होते. काही वर्षांपूर्वी मोदींच्या आईचे फोटो आणि व्हिडीओ पाहून दीदी भावुक झाली आणि त्यांना भेटावेसे तिला वाटत राहिले. वयामुळे तिला स्वतःला ते शक्य नव्हते, पण तिच्या वतीने हिराबा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी कोणाला तरी पाठविले. 

२०१३ मध्ये दीदीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नरेंद्रभाईंना निमंत्रित केले, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दीदीने या समारंभासाठी मोदींना बोलावणे अनेकांना रूचले नाही. मात्र,  आपण काय करतो, याबद्दल दीदीला नेहमीच खात्री असायची. ‘भारताला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे’, असे तिने मंचावरून जाहीर केले, जे नंतर सत्यात उतरले आणि तिला खूप आनंद झाला.

दीदीला अखेरचा निरोप देण्यासाठीही पंतप्रधान मोदी मुंबईत आले. त्यांनी आमच्या कुटुंबाला वेळ दिला आणि सर्वांचे सांत्वन केले. काशी येथे दीदीचे अस्थिविसर्जन करतानाही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले.

दीदी प्रभू श्रीरामाची परमभक्त होती. तिच्या स्मरणार्थ अयोध्येत काहीतरी हवे, असे आमच्या कुटुंबाला नेहमी वाटत असे. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत ‘लता मंगेशकर चौक’ निर्माण करून तिथे साजेसे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पावर वैयक्तिकरीत्या लक्ष ठेवत त्यांनी तिच्या मृत्युसमयी असलेल्या वयाचे प्रतीक म्हणून एका वीणेभोवती ९२ कमळांची रचना करून ते परिपूर्ण असल्याची खात्री केली. दीदीची प्रभू श्रीरामावरची  भक्ती आणि तिच्या सांगीतिक वारशाच्या गौरवार्थ या स्मारकात राम धूनचे सादरीकरण देखील केले जाते.

पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. व्यस्त वेळापत्रक असूनही, त्यासाठी ते आवर्जून आले. कार्यक्रमानंतर त्यांनी  आदिनाथला बोलावून त्याची पत्नी कृष्णाविषयी विचारले. ती मागे बसली आहे हे समजल्यावर, अलीकडेच निधन झालेल्या तिच्या भावाबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी तिची भेटही घेतली. आमच्या कुटुंबाबद्दल त्यांना  जिव्हाळा आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल आणि देशात ते करत असलेल्या सकारात्मक बदलांबद्दल दीदी नेहमीच कौतुकाने बोलत असे. आज, त्यांना लाभलेले जागतिक नेतेपद आणि विकसित राष्ट्र बनण्याची आकांक्षा बाळगून मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने केलेली उल्लेखनीय प्रगती  पाहून दीदीला सर्वाधिक आनंद झाला असता.

दीदीला आपल्यातून जाऊन दोन वर्षे उलटली, तरी नरेंद्र मोदींचा आमच्या कुटुंबाप्रति असलेला स्नेह आणि आदर कायम आहे. जेव्हा कधी आम्ही त्यांच्याशी बोलतो, तेव्हा ते दीदीच्या आठवणी सांगत आपल्या भावना व्यक्त करतात. पंतप्रधान मोदींकडून व्यक्त होणारा हा अखंडित आदर लता मंगेशकर यांच्या वारशाचा सर्वात मोठा सन्मान आहे.
 

Web Title: Special article on PM Narendra Modi love and respect for Lata Mangeshkar remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.