इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न

By विजय दर्डा | Published: September 26, 2022 09:28 AM2022-09-26T09:28:29+5:302022-09-26T09:28:58+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांबरोबर संवादाचे नवे पर्व सुरू केले आहे. बोलण्या-चालण्यातूनच गाठी सुटतात, हे विसरता कामा नये!

special article on rss chief mohan bhagvat met muslim leaders all india muslim imaam organization | इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न

इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न

Next

विजय दर्डा,
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

दिल्लीच्या झंडेवाला भागात गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी काही प्रमुख मुस्लिम बुद्धिवंतांबरोबर संवाद साधला. हे घडले, तेव्हा कोणालाही त्याची खबर लागली नव्हती. त्या संवादात पूर्व मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलपती आणि निवृत्त अधिकारी जमीरुद्दीन शाह, माजी खासदार तथा पत्रकार शाहीद सिद्दिकी आणि उद्योगपती सईद शेरवानी उपस्थित होते. जवळपास महिन्यानंतर या बैठकीची बातमी माध्यमांमध्ये आली. त्याच दिवशी  मोहन भागवतजी कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीत पोहोचले. ऑल इंडिया मुस्लिम इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलीयासी यांच्या निमंत्रणावरून ते तेथे गेले होते. सुमारे ४० मिनिटे दोघांमध्ये बोलणे झाले. संघप्रमुख त्यानंतर तजवीदुल कुराण मदरशामध्ये गेले.

तिथल्या मुलांशी ते बोलले. इमाम इलीयासी यांनी संघप्रमुखांना राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी संबोधले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या; परंतु नंतर त्यांनी असा खुलासा केला की, मी जे बोललो ते लोकांच्या लक्षात आलेले नाही! त्यानंतर भागवतजी विनम्रतापूर्वक म्हणाले, आपण सर्वजण या राष्ट्राची मुले आहोत! भागवतजी स्वभावत:च प्रागतिक विचारांचे आहेत. संघाच्या कार्यपद्धतीत त्यांनी अनेक बदल घडवून आणले आहेत. झाल्या घटनेने राजकारण तापणारच होते; तसेच झाले. कोणी म्हटले, संघाला आताच मुस्लिमांची आठवण का झाली? मुस्लिमांमधला एक वर्ग इमाम इलीयासी यांच्यावर नाराज झाला.

कोणत्याही मशिदीत पाऊल ठेवणारे किंवा मदरशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलणारे मोहनराव भागवत हे पहिले संघ प्रमुख असले, तरी संघ  खूप आधीपासून मुस्लिमांबरोबर गाठीभेटी, संवाद करत आला आहे. के. एस. सुदर्शन यांच्या काळापासून ही  संवादाची प्रक्रिया सुरू झाली. २००४ मध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये एक बैठकही झाली होती. जमाते उलेमा हिंद या संघटनेशी संघ निरंतर संवाद साधत आला आहे. २०१९ मध्ये मौलाना अर्शद मदनी आणि मोहन भागवत यांची भेट झाली होती.  सुमारे दोन दशके आधी संघाने राष्ट्रीय मुस्लिम मंच नावाच्या एका संस्थेचीही स्थापना केली होती. इंद्रेश कुमार हे या संस्थेचे मार्गदर्शक! सरसंघचालकांची मुस्लिम बुद्धिमंतांबरोबरची बैठक आणि  मशीद-मदरशाला भेटीच्या नियोजनात इंद्रेश कुमार यांचाही सहभाग आहे.

माझा लोकशाही परंपरेवर ठाम विश्वास आहे. दोन टोकांवर उभ्या असलेल्या दोन समुदायांच्या मध्ये  समग्रतेने भातृभाव साधण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर त्याचे नक्कीच स्वागत केले पाहिजे. देशात सध्या उग्रवाद हत्यारासारखा वापरणारे लोक दोन्ही बाजूला आहेत हे लपविण्यात अर्थ नाही. त्यामुळे संवाद संपतो आणि दोन्ही बाजूस अविश्वासाची दरी खोल होत जाते.  ती दरी कमी करायची असेल तर एकमेकांना समजून घेणे हाच मार्ग उरतो. त्यासाठी गाठीभेटी, मुलाखती यांची आवश्यकता असते. जोवर आपण परस्परांना समजून घेणार नाही, एकमेकांच्या मनात बसलेल्या गाठी उकलण्याचा प्रयत्न करणार नाही, तोवर समस्येचे निदान होऊ शकणार नाही. हा देश जितका हिंदूंचा आहे, तितकाच मुसलमानांचा, शीख, जैन, बौद्ध आणि पारश्यांचा आहे किंवा अन्य विचार मानणाऱ्यांचा आहे याचा इन्कार कोण करू शकेल? आपल्याला सगळ्यांना एकत्र राहावयाचे आहे. विचारांमध्ये भिन्नता असेल; ती असलीही पाहिजे; पण मनभेद मात्र असता कामा नये. आज मनभेदाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

सामान्य माणसाला त्या मनभेदाचा त्रास होतो, बुद्धिवंतांनाही त्याबाबत सतत चिंता वाटत असते.  इमाम इलीयासी यांचे निमंत्रण स्वीकारून आणि मशिदीमध्ये जाऊन भागवतजींनी एक सौहार्दपूर्ण संदेश दिला आहे. जो तपशील उघड झाला, त्यानुसार  संघप्रमुखांनी मुस्लिम बुद्धिजीवींच्या बैठकीत विचारले की, गोहत्या आणि काफीर या शब्दाच्या बाबतीत आपले काय मत आहे? मुस्लिम प्रतिनिधी म्हणाले, कोणताही समजदार मुस्लिम माणूस कोणत्याही हिंदूबद्दल कधीही काफीर शब्दाचा उपयोग करत नाही. गोहत्येबाबत चर्चा झाली तेव्हा त्यांनी संघप्रमुखांना याची आठवण करून दिली की, अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी हिंदूंच्या भावनेचा आदर राखत विद्यापीठाच्या परिसरात गोमांसावर प्रतिबंध लावले होते. ज्यावर चर्चा होऊ शकत नाही असा एकही मुद्दा नसल्याचे या मुस्लिम बुद्धिजीवींचे मत होते. श्रीमती इंदिरा गांधी मुस्लिमांना सतत झुकते माप देतात, असा आरोप त्यांच्यावर होत असे; पण वास्तव वेगळे होते. बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे, आदींशी इंदिराजींचा सौहार्दाचा संपर्क होता.

भागवतजींनी परस्पर संवाद प्रक्रियेला गती दिली आहे. त्याचा काही शांततापूर्ण परिणाम होईल, अशी आशा ठेवायला जागा आहे.  परंतु, त्यासाठी अतिरेकी विचारांवर लगाम लागला पाहिजे. जग  अशांत आहेच, आपल्याही घराला ती धग का लागावी? मोहनजी भागवत यांच्याच शब्दांत विचारायचे, तर प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे? आणि मुस्लिम संघटनांनाही असा विचार करावा लागेल की, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईच्या विरोधात जे रस्त्यावर उतरतात, त्यांचा निषेध का होत नाही? टाळी दोन्ही हातांनी वाजते. एका हाताने केवळ थप्पड मारता येते. इमाम आणि पंडित एक झाले तर देश मजबूत होईल या इमाम उमर इलीयासी यांच्या म्हणण्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.

vijaydarda@lokmat.com

Web Title: special article on rss chief mohan bhagvat met muslim leaders all india muslim imaam organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.