भाजपच्या सुटकेचा ‘भागवत मार्ग’! पुन्हा एकदा ‘सबका साथ सबका विकास’ हेच असणार लक्ष्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:43 IST2025-01-09T11:42:22+5:302025-01-09T11:43:05+5:30

खरे तर मोहन भागवत भाजपला सुटकेचा मार्ग मिळवून देत आहेत.

Special article on RSS Chief Mohan Bhagwat Advice on Hindu Muslim unity | भाजपच्या सुटकेचा ‘भागवत मार्ग’! पुन्हा एकदा ‘सबका साथ सबका विकास’ हेच असणार लक्ष्य?

भाजपच्या सुटकेचा ‘भागवत मार्ग’! पुन्हा एकदा ‘सबका साथ सबका विकास’ हेच असणार लक्ष्य?

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद विषयावर केलेल्या विधानामुळे संघ परिवारातील काही कट्टर मंडळींसह साधुजन कदाचित अस्वस्थ झाले असतील. काही दिवसांपूर्वी भागवत म्हणाले होते, ‘प्रत्येक दिवशी नवा वाद उकरून काढला जात असेल, तर ते कसे चालेल?’ अलीकडच्या काळात मंदिरे शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण करण्याच्या अनेक मागण्या कोर्टात केल्या गेल्या आहेत.’ ‘असे प्रश्न उचलून धरल्याने आपण हिंदू समुदायाचे नेते होऊ असे काही लोकांना वाटू लागले आहे’, अशी पुस्तीही भागवत यांनी जोडली होती. त्यांनी आपल्या भाषणात कोणाचे नाव घेतले नसले, तरी देशभर पडसाद उमटले.  भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने अद्यापपावेतो यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. २०१७ साली संघाच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी आलेले योगी आदित्यनाथही काही बोलले नाहीत.  उत्तर प्रदेशात जवळपास प्रत्येक दिवशी नवा मंदिर-मशीद वाद उपस्थित होत आहे.

भाजपचे राजकीय बळ कमी होईल या भीतीने धार्मिक भावना शांत करण्यासाठी भागवत यांनी हे वक्तव्य केले, असे संघातील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर खुले करूनही भाजपला २४० जागा कशाबशा मिळाल्या याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर भागवत पक्षाला सुटकेचा मार्ग मिळवून देत आहेत आणि ‘सबका साथ सबका विकास’ यावर लक्ष केंद्रित करायला सांगत आहेत. २०१४ आणि २०१९ साली या घोषणेने पक्षाला भरघोस मते मिळवून दिली होती. भाजपच्या मित्रपक्षांनाही भागवतांच्या वक्तव्यामुळे योग्य तो संदेश जाईल. भारताने विश्वगुरू व्हावे यासाठी भागवतांनी असे वक्तव्य केले असा नवा आयाम या विषयाला ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या साप्ताहिकाने जोडला आहे.

मोदींचे मित्र पक्षांकडे लक्ष 

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मित्रपक्षांशी सुमधुर संबंध राखत असतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आपण ‘धाकटे भाऊ’ आहोत अशी भावना ते कोणात निर्माण होऊ देत नाहीत. मित्रपक्षांशी संबंधित विषयात ते रोजच्या रोज लक्ष घालत नाहीत. ते सगळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे पाहत असतात. कधी कधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचीही मदत घेतली जाते. अलीकडे त्यांच्या कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी वारंवार भेटी झाल्या. परंतु, यातून काय निष्पन्न झाले हे अद्याप बाहेर आलेले नाही. 
आघाडीतील नेत्यांना मोदी एकेक करून भेटत असून, त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. अलीकडच्या काळात सरकारमध्ये काही पदांवर नेमणुका झाल्या. त्यातल्या काही आघाडीतील पक्षांच्या शिफारशींवरून झाल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. २००६ साली ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. पुढे सर्वोच्च न्यायालयात आले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव या पदासाठी घेतले जात होते. परंतु, प्रत्यक्षात रामसुब्रमण्यम अध्यक्ष झाले. रालोआतील घटक पक्षांचा या नेमणुकीशी संबंध असल्याचे बोलले जाते. आंध्रचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे म्हणणेही मोदी ऐकून घेतात. 

अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी यांच्यात सौहार्दपूर्ण बैठक झाली. पत्नी, मुलगा आणि सूनबाईसह शिंदे हे जवळपास तासभर मोदी यांच्या समवेत होते. ज्या राज्यात भाजप ताकदवान नाही तेथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंख पसरविण्यास आपण इच्छुक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. ज्या राज्यात पक्ष भक्कम आहे, तेथेही काही उणिवा असतील तर त्या दूर करण्यास त्यांनी बजावले आहे. भाजपच्या नेत्यांनी दादागिरी करू नये, असेही त्यांनी सुचवले आहे.

अमित शाह यांच्यावर बसपाचा हल्ला 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानामुळे बसपाचे कार्यकर्ते निषेधासाठी रस्त्यावर उतरले याचा अनेकांना धक्का बसला. गृहमंत्र्यांविरुद्ध बसपने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली होती. पुढे त्यांनी काडीमोड घेऊन स्वतंत्र वाटचाल सुरू केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या हाती काही लागले नाही. चंद्रशेखर आझाद यांचा विजय हा बसपाला जास्त चिंतेत टाकणारा होता.

मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांच्याविरुद्ध जानेवारी २०१३ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केल्यापासून बसपाने भाजपसमोर नमते घेतले आहे. काँग्रेसच्या राजवटीत याप्रकरणी खटला दाखल झाला असला तरी त्याचा लाभ मात्र भाजपला मिळाला. परंतु, पक्षाचे राजकीय अस्तित्वच पणाला लागलेले असल्यामुळे आता बसपा कदाचित रस्ता बदलेल असे शाह यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे दिसू लागले आहे. बसपामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी आनंद कुमार यांचे पुत्र आकाश आनंद यांना धोरण आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Web Title: Special article on RSS Chief Mohan Bhagwat Advice on Hindu Muslim unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.