विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 10:44 AM2024-06-01T10:44:00+5:302024-06-01T10:44:31+5:30
कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांवर नियंत्रण मिळविण्यात सत्ताधीश किंवा सत्ताकांक्षी उत्सुक असतातच! म्हणूनच हा विषय अधिक गंभीर होऊन बसतो.
विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक
‘विज्ञान : शाप की वरदान?’ या छापाच्या शाळकरी निबंधांची मांडणी तशी सोपी. पहिल्यांदा विज्ञानाचे फायदे सांगायचे. मग धोक्यांची आणि तोट्यांची चर्चा करायची. विज्ञान फायदेशीर ठरेल की तोट्याचे हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे, असे मत मांडून निबंध संपवायचा. खंडण-मंडण या वादविवाद पद्धतीचा हा एक शाळकरी आविष्कार. थोडे बाळबोध असले तरी अशा पद्धतीने दोन्ही बाजू समजून घेण्यात काही चुकीचे नाही.
निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयाची मांडणीही तशीच! लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या लेखमालेमध्ये धोक्यांची, तोट्यांची चर्चा करण्यात आली. फायदेही अर्थात आहेतच. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निवडणूक प्रक्रिया, मतमोजणीमध्ये अधिक पारदर्शिता आणता येऊ शकते. संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवता येऊ शकते. मतदारांच्या राजकीय शंका-समाधानासाठी विविध भाषांमध्ये संवाद साधू शकणारी बोलयंत्रे (चॅटबॉट्स) उपलब्ध करून देता येऊ शकतात. उमेदवारांच्या प्रचारावर रिअलटाइम लक्ष ठेवता येऊ शकते. त्याचे विश्लेषण करून आक्षेपार्ह गोष्टींची नोंद करता येऊ शकते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना तर कृत्रिम बुद्धिमत्तेचे बरेच फायदे होऊ शकतात. मतदारसंघ, मतदारांचा कल समजून घेण्यापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या विश्लेषणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेल्सचा आणि भाकितांचा वापर करता येऊ शकतो. एकाच वेळी लाखो जणांपर्यंत राजकीय संदेश पाठविता येऊ शकतात. मीम्सपासून ते गाणी बनविण्यापर्यंत अनेक प्रकारचा राजकीय आशय कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार करता येऊ शकतो. राजकीय आशयनिर्मितीचे कष्टाचे, आणि खर्चिक काम कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सोपे होऊ शकते. साधनसंपत्ती व कार्यकर्त्यांचे बळ कमी आहे अशांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे चांगले साधन आहे.
असे फायदे असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेतील धोके आणि तोटे सांगण्यावर या लेखमालेचा भर राहिला. कारण, तंत्रज्ञानाचे फायदे चटकन लक्षात येतात. तंत्रज्ञानात हितसंबंध गुंतलेल्या व्यक्ती आणि संस्था तंत्रज्ञानाचे गोडवे नेहमी उच्चस्वरात गातच असतात. पुन्हा उजळणीची गरज नसते. तंत्रज्ञानाचे तोटे, धोके, दुष्परिणाम जाणवायला बराच काळ जातो. म्हणूनच थोडी लक्षणे दिसताच खबरदारीचे उपाय योजावे लागतात. माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅक्लुहन म्हणतात, ‘पहिले आपण तंत्रज्ञान घडवितो. मग तंत्रज्ञान आपल्याला घडविते!’ घडविलेल्या तंत्रज्ञानाचे गोडवे गाताना तंत्रज्ञान आपल्याला कसे घडविते किंवा घडवू शकते याची पुरेशी चर्चा फारशी घडत नाही. शाळकरी निबंधाप्रमाणे आपणही ‘हे तर आपल्या वापरावर अवलंबून आहे,’ असे काहीसे व्यापक विधान करून थांबतो. तेही ठीकच; पण शाळेतला निबंध जिथे संपतो तिथे वास्तव जगातल्या समस्या सुरू होतात. ‘आपल्या वापरावर’ यातील ‘आपले’ म्हणजे नेमके कोण? याचे उत्तर शोधावे लागते. एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर कोणी आणि कसा करावा, यावर बहुतेकवेळा ते निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे आणि राजकीय-सामाजिक सत्ताधीशांचेच जास्त नियंत्रण असते. सर्वसामान्य व्यक्ती वा समूह बाजूला पडतो. निवडणुका म्हणजे तर अशी सत्ता मिळविण्याचाच मार्ग. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांवर नियंत्रण मिळविण्यात सत्ताधीश किंवा प्रभावी सत्ताकांक्षी उत्सुक असणार हे उघड. म्हणूनच तंत्रज्ञान कोण घडविते, त्याच्या वापराच्या मर्यादा कोण ठरविते या कठीण प्रश्नांचीही उत्तरे शोधावी लागतात.
तंत्रज्ञानामध्ये आपले सामर्थ्य वाढविण्याची जशी क्षमता असते तशीच विकार, विखार, स्खलनशीलतेला भुरळ पाडणारी जादूही असते. तंत्रज्ञानाची ताकद मर्यादित असेल तर अशा जादुई भुरळीचे दुष्परिणामही मर्यादितच राहतात. आजवर तंत्रज्ञानाच्या या मर्यादेमुळेच आपण अनेक दुष्परिणामांपासून थोडे सुरक्षित राहू शकलो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा मानवी विचार आणि वर्तन यांच्या अधिक जवळ जाणारे आहे. म्हणूनच सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.
आणि इथे तर त्याचा वापर निवडणुकीच्या राजकारणासारख्या अत्यंत स्पर्धात्मक आणि फारसा विधिनिषेध न बाळगणाऱ्या क्षेत्रामध्ये होणार. ‘राजकारण म्हणजे धूर्त आणि लबाडांचा शेवटचा आसरा’ हे प्रसिद्ध विधान तंतोतंत खरे नसले तरी त्यातील सत्यांश लक्षात घेतला तर कृत्रिम बुद्धिमत्तेची अफाट आणि मानवीय क्षमता धूर्त आणि लबाडवृत्तीच्या लोकांकडे जाण्याचा धोका किती गंभीर ठरू शकतो, याचा अंदाज बांधता येतो.
म्हणूनच याबाबत ‘हे तर शेवटी आपल्यावर अवलंबून आहे’ असे शाळकरी मत देऊन थांबता येणार नाही. तंत्रज्ञानाचे कर्ते, वापरकर्ते, त्यांची मूल्ये, उद्देश, आपल्या क्षमता, आपले विकार या सगळ्यांबाबत प्रश्न विचारावे लागणार. उत्तरे शोधावी लागणार आणि मगच सजगपणे तंत्रज्ञानाची, त्यातील घटकांची निवड करावी लागणार.
लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लवकरच लागतील; पण तंत्रज्ञानाची- त्यातही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची- निवडणूक ही दीर्घकालीन आणि गुंतागुंतीचीही आहे. म्हणूनच तिच्याविषयी ‘आपली’ सजगता वाढणे गरजेचे आहे. या लेखमालेचेही प्रयोजनही या सजगतेत थोडीबहुत भर टाकणे हेच होते.
(लेखमाला समाप्त)
विश्राम ढोले (vishramdhole@gmail.com)