विशेष लेख: शाहरुख, त्याचा धर्म, 'पठाण'.. आणि यश!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 09:41 AM2023-01-21T09:41:50+5:302023-01-21T09:42:57+5:30
शाहरुखच्या कॉस्मोपॉलिटन, धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर लोकांनी प्रचंड प्रेम केले. ती प्रतिमा राखण्याची जबाबदारी घेऊन तो पुन्हा येतो आहे. त्याला यश मिळेल?
मेघना भुस्कुटे
आपला महाकाय देश जोडून ठेवणाऱ्या अनेक नव्या-जुन्या धाग्यांपैकी मुख्य धारेतले हिंदी सिनेमे ऊर्फ बॉलिवूड हाही एक धागा आहे. नि त्यामुळेच हिंदी सिनेमातल्या 'स्टार' मंडळींना निव्वळ एखाद्या कलावंताइतकंच मर्यादित महत्त्व असत नाही. ते कलावंत तर असतातच; पण इथल्या बहुसंख्य, वैविध्यपूर्ण जनतेचं निस्सीम वेडं प्रेम मिळवणारे नशीबवान लोकही असतात. या प्रेमात त्यांच्य स्वतःच्या प्रतिभेचा, कलात्मक निवडीबरोबरच किती तरी अधिक वाटा त्यांच्या सामाजिक-आर्थिक- राजकीय पार्श्वभूमीचा आणि वातावरणाचा असतो. हे वातावरण बदलू लागतं, तेव्हा स्टारपदं आपसूक हस्तांतरित होतात. जुने स्टार्स अस्ताला जातात, नवे उदयाला येतात. कधी-कधी मात्र स्टारपद मुद्दाम डळमळीत करण्याचे प्रयत्नही केले जातात. त्यातून काही जण झळाळून बाहेर येतात, तर काही जण विझून जातात.
शाहरुख खानचं काय झालेलं दिसतं?
भारताची अर्थव्यवस्था खुली भारताची अर्थव्यवस्था खुली झाली, त्या नव्वदीच्या दशकात शाहरुखचं पदार्पण झालं. आधी शहरांमध्ये आणि हळूहळू लहान शहरांमध्ये दिसायला लागलेली आधुनिकता आणि भौतिक समृद्धी या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर शाहरुख आला, हिट झाला, चित्रपटसृष्टीतल्या कुणाशीही नातं नसता, आपल्या कामाच्या बळावर आपली जागा कमावणारा हीरो म्हणून त्याचं अपील तयार होत गेलं, ते तेव्हापासून सुरुवातीला त्याने रंगवलेल्या नकारात्मक प्रतिमांचा अपवाद वगळता त्यानं कायम एक स्वप्नील नजरेचा, सौम्य, हसरा प्रेमिक रेखाटलेला दिसतो. त्याच्या भूमिकांमध्ये आक्रमक पौरुष ऊर्फ रांगडी मर्दानगी दिसत नाही. अगदी त्याच्या नकारात्मक भूमिकांमध्येही एक प्रकारची ऑब्सेसिव्ह वेडाची झाक आहे; पण आक्रमक पौरुषकल्पनांमधून आलेला रांगडा हक्क सांगणं नाही. प्रेयसीला आपल्या मोहक वागण्यानं जिंकून घेणारा, वेळी परंपरेला आव्हान देतानाही परंपरेचा मान राखणारा प्रेमिक रंगवत शाहरुखनं आपलं स्टारपद कमावलेलं दिसतं. स्वप्नवत चिरतरुण सौंदर्याची भूल घालणाऱ्या 'लक्स' साबणाच्या जाहिरातींमध्ये कायम आघाडीच्या सिनेतारका असत. गुलाबाच्या पाकळ्या पखरलेल्या आलिशान न्हाणीघरातला शाहरुख खान हा 'लक्स'च्या जाहिरातीत दिसलेला पहिला पुरुष स्टार. हे 7 यासंदर्भात अतिशयच बोलकं ठरावं.
शाहरुखचं मुस्लीम असणं त्यानं कधीही लपवलेलं नाही. ते अभिमानानं मिरवत तो आपलं कॉस्मोपॉलिटन 7 आयुष्य जगला. त्याच्या आई-वडिलांचे काँग्रेसशी असलेले निकटचे संबंध, वडिलांचा जन्म पाकिस्तानातला असूनही गफार खान यांचे समर्थक असल्यामुळे फाळणीनंतर न भारतात स्थायिक होणं, त्यांचा स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग, त्यानं हिंदू प्रेयसीशी केलेलं आणि निभावलेलं लग्न, इस्लामोफोबियाबद्दल त्यानं व्यक्त केलेला राग... आणि या सगळ्याबद्दल 'यात विशेष काय? हेच नॉर्मल आहे.' हे त्यानं पुन्हा-पुन्हा केलेलं विधान. या सगळ्या गोष्टी त्याच्या खास भारतीय वाणाच्या कॉस्मोपॉलिटनपणाकडे निर्देश करतात. या सगळ्यांनी मिळून तयार झालेल्या शाहरुखच्या प्रतिमेवर लोकांनी बेहद्द प्रेम केलं आहे.
सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेल्या पहिल्या चिखलफेकीचं निमित्त म्हणजे त्याने देशातल्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल अत्यंत मोघम शब्दांत व्यक्त केलेली चिंता! त्यानंतर वेळोवेळी त्याच्या घराबाहेर केली जाणारी निदर्शनं, त्याच्या सिनेमांच्या चित्रीकरणाला होणारा विरोध, त्यानं पाकिस्तानात निघून जावं ही अनेक राजकीय व्यक्तींनी जाहीरपणे केलेली मागणी, त्याच्या सिनेमांवर बहिष्काराची आवाहनं, लता मंगेशकर गेल्यावर त्यानं वाहिलेल्या श्रद्धांजलीवर भलतेसलते आरोप.. हे सगळंच गेल्या सात-आठ वर्षांत सातत्यानं घडत आलं आहे.
प्रत्युत्तरादाखल शाहरुखचं वागणं मात्र एकाच वेळी अधिकाधिक मुकं, ठाम, आणि कृतीतून बोलणारं असं दिसतं. 'माय नेम इज खान अँड आय अॅम नॉट अ टेररिस्ट' असं घोषवाक्य असलेला 'माय नेम इज खान' हा सिनेमा निनायक शाहरुख, भारतात आरडीएक्स आणणाऱ्या एका मुस्लीम गैंगस्टरनं त्यामागचा उद्देश जाणल्यावर प्राणांची किंमत मोजून हल्ला थांबवणं अशी कथा असलेला 'रईस' आणि नायकपदी शाहरुख आणि आता 'पठाण 'मधला - मुस्लीम देशभक्त बॅडास नायक. वाढत्या मुस्लीमद्वेषाला आणि दोषारोपांना जणू आपल्या निवडीतूनच उत्तर द्यावं आणि त्याच वेळी आपल्या धर्माविषयी कोणत्याही प्रकारची शरम बाळगू नये असं ठरवून केल्यासारख्या या भूमिका. त्याखेरीज त्यानं वेळोवेळी प्रेक्षकाच्या विचारशक्तीबद्दल आदर बाळगून दिलेल्या शांत, संयमी मुलाखती. आणि सगळ्यांत महत्त्वाचं त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात गुंतलेला असल्याचं किटाळ संपूर्णतः निःशब्द राहून आणि केवळ न्यायव्यवस्थेच्या साह्यानं दूर करण्यासाठी त्यानं दिलेला नि जिंकलेला लढा! या सगळ्यातून शाहरुख खानची प्रतिमा डागाळत- विझत जाताना दिसते, की उजळत जाताना दिसते?
एका मुलाखतीत तो म्हणाला होता, "एक सिनेमा तयार करण्यासाठी अनेक माणसं खपतात. त्यात कितीकांचे कष्ट, स्वप्न, प्रतिभा पणाला लागलेली असते. त्यांचं नेतृत्व माझ्या खांद्यांवर येतं, नि मग तो सिनेमा लोकांनी प्रेमानं बघावा, यशस्वी व्हावा, ही मला माझीच जबाबदारी वाटायला लागते. नि त्यातून सगळं पणाला लावणं येतं..."
त्याच्या ज्या कॉस्मोपॉलिटन, आधुनिक, सौम्य, धर्मनिरपेक्ष-धार्मिक अशा प्रतिमेवर लोकांनी भरभरून प्रेम केलं आहे, ती प्रतिमा राखण्याची जबाबदारी शिरावर घेऊन शाहरुख पुन्हा येतो आहे, त्याला यश येईल का?
मेघना भुस्कुटे, भाषांतरकार आणि ब्लॉगर
meg.bhuskute@gmail.com