Sharad Pawar | विशेष लेख: शरद पवारांनी डोळे वटारले असते तर..?
By वसंत भोसले | Published: January 29, 2023 12:45 PM2023-01-29T12:45:02+5:302023-01-29T12:46:03+5:30
साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन गॅस, आदींकडे आता वळा असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
वसंत भोसले, संपादक लोकमत, कोल्हापूर
साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन गॅस, आदींकडे आता वळा असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. आधी डिस्टलरी आणि इथेनाॅल तसेच को-जन (ऊर्जा निर्मिती) करण्यावर भर दिला होता. हे सर्व करीत साखर कारखानदारीचे बहुआयामी उद्योग समूहात रूपांतर व्हायला हवे. पण ते सहकारी साखर कारखानदारीने करावे की, खासगी साखर कारखान्यांनी करावे? याचे उत्तर दिले जात नाही. सहकारी साखर कारखानदारी मोडून खाल्ली तरी त्यांच्याकडे डोळे वटारून पवार यांनी पाहिले नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घ परिणाम करणारे मोजके नेते आहेत. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची आणि कृतीची धाटणी त्यांच्यात उतरली आहे. त्यांची वैचारिक बैठक तशीच आहे. राष्ट्रीय नेते म्हणून प्रस्थापित होण्यास दोघांनाही समानच विरोध सहन करावा लागला. त्यात बंडखोर निघाले शरद पवार. पण यशवंतराव चव्हाण यांच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, के. कामराज आदी ज्येष्ठ नेते काँग्रेसचे नेतृत्त्व करीत होते. त्यांच्या विरोधात जाणे आणि शरद पवार यांचा श्रीमती सोनिया गांधी यांचा विरोध यात खूप अंतर आहे. तसेच यशवंतराव चव्हाण यांची लोकसहभागाची सहकार चळवळ आणि शरद पवार यांचा सहकाराकडे पाहायाचा दृष्टीकोन यात खरेच अंतर पडले असे वाटते. पवारांच्या कालखंडातील मोठा भाग मुक्त अर्थव्यवस्थेचा असल्याचे कारणही त्यामागे असू शकते. मात्र, येवढे म्हणून शरद पवार यांच्या विषयी माफीचा साक्षीदार अशी भूमिका घेता येत नाही.
या सर्वांची मांडणी करण्याचे कारण की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लहान शेतकऱ्यांची संख्या ८६ टक्के आहे. या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या शेती करण्याशिवाय पर्याय नाही. त्यास सहकार चळवळ हे माध्यम आहे. ते आजही कालबाह्य झालेले नाही. जोवर लहान शेतकऱ्यांचे हे प्रमाण असणार तोवर ते राहणार आहे. काहींच्या मते ही लहान शेतीच तोट्याची आहे. शेतकऱ्यांनी ती सोडून द्यावी. मोठ्या कंपन्यांनी शेतीत उतरावे किंवा शेतकऱ्यांनीच कंपनी स्थापन करावी वगैरे वगैरे मांडणी केली जाते तसे प्रयोग महाराष्ट्रातही झाले आहे. उदा. नाशिकची सह्याद्री शेती कंपनी. तरी देखील सहकाराने एक माेठी भूमिका निभावली आहे. हे मान्य असूनही शरद पवार यांनी सहकार मोडत असताना भूमिका का घेतली नाही? हा प्रश्न पडतो. सहकारी साखर कारखानदारी किंवा संपूर्ण सहकार क्षेत्र मजबूत होण्यावर त्यांनी भर दिला नाही. परवाच्या दौऱ्यात त्यांनी साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन गॅस, आदींकडे आता वळा असा सल्ला दिला आहे. आधी डिस्टलरी आणि इथेनाॅल तसेच को-जन (ऊर्जा निर्मिती) करण्यावर भर दिला होता. हे सर्व करीत साखर कारखानदारीचे बहुआयामी उद्योग समूहात रूपांतर व्हायला हवे. पण ते सहकारी साखर कारखानदारीने करावे की, खासगी साखर कारखान्यांनी करावे? याचे उत्तर दिले जात नाही. सहकारी साखर कारखानदारी मोडून खाल्ली तरी त्यांच्याकडे डोळे वटारून शरद पवार यांनी पाहिले नाही. सहकारी साखर कारखानदारीतील गैरव्यवहारावर प्रहार केले नाहीत. भ्रष्टाचाऱ्यांनी माझ्या दारात यायचे नाही, असे दरडावले नाही.
परवाच्या दौऱ्यात त्यांच्या आजूबाजूला जयंत पाटील, अरुण लाड, वैभव नायकवडी यांच्यासारखे चांगले साखर कारखानदारी चालविणारे होतेच. पण त्याच गर्दीत साखर कारखानदारी गाजर खावे तशी मोडून खाल्ली ते पण घुसले होते. त्यांनाही तो मान ते देतात. ही राजकीय मजबुरी आहे का? चांगली कारखानदारी चालिवणाऱ्यांना साठी उलटली तरी आमदारकी भेटत नाही की, राज्य पातळीवरील संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही. शरद पवार यांच्या जाणतेपणातील ही उणीव दिसते. ते जाणते आहेत याविषयी शंकाच नाही, असा जाणतेपणा आताच्या नेतृत्वात येणारही नाही. कोणत्याही विषयाची माहिती घेतल्याशिवाय बोलत नाहीत आणि बोलणे आवश्यक असेल तर माहिती घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही. संघटन कौशल्य अफाट आहे. पवार यांना महाराष्ट्राची खडा न् खडा माहिती आहे तशीच देशाची पण आहे. आणि सर्वच क्षेत्रांची माहिती ते नेहमी घेत असतात. त्यांना महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीत काय चालले आहे, ते एकेदिवशी माेडून खाल्ले तरी आश्चर्य वाटायला नको, असे चित्र समोर असतानाही त्यांनी एक घाव दोन तुकडे करण्यासारखी भूमिका घेतली नाही. संपूर्ण महाराष्ट्राला नवी आशा निर्माण झाली असे वाटले असते. जिल्हा बँकांचा वापर करून सहकारी साखर कारखाने कमी किंमतींना विकत घेण्यात आले तेच नेते भाजपमध्ये गेेले, असे भ्रष्ट नेते साधन सुचिताची संकल्पना मांडून नवा भारत घडवित आहोत, असे भाजपवाल्यांना वाटते. महाराष्ट्रातील दोनशे साखर कारखान्यांपैकी निम्मे साखर कारखाने खासगी क्षेत्रात गेले आहे. निम्मे सहकारात आहेत. त्यापैकी काही मरणासन्न अवस्थेत आहेत. काही कारखाने चाळीस-पंचेचाळीस वर्षांसाठी खासगी व्यक्ती किंवा संस्थांना चालवायला दिल्या आहेत. अशा सहकारी साखर कारखान्यांचे शेतकरी सभासद चाळीस वर्षानंतर एकजणही जिवंत असणार नाही. कारखाना कायमचा मोडीत गेला असेच समजायचे का?
कवठेमहांकाळचा महांकाली सहकारी साखर कारखाना पुरेसे पाणी नव्हते, तेव्हा सुरू होता. आर. आर. आबा यांच्या प्रयत्नामुळे त्या तालुक्यात पाणी आले. ऊस हवा तेवढा पिकू लागला आणि कारखाना बंद पडला आहे. जिल्हा बँकेचे कर्ज म्हणून त्यांनी ताब्यात घेतला. ज्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आहे तेच आता कारखाना चालिवण्यास घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. हा सर्व ठरवून केलेला डाव आहे का? तो कारखाना चालविणारे सैरवैर वागत होते. तेव्हा सरकारने का नाही कान उपटले. सरकारचे सहकार खाते ऑडिट करते. त्यांना याचा घोळ दिसला नाही? घोटाळे असूनही जे हिशेब तपासणीस अ किंवा ब प्रमाणपत्र देत होते ते तुरुंगात गेले नाहीत. हे सर्व घडत असताना पवारांनी डोळे का वटारले नाहीत?
कारण त्यांना तो मान होता. सातारा हा जिल्हा त्यांच्यावर अफाट प्रेम करणारा. त्या जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने उभारलेला किसन वीर सहकारी साखर कारखाना कर्ज आणि विविध प्रयोग करण्याच्या घाईने बंद पडला. पवारांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरचा कारखाना. पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्याचे अध्यक्ष भाजपवासी झाले. त्यांनी तरी मदत करून शरद पवार यांनाच सहकार चालिवता येतो का? हे तरी दाखवून देण्याची संधी होती. पण झाले काहीच नाही. वाईमधून तरी भाजपला सातारा जिल्ह्यात चंचू प्रवेश मिळतो का ते पाहत होते. तो प्रवेश साताऱ्यातून झाला. केवळ राजकीय गणिते घालून सहकारी चळवळीकडे पाहिले, असेही म्हणता येणार नाही. मात्र या राजकारण्यांना शिस्त लावण्याची ताकद असणाऱ्या नेत्याने का डोळे वटारून खडसावून सांगितले नाही. त्यांना सोडून गेलेले सहकार असो की आमदार-खासदार असोत पवार यांच्या मुक्काम स्थळावर येऊन माथा टेकवून जातातच. हा त्यांचा मान आहे. त्याचा वापर त्यांनी अशा अपप्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी का नाही केला? हा प्रश्न पडतो.
आता त्यांच्यासारखे अपराजित राजकारणी महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजावेत एवढेच आहेत. त्यातही पवार यांची संसदीय कारकीर्द सर्वांत मोठी आहे, हा एक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील विक्रमच आहे. या साऱ्याचा विचार करता भाजप किंवा संघवाले सोडले तर काँग्रेसपासून समाजवादी आणि कम्युनिष्टांपर्यंतच्या साऱ्यांना शरद पवार हवेहवेसे वाटतात. सत्कार करायला किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायला तेवढ्या तोडीचे हात महाराष्ट्रात नाहीत. या सर्व लौकिकाचा वापर करून शरद पवार यांनी सहकार चळवळीचे वाटोळे होत असताना स्वस्त बसण्याची भूमिका घ्यायला नको होती? ही तक्रार त्यांच्याविषयी करण्याचा हक्क त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना तर नक्कीच आहे. सहकार मोडला तर लूट थांबणार नाही. हे वास्तव आहे. सहकारातील बहुसंख्य लुटारूच आहेत पण भारतीय शेतीची रचना पाहता सहकाराची गरज आहे. अन्यथा तो विसर्जित करण्याचा निर्णय तरी घेऊन टाका. चोराला चोर म्हणणार नसाल तर सार्वजनिक जीवनातील आदर्श तरी कसे जपले जाणार? यासाठी किमान त्यांनी डोळे वटारून पाहिले असते तरी पुरेसे होते.