विद्यार्थी बाहेर हिंडतात, कॉलेजच्या वर्गात फिरकत नाहीत, ते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 09:29 AM2023-01-20T09:29:30+5:302023-01-20T09:30:05+5:30

शिक्षणक्षेत्रात नवे अभ्यासक्रम, विद्यापीठांच्या मानांकनाची/जागतिक स्पर्धेची काळजी चालू असताना, या सर्वांचा केंद्रबिंदू विद्यार्थी मात्र बेजबाबदार वागतो आहे.

Special Article on students bunk classes in college | विद्यार्थी बाहेर हिंडतात, कॉलेजच्या वर्गात फिरकत नाहीत, ते का?

विद्यार्थी बाहेर हिंडतात, कॉलेजच्या वर्गात फिरकत नाहीत, ते का?

googlenewsNext

हाजीर हो!! - कॉलेजला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या नावे असा कोर्टातल्यासारखा पुकारा करण्याची वेळ आज आली आहे. अगदी ज्युनिअर कॉलेजपासून तर पदवी, पदव्युत्तर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्याची गैरहजेरी हा चिंतेचा विषय झाला आहे. याला कोणतेही कॉलेज, कोणताही कोर्स अपवाद नाही. जिथे प्रॅक्टिकल असते, तिथे गरज म्हणून उपकार केल्यासारखे कसेतरी प्रयोग केले जातात. बाकी जर्नल लिहिणे म्हणजे कॉपी ही पूर्वापार परंपरा आहे. ७५ टक्के हजेरी हवीच, हा नियम फक्त कागदावर! हजेरी हा फक्त मॅनेज केलेला डेटा.

जी मुले दहावीपर्यंत नियमित शाळेत जातात, त्यांना कॉलेजात गेल्यावर अचानक पंख फुटतात. कॉलेजमध्ये गेले काय, न गेले काय; काही फरक पडत नाही, हे त्यांना सिनिअरकडून कळते. लेक्चर नोट्स, गाईड्स हे शिक्षकापेक्षा जास्त जवळचे, उपयोगी हा सल्लाही मिळतो! परीक्षेत नेमके काय विचारतात, त्याचे कसे कितपत उत्तर द्यायचे याचे आडाखे, ठोकताळे ठरलेले. परीक्षा म्हणजे कसलेही आव्हान नसते आजकाल. थोडाही पेपर कठीण आला की बोंबाबोंब करायला संघटना, स्वयंसिद्ध पुढारी आहेतच! निकालदेखील कडक लागण्याची, लावण्याची आजकाल सोय राहिली नाही. तिथेही मोडरेशन नावाची काठी आहेच सोबतीला, तारून न्यायला!

त्यामुळेच विद्यार्थी बिनधास्त झाले आहेत. केव्हा काय करायचे, कसे तरून जायचे हे त्यांना पक्के ठाऊक झाले आहे. पदराला खार लावून, स्वतः अडचणी सहन करून भरमसाट फी भरणारे पालक मुलांच्या कॉलेज हजेरीबद्दल जागरूक नसतात हे आश्चर्यच!  नवे शैक्षणिक धोरण, नवे अभ्यासक्रम, विद्यापीठांच्या मानांकनाची चिंता, जागतिक स्पर्धेची काळजी हे सारे चालू असताना या सर्वांचा जो केंद्रबिंदू विद्यार्थी, तो असा बेजबाबदार वागतो, या विरोधाभासाला काय म्हणायचे? हे असे आधीही होते का? - तर नाही! मी शिक्षण क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत आहे. ७०, ८०, ९० च्या दशकात ९० टक्के हजेरी असे. अगदी सुटीच्या दिवशी गरज पडल्यास बोलावले तरीही विद्यार्थी येत!  क्लास घ्या म्हणून प्राध्यापकांना बोलवायला येणारे विद्यार्थी मी पाहिले आहेत.  हळूहळू सारेच बदलत गेले. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी तर जॉब हाती असल्याने हजरच नसतात. वर्गात हजर न राहतादेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतात!

एकतर कॉलेजचे  वातावरण आता पूर्वीसारखे राहिले नाही. वाचनालयात जायची गरज राहिली नाही. हवी ती इन्फॉर्मेशन (ज्ञान नव्हे) हातातल्या मोबाईलमध्ये मिळते. शिवाय आजकाल नोकरी देणाऱ्याला पदवी, मार्क्स, विद्यापीठ यात काही रस नसतो. तुम्ही त्याच्या कामासाठी लायक आहे की नाही, त्याचा धंदा वाढवायला तुमचा उपयोग आहे की नाही, हेच पाहिले जाते. यासाठी वर्गातली हजेरी गरजेची नाही, हे मुलांना माहिती झाले आहे.

प्राध्यापकदेखील रोल मॉडेल वाटावे असे नाहीत. तेच वाममार्गाला प्रोत्साहन देणारे, पाट्या टाकणारे! मुख्य म्हणजे शिक्षण पद्धतीत शिकण्यावर भर नाही. मार्क महत्त्वाचे अन् ते कसे मिळवायचे याचे गणित नव्या पिढीला समजून चुकले आहे. मग वर्गात जायचे कशाला, वेळ वाया घालवायचा कशाला, ही मनोवृत्ती झालीय. आपण नवे शैक्षणिक धोरण, नॅक, स्किल बेस्ड एज्युकेशन, आऊटपूट बेस्ड पद्धती, ग्लोबल स्पर्धा वगैरेंच्या गप्पा मारायच्या, अहवाल तयार करायचे अन् आकडे दाखवून कुठे किती प्रगती झाली याचे ढोल पिटत बसायचे! विद्यार्थ्यांना नेमके काय हवे, त्यांची मानसिकता कशी आहे, त्यांची आवड - निवड कशात आहे याचा विचार नाही.

आम्ही सांगतो ते करा, आम्ही म्हणतो ते, तसेच शिका, परीक्षेत आम्हाला अपेक्षित तेवढे, तसेच लिहा हा आमचा आग्रह. एरवी स्वातंत्र्य, स्वायत्तता याच्या गप्पा मारायच्या. पण मुलांना आवडते ते, हवे तसे, हव्या त्या वेळी शिकण्याचे स्वातंत्र्य आपण देतो का? हीच मुले मॉल, रेस्तरांत तासंतास फिरतात, गप्पा मारतात, पण वर्गात येत नाहीत, ते का हेही नव्याने शोधायला हवे. मागे कॉपी मुक्तीसाठी आंदोलन झाले. तसे वर्गातल्या हजेरीसाठीही झाले पाहिजे. त्यात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, संस्था सर्वांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना हाजीर हो.. असे म्हणण्याची वेळ येणार नाही.

- डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरु, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Web Title: Special Article on students bunk classes in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.