विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:25 AM2024-10-22T10:25:18+5:302024-10-22T10:25:36+5:30
ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या अवस्थेचे सर्वेक्षण केले गेले, त्यातून हाती आलेल्या अस्वस्थ निष्कर्षांची नोंद!
प्रमोद मुजुमदार, विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात मुलाखतकारांच्या आमच्या गटाने ‘स्टुडंट्स हेल्पिंग हॅन्ड्स’ या संस्थेच्या वतीने पुण्यात शिकायला येणाऱ्या सुमारे ४०० मुला-मुलींसाठी देण्यात येणाऱ्या ‘फूड स्कॉलरशिप’साठी मुलाखती घेतल्या. (आणखी हजार मुलांचे अर्ज जमा होते.) या मुला-मुलींच्या मुलाखती घेणे, हा एक अस्वस्थ करणारा अनुभव होता. बारावीनंतर दर्जेदार महाविद्यालयात शिक्षण मिळावे आणि चांगले करिअर करता यावे, या आकांक्षेने ही मुले पुण्यात येऊन पोहोचतात. कॉलेज प्रवेशासाठी, छोटे मोठे कोर्सेस करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढतात. दरवर्षी अशी सुमारे ४०,००० मुले नव्याने पुण्यात येतात. पुण्यात दरवर्षी स्थलांतरीत सरासरी दीड, दोन लाख मुले-मुली असतात.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना स्टुडंट्स हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून कुलदीप आंबेकर विविध पद्धतीची मदत गेली सात वर्षे करत आहेत. पुण्यात कशीबशी राहण्याची सोय करून हे विद्यार्थी तगून राहतात. गेल्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत जेवणाची सोय होत नाही म्हणून सुमारे ३०० मुली शैक्षणिक वर्ष अर्धवट सोडून परत गावी जाण्याच्या स्थितीत असल्याची माहिती स्टुडंट्स हेल्पिंग हँड्सकडे होती.
दोन वेळचे जेवण नीट नसेल तर ही मुले कशी शिकत असतील आणि यांची आरोग्य स्थिती तरी काय असणार? - हा प्रश्न घेऊन स्टुडंट्स हेल्पिंग हँड्स आणि राष्ट्र सेवा दलातर्फे या मुला-मुलींच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. सुमारे ६०० विद्यार्थी / विद्यार्थिनींचा सहभाग असलेले हे सर्वेक्षण ‘सहभाग वेल्फेअर फाउंडेशन’चे डॉ. मंदार परांजपे यांच्या मदतीने फेब्रुवारी - मार्च २०२४मध्ये झाले. यातून पुढे आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.
आरोग्य तपासणी केलेल्या २१८ विद्यार्थिनींपैकी ४१ टक्के विद्यार्थिनी आणि ३६४ विद्यार्थ्यांपैकी २३ टक्के विद्यार्थी ॲनिमिक आहेत. ७१ टक्के विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात प्रचंड त्रास होतो. विद्यार्थिनी सकाळी नाष्टा करत नाहीत. रात्री किंवा सकाळी एकदाच पूर्ण जेवण करतात. एक वेळ वडापाव किंवा तत्सम खाण्यावर भूक भागवतात. नाष्टा आणि दोन वेळेस जेवण असा पूर्ण आहार घेणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण केवळ २० टक्के आहे. विद्यार्थ्यांची परिस्थितीही फारशी वेगळी नाही.
‘सतत भूक लागते’, ही ५८ टक्के विद्यार्थ्यांची तक्रार होती. बहुतांश मुले नाष्टा करत नाहीत. एक वेळचे जेवण पुण्यातील काही स्वामी, महाराज इत्यादींच्या मठातून प्रसाद म्हणून मिळालेल्या खिचडीवर भागवतात. काही मुले एक वेळच जेवण घेतात.
विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावाच्या तक्रारी नोंदवल्या. मुलींनी मानसिक दडपण, भावनिक उद्रेक, छाती धडधडणे, आत्मविश्वासाचा अभाव अशा तक्रारी (६५ टक्के) नोंदवल्या. तर विद्यार्थ्यांनी आर्थिक विवंचना आणि घरच्या परिस्थितीमुळे अपराधाची भावना, सतत अपयशाची भीती वाटणे, मानसिक दडपण, अनिश्चितता, आत्मविश्वासाचा अभाव अशा तक्रारी नोंदवल्या. या ६०० विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के मुले - मुली अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील, तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल मानलेल्या गटातील आहेत. त्यांचे पालक शेतमजुरी, ऊसतोड कामगार किंवा अन्य छोट्या मोठ्या मजुरीची कामे करणारे आहेत. केवळ १२-१३ टक्के कुटुंबात स्थिर सरकारी किंवा अन्य नोकरीचे आर्थिक उत्पन्न आहे. उरलेल्या बहुसंख्यांना घरून मिळणारी मदत नेहमीच अनिश्चित असते.
ग्रामीण दुर्बल समाज गटातून आलेल्या मुलांसमोर पुण्यासारख्या शहरात सांस्कृतिकदृष्ट्या जुळवून घेणे मोठे आव्हान असते. आर्थिक विषमतेबरोबरच या विद्यार्थ्यांना छुप्या, अप्रत्यक्ष जातीय विषमतेचा सामना करावा लागतो. याचा परिणाम म्हणजे त्यांना भेडसावणारे नैराश्य, मानसिक दडपण, असे प्रश्न. हा एक ‘सामाजिक, मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न’ म्हणून पाहायला हवा. शेतकऱ्यांच्या पाठोपाठ या युवकांच्या आत्महत्या सुरू होऊ नयेत, असे वाटत असेल तर आपण वेळीच जागे व्हायला हवे.
बार्टी, सारथी किंवा अन्य सरकारी संस्थांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी मिळत नाहीत. अनेकदा त्यात भ्रष्टाचार होतो. कॉलेजमध्ये विविध प्रकारचे भरमसाठ शुल्क, परीक्षा शुल्क आकारले जातात. कित्येक विद्यार्थ्यांना यादीत नावे लागूनसुद्धा शिष्यवृत्ती पोहोचतच नाही. परीक्षा शुल्क माफी सवलतींचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत सर्वांत प्रथम काटकसर केली जाते ती आहारावर. या सर्वेक्षणाचा ‘सँपल साइझ’ छोटा असला तरी त्यातून पुढे येणारे वास्तव एका हिमनगाचे टोक ठरावे इतके गंभीर आहे.
इंटरनेटवर दिसणाऱ्या संधी, विविध कौशल्य विकासाच्या योजना, नवनवीन कोर्सेसच्या जाहिराती, नोकरीची आश्वासने देणाऱ्या घोषणा, स्पर्धा परीक्षा आणि कोचिंग क्लासेस... यातून निर्माण झालेल्या आभासी वातावरणाचा प्रचंड प्रभाव या युवक - युवतींवर असतो. मग दर्जेदार शिक्षणाच्या शोधात, कोणत्या तरी कोर्सच्या शोधात हे तरुण शहरात येतात. स्पर्धा परीक्षांच्या चक्रात आयुष्याची सात - आठ वर्षे गमावतात आणि ना नोकरी, ना स्थैर्य अशा त्रिशंकू खचलेल्या अवस्थेत ढकलले जातात.
जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश म्हणवणाऱ्या आपल्या देशात इतक्या प्रचंड संख्येने असणाऱ्या तरुणांसाठी कसलेच धोरण नाही. आहे ते भ्रामक आभासी मृगजळ आणि अनिश्चिततेचा अंधारा डोह! प्राथमिक पातळीवरील या सर्वेक्षणाने उघड केलेल्या या वास्तवाचा आणखी सखोल वेध घेण्यासाठी स्टुडंट्स हेल्पिंग हँड्स आणि राष्ट्र सेवा दलातर्फे एक व्यापक सर्वेक्षण आता सुरू करण्यात आले आहे.
mujumdar.mujumdar@gmail.com | kuldeepambekar123@gmail.com