स्वधर्म, स्वभाषा... आणि ‘शिवसृष्टी’चा संस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 07:37 AM2023-03-06T07:37:27+5:302023-03-06T07:38:20+5:30
सत्तालालसेपासून दूर असणे, अन्याय, अत्याचाराविरोधात बंड पुकारणे आणि स्वधर्मासाठी निष्ठेने लढणे - ही मूल्ये शिवसृष्टीतून जगभरात पसरतील!
शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वंकष पैलूंना ओघवत्या शैलीत स्पर्श केला आणि शिवाजी महाराजांची अराजकीय प्रतिमा मांडली. शिवाजी महाराजांनी शून्यातून उभारलेल्या स्वराज्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विधानाचा दाखला दिला. यशवंतराव म्हणाले होते, ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचे काय झाले असते याची जगाला पूर्ण जाणीव आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी दूर जावे लागले नसते, तुमच्या-माझ्या घराजवळच (पाकिस्तानची) सीमा असती.’ कोणतीही राजकीय टिप्पणी न करता भाजपला शिवराज्य कसे अपेक्षित आहे, याची मांडणी शाह यांनी केली.
बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करताना अमित शाह म्हणाले, ‘आसेतुहिमाचल शिवाजी महाराजांची गौरवगाथा मांडताना बाबासाहेब थकले नाहीत, ते नसते तर शिवाजी महाराजांना जाणणाऱ्यांची संख्या कमी असती.’ ब. मो. पुरंदरे या सामान्य माणसाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होण्याचा प्रवास उलगडताना शाह यांनी मैथिलीशरण गुप्त यांच्यापासून ते रामायण, महाभारताचे दाखले दिले. छोट्या-मोठ्या कार्यक्रमात स्वनाममुद्रेची पाटी लावण्यासाठी धडपणाऱ्या राजकारण्यांनी जाणीव ठेवावी की, ४३८ कोटी रुपये खर्च करून उभ्या राहात असलेल्या शिवसृष्टीवर बाबासाहेब पुरंदरे यांची नाममुद्रा नाही, याचा उल्लेखही शाह यांनी केला. शिवाजी महाराज स्वधर्मासाठी लढले, स्वभाषेचा आग्रह धरला, स्वराज्यास राजमुद्रा दिली, हा शाह यांच्या भाषणातील संदर्भही महत्त्वाचा होता.
‘महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठान’ची स्थापना श्रीमंत राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मंडळींनी दि. ७ एप्रिल १९६७ रोजी केली. शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार, त्यातून राष्ट्रीय कार्य घडावे, या ध्येयाने हे प्रतिष्ठान काम करीत आहे. पुढे स्थायी आणि भरीव स्वरूपाचे काही निर्माण व्हावे, या भावनेतून उभी राहिली ‘शिवसृष्टी’! ती पुण्यापासून ११ किलोमीटर अंतरावर पुण्याच्या दक्षिण भागात आंबेगाव (बु), पुणे येथे असून, शिवजयंतीच्या निमित्ताने अमित शाह यांच्या हस्ते या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
‘शिवसृष्टी’मध्ये सरकारवाडा, रंगमंडल, गंगासगर, भवानीमाता स्मारक, डार्कराइड, राजसभा, माची, बाजारपेठ, कोकण ग्राम, आकर्षण केंद्र, लँड स्केपिंग, हार्ड स्केपिंग, तटबंदी, अश्वारोहण इत्यादि उभारण्यात येणार आहे. यासाठी ४३८ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात सरकारवाडा, भव्य ग्रंथालय तसेच प्रदर्शनी दालनामध्ये शिवकालीन किल्ल्यांची प्रतिकृती मांडण्यात आली आहे. आग्र्याहून सूटका, छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण, रायगडाची हवाई सफर, शिवराज्याभिषेक, शस्त्र प्रदर्शन उभारण्यात आली आहे. पहिला टप्पा शिवभक्तांसाठी खुला झाला असून पुढच्या तीन टप्प्यात भवानीमाता स्मारक, राजसभा इत्यादि कामे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सत्तालालसेपासून दूर असणे, अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारणे आणि स्वधर्मासाठी निष्ठेने लढणे, ही मूल्ये शिवसृष्टीतून जगभरात पसरतील.
निखिल कैलास नानगुडे,
उद्योजक, इतिहासाचे अभ्यासक