पोरी खेळतात ते क्रिकेट असतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 10:03 AM2022-10-17T10:03:54+5:302022-10-17T10:04:18+5:30
क्रिकेटने आपली परिभाषा बदलायला सुरुवात केली आहे. महिलांचे आयपीएलही आता येऊ घातले आहे. त्यातून गावखेड्यातल्या अनेक मुलींना संधी मिळू शकेल.
ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा याचा विचार मी करत नाही, आम्ही जिथं वाढलो, जसे जगलो तिथं एवढा विचार करायला वेळ नसतो. तहान लागली आहे, घोटभर का होईना पाणी ग्लासमध्ये आहे, मी पिऊन टाकलं, त्या क्षणी तहान भागली, विषय संपला, पुढचं पुढे... -एका मुलाखतीत महेंद्र सिंग धोनीने एकदा सांगितले होते. स्मॉल टाऊन अर्थात लहान गावात वाढणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी झगडणाऱ्या अनेकांची ‘प्रोसेस’ धोनी सांगत होता. फार लांबची स्वप्नं न पाहता, आज दोन पाऊलं तरी पुढे सरकता आलं, याचा आनंद किती महत्त्वाचा असतो, याचीच ही गोष्ट.
तसाच आनंद हरमनप्रीत कौरच्या भारतीय (महिला) क्रिकेट संघाने बांगलादेशात सिल्हेट येथे साजरा केला. टी-ट्वेन्टी आशिया कप सातव्यांदा जिंकत भारतीय क्रिकेटची पताका अभिमानानं उंचावली. विजेता चषक स्वीकारल्यावर हरमनप्रीत जे सांगत होती ते धोनीच्या स्मॉल टाऊन प्रोसेसशी नातं सांगणारंच होतं. ती म्हणाली, ‘आम्ही स्कोअरबोर्डकडे पाहत नव्हतोच, आम्ही आमच्यासाठी लहान लहान (शॉर्ट) टार्गेट्स ठरवली होती. तेवढंच आम्ही पाहत होतो, ते जमलं - यशस्वी झालो!’
भारतीय महिला क्रिकेटचा गेल्या २०-२२ वर्षातला प्रवासही या ‘शॉर्ट टार्गेट्स’चीच गोष्ट आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी नुकत्याच निवृत्त झाल्या. सलग इतकी वर्षे खेळत राहणं, कामगिरी दाखवणं आणि कितीही वाट अवघड झाली तरी क्रिकेटचा मार्ग न सोडणं, हे या दोघींनी आपल्या हिमतीवर करुन दाखवलं. मागून येणाऱ्या मुलींसाठी वाट सोपी केली. वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिक्स, अंजूम चोप्रा, पुनम यादव ही अजून काही उत्तम खेळाडूंची नावं. आज भारतीय संघात उत्तम कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राजेश्वरी गायकवाड यांच्यासारख्या अनेक मुली लहान शहरांतून, गावांतून आलेल्या आहेत. ज्याला ‘धोनी इफेक्ट’ म्हणतात त्या स्मॉल टाऊन जिद्दीचीच गोष्ट त्या सांगतात.
क्रिकेट हा मुलींचा खेळच नाही, बायकांच्या क्रिकेटला ग्लॅमरच नाही, खेळायला सोबती नाहीत, मैदानं नाही, पीच नाहीत, स्पॉन्सर्स नाहीत, मुलींनी घराबाहेर पडून मैदानावर खेळायला जाणं, हेच ज्या वातावरणाला रुचणारं नाही, त्या वातावरणातून या मुली क्रिकेट खेळू लागल्या. सुदैवानं अनेकींच्या पाठीशी त्यांचे पुरुष प्रशिक्षक, वडील, भाऊ, मित्र उभे राहिले आणि या मुलींनी क्रिकेटला ‘जेंडर डिस्क्रिमिनेशन’पलीकडे न्यायला सुरुवात केली. हरमनप्रीत किंवा स्मृती मंधाना बॅटिंग करतात तेव्हा त्यांची बॅटिंग पाहताना कुणीही सहज विसरुन जावं, की खेळाडू महिला आहे की पुरुष. स्मृतीने अंतिम सामन्यात २५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या, तिची फलंदाजी अत्यंत शैलीदार, तंत्राचा हात धरुन, तुफान फटकेबाजी करणारी होती. हा खेळ पाहूनही कुणाला प्रश्नच पडला असेल की, क्रिकेट बायकांचा खेळ नाही तर तो केवळ त्याच्या दृष्टीचा किंवा पुरुषी ‘बायस’चा प्रश्न असावा, क्रिकेटचा नव्हे.
क्रिकेटने आपली परिभाषा मैदानाबाहेरही बदलायला कधीच सुरुवात केली आहे. बॅटर, परसन ऑफ द मॅच हे शब्दही सहज स्वीकारले जाऊ लागले आहेत. आता तर महिला आयपीएलचीही घोषणा बीसीसीआयने केली आहे. त्यातून गावखेड्यातल्या अनेक मुलींना संधी मिळू शकेल. निदान पैसा - प्रसिध्दीमुळे तरी पालक आणि समाज आपल्या मुलींचा खेळण्याचा मार्ग अडवून ठेवणार नाहीत. महिला क्रिकेट सामन्यांचंही थेट प्रक्षेपण सुरु झाल्यानं खेळाडू आणि खेळाची लोकप्रियताही वाढीस लागेल आणि आशा करु की, भविष्यात भारतीय महिला संघाने सामना किंवा मालिका जिंकल्यावरही तसाच जल्लोष होईल, जसा पुरुष संघाने जिंकल्यावर होत असतो...
अर्थात या खेळाला खरोखर प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी भारतीय महिला संघाला अजून अशा बऱ्याच मालिका जिंकाव्या लागणार आहेत... अपेक्षांचं ओझं जसं पुरुष क्रिकेट संघांवर असतं, तसंच महिला संघावरही असणारच, त्याला इलाज नाही..
अनन्या भारद्वाज,
ज्येष्ठ पत्रकार