विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 06:01 AM2024-05-27T06:01:59+5:302024-05-27T06:03:53+5:30
मेंदूसह महत्त्वाच्या अवयवांवर सध्याच्या उन्हाळ्याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे!
-डॉ. समीर फुटाणे, न्यूरोसर्जन, नाशिक
रणरणत्या उन्हाळ्याच्या तलखीने सध्या आख्खा देश भाजून निघतो आहे. ‘यावर्षी फारच त्रास होतोय,’ असे आपण दर उन्हाळ्यात म्हणतो; पण यंदा तो दाह सर्वांनाच कितीतरी अधिक प्रमाणात जाणवतो आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उकाडा इतका असह्य आहे, की कशातच लक्ष लागत नाहीये, अशा तक्रारींत मोठी वाढ झालेली दिसेल.
या वाढत्या उष्म्याचा आपल्या मेंदूवरही मोठा परिणाम होतो आणि येत्या काळात उन्हाळ्याचा पारा असाच चढता राहिला, तर हा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करू शकेल. त्याबाबतची चर्चा सध्या जगभरात सुरू झाली आहे. मेंदू हा आपला छोटा अवयव असला तरीही त्याचे काम सुरळीत चालण्यासाठी मेंदूला सगळ्यांत जास्त रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन लागतो. उन्हामुळे त्वचेच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि घाम येतो. घामाचे बाष्पीभवन होऊन शरीराला थंडावा जाणवावा, यासाठी शरीराने केलेली ही अंतर्गत व्यवस्था आहे; पण त्यामुळे बराचसा रक्तपुरवठा त्वचेकडे जातो आणि मेंदूकडे त्या मानाने कमी! या दरम्यान मेंदूला ऑक्सिजनसुद्धा कमी मिळाल्याने मेंदूचे काम जरा हळू चालते, यालाच ‘कॉग्निटिव्ह डिक्लाईन’ असे म्हणतात.
हवेतला उष्मा वाढतो, तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन (कॉर्टिसॉल)चे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात दिवसाची लांबी वाढल्याने मेलॅटोनीन (झोपेचे संप्रेरक) कमी झालेले असते. याशिवाय सतत उकाड्यामुळे झोप येण्यासाठी लागणारा विसावा दुर्मीळ होतो. यामुळे झोप कमी होऊन चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते, थकवा जाणवतो. मानसिक आजाराच्या रुग्णांना तर याचा फारच त्रास होतो. हवेतील उष्म्यामुळे घाम येऊन शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे स्नायूंचे अतिआकुंचन होऊन पोटरीत पेटके येणे यांसारखे त्रास होतात. पुरेशा प्रमाणात पाणी, लिंबू, मीठ-साखर घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे.
मेंदूमधला हायपोथॅलॅमस हा भाग शरीरातील तापमापकाचेही काम करतो. तहान लागणे, घाम येणे, लघवीचे प्रमाण, इत्यादी शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवून मेंदू शरीराचे तापमान ३७ अंशांच्या आसपास ठेवतो; पण कधी-कधी अतिउष्णतेने हा तापमापक बिघडतो आणि वयस्कर व्यक्ती, लहान मुले किंवा ज्यांना उन्हात काम करावे लागते अशा व्यक्ती उष्माघाताला बळी पडतात.
शरीराचे तापमान अनियंत्रित झाल्याने, मेंदूच्या पेशीतील कवच काहीसे मेणासारखे वितळते; त्यामुळे मेंदूतील ऊर्जाप्रवाह खंडित होऊन बेशुद्धावस्था येते. शरीराची ऑक्सिजन आणि रक्ताची मागणी वाढल्याने हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब कमी व्हायला लागतो. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते आणि मेंदूच्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये गुठळी निर्माण होऊन मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो, त्याला ‘कॉर्टिकल व्हेनस थ्रोम्बोसिस’ असे म्हणतात. कितीतरी कष्टकरी लोक उन्हात काम करताना दिसतात, त्यांतील सगळ्यांना का उष्मघात होत नाही ? - या प्रश्नाचे उत्तर शरीराच्या रचनेत दडलेले आहे. एकदा एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला. तो आणि त्याचा मित्र, एका बेकरीच्या भट्टीमध्ये गेले आणि हळूहळू त्यांनी तिथले तापमान वाढवण्यास सुरुवात केली. पारा ३० अंशांवरून चढत-चढत काही तासांमध्ये १०० अंशांपर्यंत नेला; पण खूप घाम आला तेवढाच. त्याखेरीज त्यांना फारसे काही झाले नाही. प्रयोगाच्या दुसऱ्या भागात ते एका १०० अंश सेल्सिअसच्या भट्टीशेजारी अचानक गेले.
या वेळेस होरपळल्यासारखे वाटून त्यांना त्वरित पळावे लागले. पहिल्या प्रयोगात हळूहळू तापमान वाढल्याने त्यांच्या मेंदूला ‘सेटिंग चेंज’ करायला वेळ मिळाला जो दुसऱ्या वेळी मिळाला नाही. म्हणूनच थंड एसीमधून कडक उन्हात लगेच जाऊ नये किंवा कडक उन्हातून लगेच एसीत प्रवेश करू नये.
उन्हाळ्याचा असह्य दाह सहन करत असताना केवळ (ज्यांना परवडेल त्यांनी) एसी किंवा पंख्याचे बटण दाबले म्हणजे तात्पुरता दिलासा मिळेल कदाचित; पण हे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही. मेंदूसह अनेक महत्त्वाच्या अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे, हे सगळ्यांनीच ध्यानी घेतलेले बरे!
-डॉ. समीर फुटाणे
sfutane@gmail.com