अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 07:23 AM2024-03-18T07:23:59+5:302024-03-18T07:24:55+5:30

दादर रेल्वेस्थानकाबाहेर बटाटेवडे विकणाऱ्या अशोक वैद्यांना तब्बल ६० वर्षांपूर्वी जे स्वादिष्ट प्रकरण सुचले, त्याला आता जागतिक मान्यता मिळाली आहे!

Special Article on Vada pav as it gets placed among top 20 sandwiches in the world | अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी!

अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी!

रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

मुंबईत जन्मलेल्या झणझणीत चवीच्या घमघमीत खमंग वडापावने अखिल विश्वातील सँडविचच्या जातकुळातील सर्वोत्तम पदार्थांच्या यादीत स्थान पटकावले, ही बातमी मुंबईकरांना भलतीच सुखावणारी आहे. मुंबईशी नाळ जोडला गेलेला वडापाव  आता या शहराच्या संस्कृतीचाच एक भाग झाला आहे. एखादा खाद्यपदार्थ एका शहराशी कसा एकरूप होतो आणि जगभरात प्रसिद्धी पावतो, याचे हे उदाहरण. टेस्ट ॲटलस या लोकप्रिय फूड ॲण्ड ट्रॅव्हल गाइडने जारी केलेल्या यादीत वडापावने १९ वा क्रमांक पटकावला; यानिमित्ताने मुंबईच्या वडापावने चार-पाच पिढ्यांचे पालनपोषण कसे केले, हे पाहायला हवे.

बटाटावडा हा खास मराठमोळा खाद्यपदार्थ. त्याचा वडापाव करत तो पोटभरीचा खाद्यपदार्थ करण्याची किमया साधली ती अशोक वैद्य यांनी.  दादर रेल्वेस्थानकाबाहेर बटाटेवडे विकणाऱ्या अशोक वैद्य यांनी  स्वादिष्ट बटाटावड्याची मोट इराणी हॉटेलात मिळणाऱ्या लुसलुशीत पावाशी बांधली. पाव सुरीने कापून आतील भागात मिरची आणि कोथिंबिरीची हिरवीगार तसेच लसणाची लालभडक चटणी चोपडून त्यात बटाटेवडा कोंबून विकण्याची आयडिया वैद्यांची! त्याला खवय्यांचा भरघोस प्रतिसाद मिळण्याची कारणे अनेक.   तेव्हा दादरमध्येच राहणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही या वडापावचे चाहते होते. महापालिका अधिकाऱ्यांकडून वैद्यांच्या स्टॉलला विरोध होत असल्याचे समजताच त्यांनी त्या अधिकाऱ्यांना आपल्या भाषेत समज दिली.  दाक्षिणात्य खाद्यपदार्थांशी स्पर्धा करण्यात मराठी वडापाव विक्रेत्यांना राजकीय पाठबळ दिले ते शिवसेनाप्रमुखांनी. वडापावच्या चवीत अधिकची भर टाकायला त्या वेळची एकूणच मुंबईची सामाजिक स्थितीही कारणीभूत ठरली. सहा दशकांपूर्वीच्या त्या काळात मुंबईत गिरणी उद्योगाचे वर्चस्व होते. वेतन तुटपुंजे असल्याने  गिरणी कामगारांना हा स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थ एकदमच भावला. प्रत्येकी दहा पैशांना मिळणारे दोन-चार वडापाव खाऊन एकवेळची भूक आरामात निभावली जाई...

कालांतराने गिरण्यांचा संप झाला तेव्हा  कामगारांच्या पोटाची दोन्ही अर्थाने खळगी भरण्यासाठी वडापावच धावून आला.  नाक्यानाक्यावरच्या वडापावच्या गाड्यांनी बेरोजगार झालेल्या हजारो गिरणी कामगारांना रोजगार मिळवून दिला. काही कामगारांनी गाड्या लावल्या, तर काहींना त्या गाड्यांवर बटाटेवडे तळण्याचे, साफसफाईचे, धंदा सांभाळण्याचे काम मिळाले. मुंबई सोडण्याची वेळ आलेल्या अनेक गिरणी कामगारांनी मुंबईचा निरोप घेताना वडापावही आपल्यासोबत नेला नशीब आजमावण्यासाठी परप्रांतातून मुंबईत येऊन संघर्ष करणाऱ्यांसाठीही वडापाव  तारणहार ठरतो.  वडापाव आता जगभरातील अनेक देशांमध्ये उपलब्ध झाला आहे. रिझवी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये लंडनमध्ये वडापावचे हॉटेल सुरू केले. आरोग्यतज्ज्ञ डीप फ्राय वडापाव कमी प्रमाणात खाण्याचे कितीही इशारे देत असले तरी दरवर्षी २३ ऑगस्टला जागतिक वडापाव दिन गाजावाजा करत साजरा केला जातो.

उद्योगपती धीरज गुप्ता यांनी वडापावचे भारतीय बर्गरमध्ये रूपांतर करून फूड चेन सुरू केली असली तरी रस्त्यावरील वडापावची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. अमेरिकन फास्ट फूड चेन मॅकडोनल्डने १९९० मध्ये भारतात फास्ट फूड चेन सुरू केली तेव्हा वडापावची लोकप्रियता घटेल अशी अटकळ बांधली जात होती. पण, वडापाववर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

टेस्ट ॲटलसच्या यादीत वडापावला मिळालेली जागा म्हणजे कधीकाळी उच्चभ्रूंकडून बॉम्बे बर्गर म्हणून हिणवल्या गेलेल्या वडापाववर उमटलेली वैश्विक मान्यतेची मोहरच होय.

ravirawool@gmail.com

 

Web Title: Special Article on Vada pav as it gets placed among top 20 sandwiches in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.