विशेष लेख: पाण्यासाठी पेट्रोलसारखे पैसे मोजावे लागले तर?
By विजय बाविस्कर | Published: April 4, 2023 09:39 AM2023-04-04T09:39:20+5:302023-04-04T09:39:43+5:30
जागतिक साधनसंपत्ती म्हणून पाण्याचे मूल्य लक्षात घेता त्याचे वर्णन ‘आगामी काळातील तेल’ असे केले गेले आहे. खरेच तसे झाले तर?
विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत
वर्ष २०५० उजाडेपर्यंत म्हणजे आणखी फार फार तर २७ वर्षांपर्यंत जगातील अर्ध्या लोकसंख्येसमोर पाण्याचे संकट असेल. जगभरात पाण्याचा एकूण वापर जेवढा होतो, त्यातील २५ टक्के वापर एकट्या भारतात होतो. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार २०५० पर्यंत जगभरात पाण्याची मागणी आजपेक्षा तब्बल ५५ टक्क्यांनी वाढणार आहे. हे इतके पाणी मिळविणार कोठून, हा प्रश्न जगाला सतावत आहे. पाण्याची ही टंचाई लक्षात घेऊन भविष्यातील ‘तेल’ असे पाण्याला म्हटले जाऊ लागले आहे. खरेच तसे झाले तर?
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१ टक्के असले, तरी पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३ टक्के आहे. या तीन टक्के पाण्यावरच आपला सारा खेळ आहे. सर्व जिवांना जगण्यासाठी पाणी लागते. अशा स्थितीत पेट्रोलची जागा या पाण्याने घेतली तर काय होईल?
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात पाणीटंचाई उभी राहिली. प्रत्येक व्यक्तीला तिथे दिवसाकाठी ५० लिटरची मर्यादा घालण्यात आली. भारताने २०१९ मध्ये चेन्नईत अभूतपूर्व पाणीटंचाई अनुभवली. केपटाऊनच्या आधीच रेल्वेने पाणी आणून महाराष्ट्रातील लातूरची तहान भागवावी लागली. पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपत आहे, हे सांगण्यासाठी आणखी किती उदाहरणे द्यायची? उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेजवळ बुंदेलखंड भागात मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. कारण काय, तर इथे महिलांना पाण्यासाठी रोज मोठी पायपीट करावी लागते. महाराष्ट्रातदेखील असे ‘बुंदेलखंड’ आढळतील. विशेषत: मराठवाडा, विदर्भात अशी गावे शोधणे कठीण नाही. लग्नाचा विचार आला की या गावात आधी डोळ्यांत पाणी येते. ते पैशांसाठी नाही तर लग्नासाठी पाणी कोठून आणायचे यासाठी! एकतर पुरेसे पाणी मिळत नाही. मिळाले तरी ते शुद्ध असेलच याची खात्री नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगातील २६ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट- २०२३’मध्ये प्रत्येकाला २०३० पर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रूपरेषा देण्यात आली आहे. या अहवालानुसार गेल्या ४० वर्षांत जागतिक पाण्याचा वापर दरवर्षी सुमारे एक टक्का दराने वाढत आहे. जीव जगवणारे पाणी दूषित झाले की मृत्यूचे कारण ठरते. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२२ च्या अहवालानुसार दूषित पाणी प्यायल्याने जगभरात दरवर्षी १४ लाख लोकांचा मृत्यू होतो. ७.४ कोटी लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. पाणीटंचाईच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामांमुळे भारतात दरवर्षी दोन लाखांहून अधिक लोक जीव गमावतात. ‘युनिसेफ’च्या २०२१ च्या आकडेवारीनुसार चारपैकी एकाला म्हणजेच साधारण दोन अब्ज लोकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही.
जगाच्या लोकसंख्येतील १७.५ टक्के लोक भारतात राहतात. मात्र, पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या स्रोतांपैकी केवळ चार टक्के स्रोत भारतात आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात पाण्याचा वापरही वाढू लागला आहे. विकसित देश आणि विकासाच्या वाटेवर असलेले भारतासारखे देश भविष्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाने हैराण आहेत. समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा न परवडणारा प्रकल्प याच चिंतेतून आकाराला येऊ पाहत आहे. पाण्यावरून तिसरे महायुद्ध होईल की नाही माहीत नाही. मात्र, पाण्यासाठी सख्ख्या भावापासून ते गाव, विभाग, राज्य आणि देशांची भांडणे आपण पाहतच आहोत. त्याचे जागतिक पडसाद कधी उमटतील, याचा नेम नाही. संयुक्त अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार सर्वाधिक ७० टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते. २२ टक्के पाणी उद्योगासाठी आणि ८ टक्के पाणी घरगुती वापरासाठी लागते.
महाराष्ट्रातील राजकारणाचा पाया हा सहकारी साखर कारखाने आहेत. पश्चिम महाराष्ट्रात असे आहेच. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळी भागातही हेच घडते आहे. परिणामी, राज्यात धरणाच्या पाण्यातील जवळपास ७० टक्के पाणीवाटा हा उसाची शेती संपवत आहे. राज्यातील आठ विभागांत गतवर्षी उसाचे जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्र वाढले. मग पाणीबचत कशी होणार? ठिबक सिंचन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे, ही त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब. मात्र, ठिबकचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ती किती?
पृथ्वीवरील पाण्याची स्थिती समजून घेण्यासाठी नासाने २००२ मध्ये ग्रेस मिशन सुरू केले. जवळपास १५ वर्षे हे अभियान चालले. नासाच्या निरीक्षणानुसार जिथे मुबलक पाणी आहे तिथे वारंवार पूरस्थिती ओढवते आणि कोरड्या प्रदेशांमध्ये वारंवार दुष्काळ पडतो. वातावरण बदलाचा परिणाम आम्हाला कोणते दिवस दाखवेल याचा अंदाज येत नाही. २२ मार्चला जगभरात जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. अशा दिवशी पाण्याचे महत्त्व पटवून देणे-घेणे होते तेवढेच, पुन्हा येरे माझ्या मागल्या.
नासाच्या स्ट्रेटोस्फियर ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमीने चंद्रावर पाण्याचा शोध लावला. नासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठ्या खड्ड्यांपैकी एक असणाऱ्या क्लेवियस क्रेटरमध्ये पाण्याचे अणू आहेत. चंद्रावर पाणी आहे, हे चांगलेच, पण निसर्गाने पृथ्वीवर भरभरून पाणी दिले आहे. ते वाचवायचे कसे? मुरवायचे कसे आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते उरवायचे कसे? त्याचा विचार आणि त्यानुसार कृती सर्वांनीच करायला हवी.
विजय बाविस्कर (vijay.baviskar@lokmat.com)