ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का?

By Shrimant Mane | Published: January 13, 2024 07:49 AM2024-01-13T07:49:20+5:302024-01-13T07:49:47+5:30

पुढच्याच ठेच लागली की मागच्यांना शहाणे बनविणारा जनुकांमधील संवाद, पेशींच्या घडण्या-बिघडण्याचे संदेश यात म्हातारपण लांबवण्याचे रहस्य सापडू शकते!

Special Article on Will the Miracle of Pushing Old Age Happen | ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का?

ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का?

-श्रीमंत माने,  संपादक, लोकमत, नागपूर

म्हातारपण येते, गात्रे थकायला लागतात, शरीराच्या हालचाली मंदावतात म्हणजे नेमके काय होते? साध्या भाषेत सांगायचे तर शरीरातील पेशींची संख्या घटायला लागते. बिघडलेल्या पेशींची दुरुस्ती किंवा नष्ट होणाऱ्या पेशींची जागा नव्या पेशींनी घेण्याची प्रक्रिया, वेगवेगळ्या अवयवांमधील ऊतींचा क्रियाकलाप संथ होतो. थोडे अधिक वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर हे पेशींमधील घडण्या-बिघडण्याचे संदेश एकमेकींना देणे थांबले की, शरीराचे बॉयोलॉजिकल क्लॉक आवरते घ्यायला लागते.

तर आता विज्ञानाच्या नवनव्या संशोधनांमधून हे बॉयोलॉजिकल क्लॉक सतत टिकटिक कसे करीत राहील हे शोधून पाहिले जात आहे. आहार, आजार, उपचार यांवर अविरत संशोधन सुरू आहे. अगदी असाध्य अशा विविध आजारांवर उपचार उपलब्ध झाले आहेत किंवा होत आहेत. त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढत चालले आहे. परिणामी, पूर्वीची साठी आता ऐंशी बनली आहे. माणसे सहजपण नव्वद, शंभर वर्षे जगत आहेत आणि येत्या काही दशकांमध्ये पृथ्वीवरील माणसांचे सरासरी आयुष्यमान अगदी सव्वाशे वर्षांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे.

तरीदेखील माणूस म्हातारा होण्याच्या प्रक्रियेवर मात्र काही खात्रीशीर तोडगा हाती न लागल्याची खंत आहेच. अर्थात, भविष्यातील असा वृद्धत्वाची गती कमी करणारा, आयुष्य वाढविणारा तोडगा काय असू शकेल, हे मात्र एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील जैवशास्त्रज्ञ अँड्र्यू डिलीन हे त्याच्या केंद्रस्थानी आहेत. सायन्स ॲडव्हान्सेसच्या ऑक्टोबर २०२३ अंकात ते संशोधन प्रसिद्ध झाले तर गेल्या आठवड्यात BioRxiv नियतकालिकात त्याचा पुढचा भाग प्रकाशित झाला. अर्थात, हे संशोधन माणसांशी संबंधित नाही, तर अगदी सूक्ष्म अशा कृमीवरचे आहे. आपले ताळतंत्र बिघडल्याबद्दल जनुके, पेशी एकमेकींशी जणू बोलतात, हा त्याचा सार मात्र सुखद आहे.

डिलीन यांच्यासह काही संशोधकांना तीस वर्षांपूर्वीच आढळून आले होते, की वृद्धत्वाकडील हा प्रवास संपूर्ण शरीरातील पेशींच्या ऱ्हासावर अवलंबून नसतो तर त्यामागे एखादे विशिष्ट जनुकच असते. ते संशोधन बहुपेशीय कृमींवर झाले होते आणि त्या कृमींच्या मेंदूतील माइटोकाँड्रियातील बिघाडामुळे त्यांचे आयुष्य कमी होण्याऐवजी ५० टक्क्यांनी वाढते, असा निष्कर्ष समोर आला होता.

हे माइटोकाँड्रिया केवळ कृमीच नव्हे तर माणसांच्या शरीराचेही पॉवरहाउस मानले जाते. मराठीत तंतूकणिका म्हणविले जाणारे माइटोकाँड्रिया सामाजिक समजले जाते. त्याला ‘शरीराची वॉकीटॉकी’ असेही म्हणतात. विशेषत: मेंदूच्या पेशींमधील तंतूकणिका शरीराच्या विविध अवयवांमध्ये जे संदेश पाठवतात त्यावर सजीवाचे आयुष्य ठरते, असे मानले जाते. ते शरीराचे पॉवरहाउस यासाठी म्हणायचे, की रेणूंच्या रूपातील ऊर्जानिर्मिती हे त्याचे मुख्य कार्य आहे. शिवाय, पेशींची वाढ व मृत्यू यावर त्याचे नियंत्रण आहे. याची स्वतंत्र संरचना आहे. त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या आम्लातील बिघाडामुळेच स्मृतिभ्रंश, पार्किन्सन अथवा वार्धक्याशी संबंधित अनेक आजार तसेच काही प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.

अँड्र्यू डिलीन यांना Caenorhahilies Elegans नावाच्या कृमीवर संशोधन करताना दहा वर्षांपूर्वी अनपेक्षितरीत्या आढळले होते की, जनुकीय बिघाड झालेल्या माइटोकाँड्रियामुळे खरेतर कृमीचा मृत्यू जवळ यायला हवा होता; परंतु, तसे न होता त्या अळीचे आयुष्य पन्नास टक्क्यांनी वाढते. हे नेमके का व कसे घडते याचा तेव्हापासून ते शोध घेत होते आणि आता असे दिसून आले आहे की, बिघडलेली व सुस्थितीत असलेली जनुके जणू आपसात संवाद साधतात. एकमेकांना संदेश देतात. मेंदूतील तंतूकणिकेत काही बिघाड झाला किंवा त्याची हानी झाली तर बिघडलेल्या जनुकातून बुडबुड्याच्या आकाराची  प्रथिनांची एक पुटिका इतर जनुकांकडे प्रवाहित होते आणि त्यातून शरीरातील इतर जनुकांना संदेश दिला जातो. मग, इतर जनुके आपली हानी होऊ नये ही काळजी घेतात.

तर हा असा पुढच्याच ठेच लागली की, मागच्यांना शहाणे बनविणारा जनुकांमधील संवाद, पेशींच्या घडण्या-बिघडण्याचे संदेश आणि वृद्धापकाळ दूर ढकलणारा चमत्कार माणसांना लागू होईल का, या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळणार नाही. कृमींमधील संशोधनाचे गृहीतक माणसांनाही लागू होईल, असे मानले तर मात्र एकूणच मानवी उत्क्रांतीच्या प्रवासातील हा सोनेरी क्षण ठरेल. तसे व्हावे यासाठी संशाेधकांना शुभेच्छा देऊया!

-shrimant.mane@lokmat.com

Web Title: Special Article on Will the Miracle of Pushing Old Age Happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य