विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

By Meghana.dhoke | Published: July 1, 2023 10:40 AM2023-07-01T10:40:08+5:302023-07-01T10:41:29+5:30

Ayodhya: ‘आदिपुरुष’मधले टपोरी संवाद, आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना आठवली अयोध्येत भेटलेली साधीभोळी माणसं!

Special Article : ...Samsar Ki Sari Peeda To Ramjine Bhi Sahi, To Hum Kya Hai? | विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

googlenewsNext

- मेघना ढोके
(संपादक, लोकमत सखी डिजिटल)

अयोध्येत शरयूकाठचं एक दृश्य विलक्षण मोहक आणि तितकंच भावुक असतं. तिथं भेटणारी अयोध्यावासी माणसं सांगतात, ‘रामजी के समय की यहाँ आज दो चिजे है, एक ये नाम, अयोध्याजी और दुसरी शरयूजी!’ 

त्याच शरयू काठी राम की पौडी अर्थात घाटावर मोठे स्क्रीन लागलेले दिसतात. स्क्रीनवर रामायण सुरू असतं.  (रामानंद सागरकृत टीव्ही सिरिअल). तिन्ही सांजेलाच नाही, तर अगदी सकाळी आणि दुपारी उन्हातही देशातून कुठकुठून आलेली माणसं  घाटावर बसून ते रामायण पाहत असतात. रडत असतात, हुंदक्यांचे आवाज ऐकू येतात.

लव-कुश गात असतात, ‘हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्रीराम की..’ विलक्षण असतं वातावरण! गोरगरीब साधी माणसं भान हरपून तो पडदा पाहतात. कथा सांगता सांगता लव-कुश गाण्यातून जाब विचारत असतात, जेव्हा माँ सीतेला बोल लावण्यात आला,  तेव्हा कुठे होतात तुम्ही अयोध्यावासी? कुठे होती राजमातांची ममता, कुठे होते ज्ञानी गुरुजन, कुठे होते सगळे भाऊबंद? 

जणू कुणी आज आपल्यालाच जाब विचारतं आहे असं वाटून माणसं शरमेनं मान खाली घालून बसतात, रडतात.  अयोध्येतली आणि अयोध्येबाहेरची, बहुतांश देशातल्या हिंदी पट्ट्यात जगणारी माणसं अयोध्येतल्या दहा दिवसांत भेटली. या शहरात राहणाऱ्यांसाठीही प्रभू श्रीरामाची रूपं वेगवेगळी आहेत. रामजन्मभूमीतले रामलला, कनक भवनातले ‘सरकार’ आणि घरोघर ठाकूरजींच्या रूपात असलेलेही “श्रीराम”!

आपण स्वत: जेवणापूर्वी ठाकूरजींना काय ‘भोग’ लावायचा याची काळजी माणसांना असते.  काही घरात तर आर्थिक चणचणही असते; पण तरीही घाटांवरच्या गल्ल्यांत, पंडे असणाऱ्या कुटुंबात, मठ-मंदिरात कुठंही जा, श्रद्धा एकच, ‘ठाकूरजी अपनी व्यवस्था खूद करते है!’ 

अगदी कोरोनाकाळात जेव्हा या तीर्थक्षेत्री गावात कुणी येऊ शकत नव्हतं तेव्हाही आपल्या पोटापाण्यापेक्षा इथं माणसांना चिंता होती की ठाकूरजींना भोग लागला पाहिजे!  अयोध्येतली माणसं ठाकूरजींकडे पाहून जगतात. भोग-प्रसाद, बालभोग, कच्चा प्रशाद-पक्का प्रशाद यशाशक्ती आधी त्यांना देतात. म्हणतात, ‘संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है? यहीं तो जीवन की माया है!’ - चर्चा काहीही सुरू असो, उत्तरादाखल रामजींच्या जीवनातला एखादा दाखला येतोच.

आपली सुख-दु:खं आपण भोगायची, त्यासाठी देवाला संकटात घालायचं नाही या समजुतीनं जगणारी माणसं अनेक गोष्टी विनातक्रार सहज स्वीकारतात. जगणं जसं आहे तसं स्वीकारण्याचा समंजस सहजभाव माणसांच्या वागण्या-बोलण्यात ठायीठायी भेटतो.

जगण्याच्या अडचणी कुठे कुणाला चुकल्या म्हणा! पण श्रीरामाच्या भूमीतल्या माणसांचा भरवसा फक्त दोघांवरच. एक रामजी, दुसरे हनुमानजी.  श्रद्धेनं घरातल्या ठाकूरजींची तर पोटच्या बाळासारखी काळजी घेतली जाते, नैवेद्य दाखवण्याच्या वेळा सांभाळल्या जातात आणि काही अडलं, दुखलंखुपलं, अडचण आली तर मदत मागायला वडीलधाऱ्यांना भेटावं तसं रामाला - ‘कनक सरकार’ किंवा हनुमान गढीवर जाऊन हनुमानाकडे ‘सरकार’ म्हणून अर्जी दिली जाते.

शरयूकाठी चिरपुरातन नित्य नूतन एकच गोष्ट आहे असं साधीभोळी माणसं मानतात ! ती म्हणजे अयोध्या आणि रामकथा. इथं गोरगरीब माणसांच्या रोजच्या आयुष्यातही व्यावहारिक शहाणपण आणि जगण्याचा समंजस स्वीकार इतका सहज आहे की शहरी धामधुमीच्या स्पर्धात्मक जगाला ते सारं अजब वाटावं. अविश्सनीयही. 

हे सारं आठवलं कारण ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निमित्तानं झालेली चर्चा. त्या सिनेमातले टपोरी संवाद, सदा आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना अयोध्येत भेटणारी साधीभोळी माणसं आठवली. शरयूच्या काठचं ते जग पडद्यावरच्या ‘व्हीएफएक्स’सारखं चकाचक ग्लॅमरस अजिबात नाही; पण समाधानी-साधं आणि समंजस मात्र नक्की आहे..
    meghana.dhoke@lokmat.com

Web Title: Special Article : ...Samsar Ki Sari Peeda To Ramjine Bhi Sahi, To Hum Kya Hai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.