सत्त्वहीन जगात शिवचरित्राच्या जागरासाठी, हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:19 AM2021-07-29T07:19:35+5:302021-07-29T07:19:52+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज, २९ जुलै रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने..
‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट-जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने ‘वन्ही तो चेतवावा। चेतविता चेततो।’ या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभे राहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अभ्यासक, संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. हुंदडणारी उत्साही तरुण मुले भक्तिभावाने गडकोटांच्या भेटीला जाऊ लागली. बाबासाहेबांसमवेत रानवाटा शोधत तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागली. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे, दर्शनाचे, अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी ललितरम्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला. “वाणी नव्हे खङ्गधार। की विजेचा लोळ चर्रर्र। करी शिवसृष्टीचा उच्चार। जणू घन गडगडती।। अशी बाबासाहेबांची तेजस्वी वाणी आहे. हा व्रतस्थ शिवप्रेमी आणि असंख्य शिवप्रेमींचा गुरू. त्यांचे जीवनही तितकेच तेजस्वी.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच या मुलाच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. रात्ररात्र दप्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी जवळ पैसे नव्हते. मग, पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी ‘मराठा’तल्या अग्रलेखात लिहिले, “हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके सुंदर झाले आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की, काव्य आहे, इतिहास आहे की नाट्य आहे, याचा शब्दागणिक भ्रम पडतो. ते वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे की इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे, हे समजत नाही. हे अमर शिवचरित्र कालिदासाच्या कल्पनेने आणि भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिवनाट्य शेक्सपीअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा महान नाटककार या महाराष्ट्रात जन्माला यावा हे केवढे मोठे भाग्य!”
‘शिवप्रेम’ हाच शिवशाहिरांशी स्नेह जोडण्याचा मजबूत धागा आहे. आजही तरुण मुले किल्ले पाहायला निघतात, तेव्हा ही वार्ता ते बाबासाहेबांना पत्राने कळवतात. बाबासाहेब मग त्यांना आशीर्वाद लिहितात, “आपण छोट्या चित्त्यांची चपळसेना घेऊन गडकोटांची आणि दऱ्याकपाऱ्यांची मोहीम करीत आहात. मनसुबा बहुतच उत्तम आहे. किल्ले पुरंदरापासून तख्तनशील रायगडापावेतो आपले चित्ते झेप घेणार आहेत. या गडकोटांचा इलाखा बहुतच बेनझीर आहे. तेथील तटाबुरुजांचा तर इतिहास ऐसा की काळीज धुंद व्हावे. बारकाईने बघा. थोरले महाराज छत्रपतीसाहेबांची चरितकहाणी याच रानावनात फुलली. इथेच नौबती झडल्या. इथेच पोवाडे दणाणले. इथेच गुप्त कारस्थाने कुजबुजली. ती सारी लक्षात घ्या. मनात साठवा. तेव्हाच आपली मोहीम फत्ते होईल. पण, आपण वाऱ्यासारख्या भळाळणाऱ्या या उत्साहाला कृतीने नवा आकार द्याल, तेव्हाच त्याची सार्थकता ठरेल. प्रत्येक गडाचा बुरुज तुम्हाला म्हणेल, तुम्ही वेडे व्हा! बेचैन व्हा! बेभान व्हा! हाच या मोहिमेचा उद्देश आहे. बहुत काय लिहावे? फत्ते पावाल हाच शुभाशीर्वाद.” बाबासाहेबांनी गमतीने एका मुलाखतीत सांगितले, “मला तीन गोष्टींचा अतिशय कंटाळा आहे. एक दाढी करण्याचा, दुसरा झोपेतून उठल्यानंतर अंथरुण गोळा करण्याचा आणि तिसरा व्याख्याने देण्याचा. पहिल्या दोन प्रकारांतून मी माझी सुटका करून घेतली; पण, तिसरी गोष्ट वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या मानगुटीवर जी बसली तिने आजपर्यंत माझी पाठ सोडलेली नाही!”
त्यांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान झाले ते नागपूरला. २५ डिसेंबर १९५४. शिवचरित्रावरच्या त्या भाषणाला शंभर एक लोक उपस्थित होते. पुढे शिवचरित्रकथन हा त्यांचा ध्यास घेऊन ते जगभर फिरले. आज वयाची ९९ वर्षे पार झाली, तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरू आहे. अव्यभिचारी जीवननिष्ठा, घोर तपश्चरण, सातत्य आणि वक्तशीरपणा या सूत्रातले शिवशाहिरांचे जीवन हीच एक मूर्तिमंत गाथा आहे. ‘बेचैन जगा आणि चैनीत मरा’ हा वडिलांनी दिलेला मंत्र आजही बाबासाहेब प्राणपणाने जपतात. व्यासंग हीच त्यांची विश्रांती. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा आहे. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नसते. तिला मदतीचे हात असतात. शिकण्याची अनिवार ओढ असलेली नानाविध जातिधर्माची मुले पुरंदरे वाड्यात राहून शिकली. समाजाला ते सतत देत राहिले.
बाबासाहेबांचा गौरव करताना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते, “बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावे तर तिचे कार्य महाराष्ट्रभर पसरलेले आहे. संस्था म्हणावे तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. परमपवित्र अशा सगुण चरित्राची शाहिरी करावी ती बाबांनीच. शाबास, शाहिरा शाबास! या सत्त्वहीन, तत्त्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवते जातीने हजर राहतील. तुझ्या शिवकथेत न्हालेला हा महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील. हे घडावे यासाठी हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो! - प्राचार्यांचे शब्द खरे ठरण्याच्या क्षणाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतो आहे!
- प्रा. मिलिंद जोशी,
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
joshi.milind23@gmail.com