विशेष लेख: तुमच्या मुलाच्या मानेवर बसलाय बंद दारामागचा राक्षस... तो म्हणजे लॅपटॉप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 11:36 IST2025-03-29T11:35:53+5:302025-03-29T11:36:10+5:30
आपला मुलगा बाहेरच्या जगापासून सुरक्षित आहे, या (गैर)समजात राहू नका. ज्या खोलीत तुमचं बाळ लहानाचं मोठं झालं, त्या खोलीत एक राक्षस आहे : लॅपटॉप!

विशेष लेख: तुमच्या मुलाच्या मानेवर बसलाय बंद दारामागचा राक्षस... तो म्हणजे लॅपटॉप
भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार
ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टार्मर ब्रिटनच्या संसदेत बोलताना म्हणाले, ‘मी माझ्या सोळा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलीबरोबर एक मालिका बघितली, तुम्हीही बघा आणि आपल्या पुढच्या पिढीला वाचवा.’ - देशाच्या पंतप्रधानालाही अंतर्मुख करणारी ती मालिका आहे ‘अडॉलसन्स’. जगातल्या अडीच कोटींहून अधिक लोकांनी बघितलेली ही मालिका ब्रिटनमध्ये घडणाऱ्या एका गुन्ह्याबद्दल असली, तरी त्यातल्या एका मुद्द्यावर जगभर चर्चा सुरू आहे; तुमचा मुलगा काय करतो?
गोष्टीची सुरुवातच जेमीच्या अटकेने होते. ब्रिटनमध्ये तेरा वर्षांच्या जेमीने त्याच्याच शाळेतल्या पंधरा वर्षांच्या मुलीचा भोसकून खून केलाय. या जेमीच्या आयुष्यात काही मोठ्या समस्या आहेत का? - नाही. प्रेमळ आई-वडील आणि बहीण यांच्या चौकोनी कुटुंबात जेमी राहतो. घटना सीसीटीव्हीवर रेकॉर्ड झाली आहे तरी तो नकार देत राहतो. त्याच्या वडिलांना मनात कुठेतरी आशा वाटत राहते की, हे सगळं खोटं असेल, जेमी खुनी नसेल.
जेमीची अटक, घटनेची माहिती, चौकशी… तपास अधिकाऱ्यांची शाळेला भेट, शाळेतले जग, समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सहभाग, शाळेतले वातावरण... जेमी आणि त्याची मानसोपचार तज्ज्ञ या दोघांतला संवाद, अखेरीस जेमीचे आई-बाबा आणि बहीण यांनी केलेला परिस्थितीशी झगडा तसंच स्वीकार हे सारं सांगता सांगता या सगळ्या गोष्टीत एकच मुद्दा वारंवार येतो : मेल रेज किंवा पुरुषी राग.
हा राग मोठ्या दणकट पुरुषांचा नाही. जेमतेम किशोरवयीन असलेल्या मुलांना आलेला हा राग आहे. त्या मुलांना कुटुंबापासून दूर आणि ऑनलाईन कृष्णविवरात खेचणारी समाजमाध्यमं. ही त्यांना हा राग आणताहेत. आपला मुलगा बाहेरच्या अनिष्ट जगापासून सुरक्षित आहे या समजातल्या आई-वडिलांना सुतरामही कल्पना नाही की, ज्या खोलीत त्यांचं बाळ लहानाचं मोठं झालं, त्या खोलीत एक राक्षस बनतोय. शाळेसाठी लॅपटॉप घ्यावा लागला, रात्री उशिरापर्यंत काॅप्युटर सुरू असतो ही खंत आई-वडिलांना असते, पण मुलांना काही विचारलं की, राग येतो या विचाराने खोलीचे दार बंदच राहते.
‘बिग टेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपन्यांनी ऑनलाईन जगाचे गारुड जगावर पसरवले. ड्रग्जपेक्षाही भयंकर जागतिक व्यसनाची कोणतीही नैतिक जबाबदारी घ्यायला या कंपन्या तयार नाहीत. याचा दुष्परिणाम म्हणजे किशोरवयीन मुलांचे ऑनलाईन जगाला खरे जग मानणे. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटपासून अनेक व्हिडीओ गेम्सवर मुलांचा संवाद चालतो. निरूपद्रवी वाटणारे इमोजी प्रसंगी अत्यंत विखारी बनतात. याशिवाय मुलांच्या ऑनलाइन जगात वेगवेगळी वर्तुळे निर्माण होत आहेत, त्यातले एक मोठे वर्तुळ आहे, मॅनोस्फियर. याचा अर्थ स्त्रियांच्या विरोधात आलेल्या पुरुषांचे जग.
मॅनोस्फियरमधले पुरुष त्यांच्या समस्यांचे मूळ स्त्रिया आहेत आणि कोणत्याही मार्गाने त्यांना नमते घ्यायला लावणे हे गरजेचे मानतात. त्यामुळे स्त्रिया, मुलींवर झालेले गुन्हे, खून, बलात्कार या सगळ्याचे समर्थन या जगात होते. हे आपल्या मुलाच्या बाबतीत होत आहे, आपला मुलगा किंवा मुलगी कुणाला त्रास देत आहे, हे पालकांच्या गावीही नसते. मिसरूडही न फुटलेल्या मुलांना इनसेल (Incel - Involuntary celibates) म्हणून हिणवले जाते. ‘तुम्हाला कोणतीही स्त्री लैंगिकसुख देणार नाही, ही तुमची लायकीच नाही’, अशा भाषेत त्यांना डिवचले जाते. या आणि अशा शेकडो गोष्टी पालकांना माहीत नाहीत.
‘अडॉलसन्स’मधला जेमीचा बाबा अगतिकपणे आपल्या बायकोला विचारतो, ‘आपण या मुलाला घडवलं?’ या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आईकडे नाही. पण या मालिकेमुळे अशी मुलं घडू नयेत म्हणून काय करता येईल, यावर चर्चा सुरू झाली. त्यावर एकच उत्तर आहे : संवाद. स्वकेंद्रित आयुष्य हे अनेकवेळा धोकादायक ठरते. कुटुंबात संवाद असेल तर इमोजींची भाषा आणि आपली भाषा एक होईल. इंग्लंड, अमेरिकेत हे सगळं घडतं असं जरी वाटत असेल तरी हा राक्षस तुमच्या-माझ्या घरातल्या खोल्यांच्या बंद दारांमागेही उभा राहतो आहे हे लक्षात घ्या, वेळीच जागे व्हा.
bhalwankarb@gmail.com