विशेष लेख: महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्षकथा

By वसंत भोसले | Updated: January 24, 2025 10:05 IST2025-01-24T10:01:52+5:302025-01-24T10:05:23+5:30

Jaisingrao Pawar: ख्यातनाम इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने...

Special Article: The Struggle Story of Maharani Tarabai's Life and Work | विशेष लेख: महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्षकथा

विशेष लेख: महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्षकथा

- वसंत भोसले
(संपादक, लोकमत कोल्हापूर)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई आणि ज्यांनी मोगलशाही विरोधात एक हाती सात वर्षे संघर्ष केला, शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचे रक्षण केले, अशा स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे पहिले समग्र चरित्र आज (शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी) प्रसिद्ध होत आहे.  ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.  जयसिंगराव पवार यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून सिद्ध केलेला हा ग्रंथ एक नवीन दृष्टी देऊन जातो. 

महाराणी ताराबाई म्हणजे करवीर संस्थानच्या संस्थापिका. त्यांनी केलेला संघर्ष, मोगलशाहीविरुद्ध दिलेली झुंज आणि छत्रपती घराण्यामध्ये दुही माजल्यानंतर त्यांनी दिलेला लढा  खूप महत्त्वाचा आहे. १६८० मध्ये महाराजांचे निधन झाल्यानंतर आणि औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर त्याच्या निधनापर्यंत सव्वीस वर्षे जो संघर्ष मराठ्यांनी केला, त्यातील तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा समग्र इतिहास समोर यायला हवा होता. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षाचा इतिहास विविध अंगाने मांडण्यात आलेला आहे.  छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी कमी-अधिक प्रमाणात इतिहासाने नोंद घेतलेली आहे. या कालखंडात शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्यावर मात्र इतिहासकारांनी अन्याय केला. महाराणी ताराबाईंचा हा संघर्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथात दोन खंडांमध्ये मांडला आहे. 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर १७०७ मध्ये औरंगजेबचे निधन होईपर्यंत मोगलांच्या विरोधात ताराराणी यांनी अविरत संघर्ष केला.  औरंगजेबाच्या  निधनानंतर मोगलांनी उत्तरेकडे परतण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे आणि येसूबाई यांची सुटका झाली आणि छत्रपती घराण्याच्या गादीच्या वारशावरून संघर्ष सुरू झाला. ताराराणी या (विधवा) स्त्रीने छत्रपती घराण्याचा वारसा पुरुष हक्काप्रमाणे शाहूराजे यांच्याकडे सोपवून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला हवे होते, असाच सूर अनेक इतिहासकारांनी आजवर लावला होता. महाराणी ताराबाई यांनी मराठेशाही टिकविण्यासाठी,  मोगलांचे अतिक्रमण परतवून लावण्यासाठी दिलेल्या संघर्षाकडे इतिहासाने तसे दुर्लक्षच केले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या पाच दशकांच्या इतिहास संशोधनाच्या कार्यकाळात सातत्याने महाराणी ताराबाई यांच्या जीवनाचा आणि संघर्षाचा वेध घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर छत्रपती राजाराम महाराज यांना जिंजी किल्ल्यावर संरक्षणार्थ आश्रय घ्यावा लागला. त्या काळात हिंदवी स्वराज्य नेतृत्वहीन झाले होते, असा निष्कर्ष काढून इतिहासकारांनी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या लढ्याकडे साफ दुर्लक्ष केले. छत्रपतींच्या गादीवर शाहूराजे यांनी हक्क सांगितला तेव्हा शाहूराजे यांच्या विरोधात महाराणी ताराबाई यांनी दुसरा लढा केला. शाहूराजे यांना हाताशी धरून पेशवाई पुढे आली आणि सातारची राजधानी पुण्याला स्थलांतरित झाली. मराठ्यांचे स्वराज्याचे तात्त्विक अधिष्ठान जपले पाहिजे, यासाठी पेशव्यांच्या विरोधातदेखील संघर्ष करण्यासाठी महाराणी ताराबाई  प्रयत्नशील राहिल्या. असे संघर्षमय जीवन जगणारी ही लढवय्यी स्त्री इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षितच राहिली.  

डॉ. जयसिंगराव पवार यांनी या चरित्र ग्रंथाचे दोन खंडांमध्ये वर्गीकरण केले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते औरंगजेबच्या विरोधात केलेल्या संघर्षापर्यंतचा पहिला खंड आहे. शाहू राजे यांची सुटका आणि महाराणी ताराबाई यांचा संघर्ष हे सारे दुसऱ्या  खंडात येते. ‘शिवछत्रपतींच्या राजनीतीचे पुरस्कर्ते कोण?- महाराणी ताराबाई की शाहूराजे?’-  याचा शोध डॉ. पवार यांनी या चरित्रामध्ये घेतला आहे.  शिवछत्रपतींनी पाहिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेसाठी अखेरपर्यंत लढत राहिलेल्या एका रणरागिणीचा हा इतिहास नव्या स्वरूपात समोर येतो आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. 
    vasant.bhosale@lokmat.com

 

Web Title: Special Article: The Struggle Story of Maharani Tarabai's Life and Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.