प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 05:50 AM2024-04-22T05:50:13+5:302024-04-22T05:51:12+5:30

‘मी सुटे प्लास्टिक; निदान त्या पिशव्या वापरणार नाही’, असा निर्धार प्रत्येकाने करावा. हे वाटते तेवढे अवघड नाही.. फक्त करून पाहिले पाहिजे!

Special Article - This year the global theme of Vasundhara Day is 'Plastic against Earth' | प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

करुणा सिंग, संचालक, अर्थ डे नेटवर्क

२२ एप्रिल १९७० या दिवशी पहिला ‘वसुंधरा दिन’ साजरा झाला. आज ५४ वर्षानंतर सुमारे १९० देशांमधल्या १५ लाख लोकांशी “अर्थ डे नेटवर्क” जोडले गेलेले आहे. आपली पृथ्वी, मानव आणि सर्वच जीवमात्रांच्या आरोग्याची काळजी वाहण्याचा विचार हे लोक करतात. वसुंधरा दिन ही आता एक जागतिक चळवळ बनली आहे. लक्षावधी लोकांना या दिवशी पर्यावरणाच्या प्रश्नांवर फक्त विचार नव्हे, काहीतरी कृती करावीशी वाटते. पर्यावरण हा सर्वांवर सारखा परिणाम करणारा, सर्वांना एकत्र आणणारा विषय आहे. हवा आणि पाणी ही आपली सामायिक मालमत्ता आहे. तिचे बरे किंवा वाईट असे परिणाम सर्वांवर सारखेच होतात. असे असतानाही भारतातल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर अजूनही पर्यावरणाचे प्रश्न येऊ नयेत, हे खरोखरीच विषण्ण करणारे आहे. 

हवामानातील बदलामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. ‘मी तुम्हाला मोफत अमुक तमुक देईन’ असे म्हणण्यापेक्षा ‘मी तुमची शेती हिरवीगार राहील, याची काळजी घेईन; जेणेकरून चांगले पीक येऊन तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचा फायदा होईल’ असे आश्वासन कुणी का देत नाही? प्रदूषण कमी झाले तर आरोग्यावरचा खर्चही कमी होईल हे का सांगत नाहीत?  यंदा वसुंधरा दिनाचा जागतिक विषय ‘पृथ्वी विरूद्ध प्लास्टिक’ असा आहे. संयुक्त राष्ट्रे म्हणतात ‘गेली कित्येक दशके आपण प्लास्टिकवर अधिकाधिक अवलंबून राहत आहोत. आपण जगण्याच्या  अनेकानेक  संदर्भात प्लास्टिक वापरतो; त्यातून आपले जीवन सुकर होते. पण, प्लास्टिकचे विघटन होत नाही. प्लास्टिक कुजायला २० ते पाचशे कितीही वर्षे लागू शकतात आणि तरीही ते पूर्णपणे नष्ट होत नाही. जगात आत्तापर्यंत ८.३ अब्ज टन प्लास्टिक निर्माण झाले असावे, असा अंदाज आहे. या साठ्यातले निम्मे गेल्या १३ वर्षात तयार झाले आहे. 

प्लास्टिकला आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि विघटन होऊ शकेल, असे काही पर्याय शोधले जात आहेत. प्लास्टिकचे सर्वाधिक प्रदूषण फॅशन उद्योग करतो. त्यावर नियंत्रण आणणारे धोरण असले पाहिजे. गेल्या काही वर्षांत  ७५ ते १९९ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्राच्या तळाशी गेलेले आहे, असा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक मिनिटाला सुमारे दहा लाख प्लास्टिकच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. तसेच अब्जावधींच्या संख्येने प्लास्टिकच्या पिशव्या जगभर वापरल्या जातात. आपले समुद्र, तलाव आणि नद्यांमध्ये प्लास्टिकचे ढीग साठत जातील. जमिनीवरही ते साठतील. प्लास्टिक कुजते म्हणजे बारीक कणात रुपांतरित होते. आपण ते कण श्वासावाटे अन्नातून आत घेत राहू. शीतपेयांच्या बाटल्या, स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, खेळणी यामध्ये बायसफिनेल वापरलेले असते. ते माणसाच्या यकृताच्या कार्यावर परिणाम करते. आधुनिक तंत्राने प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तरी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक उरतेच.

याचा अर्थ आता काहीच करता येणार नाही, असे नाही. प्लास्टिकच्या त्सुनामीने आपल्याला गिळंकृत करू नये म्हणून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. अनेक पावले आधीच उचलली गेली आहेत. उदाहरणार्थ दिल्ली महानगरपालिकेने शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत कापडाच्या पिशव्या पुरवल्या. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी त्या वापराव्यात, यासाठी या मुलांनी दुकानदारांना उद्युक्त केले. १०० मायक्रॉनच्या खाली असलेल्या प्लास्टिकच्या एकल वापरावर भारतात बंदी आहे. आसामात प्लास्टिकचा कचरा जमा करून आणून दिला तर शाळा ते शुल्क म्हणून जमा करून घेतात.अनेक धार्मिक ठिकाणी प्लास्टिकवर बंदी आहे. प्रत्येक नागरिकाने प्लास्टिकची पिशवी वापरायला नकार द्यावा, असे आवाहन आजच्या दिवशी “अर्थ डे नेटवर्क” करते आहे. पृथ्वीवर आधीच ज्याची दाटी झाली आहे, असे प्लास्टिक मी खरेदी करणार नाही, दुष्परिणाम इतरांना सांगेन, असा निर्धार प्रत्येकाने करावा.  हे वाटते तेवढे अवघड नाही... फक्त करून पाहिले पाहिजे!

अधिक माहितीसाठी : https://www.earthday.org/india/

 

Web Title: Special Article - This year the global theme of Vasundhara Day is 'Plastic against Earth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.