विशेष लेख: उत्तर प्रदेश- केवळ एक राज्य नव्हे; प्रतिभा, परंपरा अन् प्रगतीची प्रयोगशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:12 IST2025-03-27T11:11:49+5:302025-03-27T11:12:39+5:30
एकेकाळी बिमारू संबोधला जाणारा उत्तर प्रदेश आज व्यवसाय, गुंतवणुकीसाठी सर्वश्रेष्ठ ठिकाण म्हणून ओळखला जातो. हे राज्य आता ‘ग्रोथ गिअर’ झाले आहे.

विशेष लेख: उत्तर प्रदेश- केवळ एक राज्य नव्हे; प्रतिभा, परंपरा अन् प्रगतीची प्रयोगशाळा
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
किंतु अपनी ध्येय यात्रा मे हम कभी रूके नहीं,
किसी चुनौती के सम्मुख कभी झुके नहीं।
श्रद्धेय अटलजींच्या या पंक्तीनुसार न थकता, न अडखळता कोणापुढेही न झुकता, वंचितांना प्राधान्य देत उत्तर प्रदेश सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यातील २५ कोटी लोकांची सेवा, संरक्षण आणि समृद्धीला समर्पित अशा कर्तव्य साधनेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली सुशासनाचा मंत्र, गरीब कल्याणाचा संकल्प, समृद्धीची दृष्टी, अंत्योदयाचे दर्शन आणि आत्मनिर्भर उत्तर प्रदेशचे उद्दिष्ट साधण्यासाठी अविश्रांत अशा साधनेने आठ वर्षांत उत्तर प्रदेशकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यात यश मिळवले आहे. एकेकाळी बिमारू संबोधला जाणारा हा प्रदेश आज व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी सर्वश्रेष्ठ ठिकाण म्हणून जगभर ओळखला जातो. उत्तर प्रदेश आज ‘ग्रोथ गिअर’ झाला आहे.
‘संकल्प ते सिद्धी’ अशी ही यात्रा असून, अराजक, अव्यवस्था आणि गुन्हेगारीच्या अंधारात बुडालेले हे राज्य आम्ही सुरक्षित परिवेश, मजबूत पायाभूत सुविधा, सहज संपर्क आणि उद्योगांसाठी अनुकूल धोरणाद्वारे स्वप्नवत गंतव्य म्हणून बदलण्यात आम्ही यशस्वी झालो. गेल्या आठ वर्षात राज्यात २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली. त्यातील १५ लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात उतरले आहेत. या माध्यमातून ६० लाखांहून अधिक तरुणांना नोकरी, तसेच इतर लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे.
सुरक्षितता असेल, तरच विकास होतो आणि सुलभ संपर्कातून त्याला वेग येतो, याचे नवा उत्तर प्रदेश उदाहरण ठरले. ‘समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या व्यक्तीचा विकास हा अंत्योदय होय असे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी म्हटले होते. त्यामुळेच गेल्या आठ वर्षांत राज्य सरकारने ६ कोटींपेक्षा अधिक लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश मिळवले.
राज्यातील १५ कोटी गरिबांना दरमहा मोफत धान्य, १.८६ कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन, २.८६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ, पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत ५.२१ कोटी लाभार्थींना ५ लाखांपर्यंत चिकित्सा सुरक्षाकवच, ५६.५० लाखांहून अधिक कुटुंबांना मोफत घरे, अशा अनेक कल्याणकारी योजनांनी लोकांचे जीवन सुखकर केले आहे.
घर बांधण्यासाठी जमीन नसलेल्यांनाही ती उपलब्ध करून देणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य असून, हाच अंत्योदय आहे. देशात सर्वाधिक क्षमता या राज्याकडे असून, ती वापरण्यासाठी मनुष्यबळाची गरज होती. सरकारने त्या दृष्टीने व्यापक काम केले. स्वातंत्र्यानंतर २०१७ पर्यंत राज्यात एकूण १२ वैद्यकीय महाविद्यालये होती. आज ४४ सरकारी आणि ३६ खासगी महाविद्यालये आहेत. गोरखपूर आणि रायबरेलीत एम्स उभारले जात आहे. ‘एक जिल्हा एक वैद्यकीय महाविद्यालय’, अशी संकल्पना साकार होत आहे. सुखी शेतकरी आमची सर्वोच्च प्राथमिकता असून, त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
सशक्त मातृशक्ती कोणत्याही समाजाचा आधार असते, हे सूत्र राज्य सरकारने प्रत्यक्षात आणले. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत संरक्षण, सन्मान आणि स्वावलंबन देऊन स्त्रियांना विकास प्रक्रियेत आणले. पदवीपर्यंत मोफत शिक्षण, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना, निराश्रित महिला पेन्शन योजना, पंतप्रधान मातृवंदन योजना, स्वानिधी योजना अशा अनेक योजनांनी त्यांच्या जीवनात सूर्योदय झाला आहे. आत्मनिर्भर मातृशक्ती हे लक्ष्य गाठण्यासाठी ग्रामीण भागातील ९५ लाखांहून अधिक स्त्रियांना राज्य ग्रामीण आजीविका मोहिमेत आणण्याबरोबरच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांना दुकाने काढून देणे, घर स्त्रीच्या नावावर करणे अशा गोष्टी केल्या गेल्या आहेत. राज्यातील तरुण नोकरी निर्माणकर्ते व्हावेत, यासाठी काम केले गेले. २०१६ साली राज्याचा बेरोजगारी दर १८ टक्के होता. आता तो तीन टक्के आहे. पारदर्शक प्रक्रिया राबवून विभिन्न आयोग, भरती मंडळातर्फे आठ लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरी मिळाली. त्यात १.३८ लाख महिला आहेत. राज्यात सार्वजनिक परीक्षा कायदा लागू करण्यात आला आहे.
याच काळात देशाच्या आस्थेचे केंद्र रामलल्लाला त्याच्या पावन मंदिरात विराजमान होताना आपण पाहिले. भव्य दिव्य काशी विश्वनाथ कॉरिडॉरची निर्मिती झाली. महाकुंभाचे भव्य आयोजन, अयोध्या विकास, काशीचा कायाकल्प आणि मथुरा वृंदावनचे सुशोभीकरण, दीपोत्सव, रंगोत्सवाचे आयोजन या काही गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’ हा मंत्र अंगीकारून डबल इंजिन सरकारने राज्यातील धार्मिक पर्यटन आणि औद्योगिक विकासाला नव्या उंचीवर नेले. आठ वर्षांत सरकारने एकही नवा कर लावलेला नाही. डिझेल, पेट्रोलचे दर देशात सर्वात कमी असूनही शिलकी महसुलाचे राज्य म्हणून आम्ही विकासाच्या शिड्या चढत चाललो आहोत.
उत्तर प्रदेश केवळ एक राज्य राहिले नसून प्रतिभा, परंपरा आणि प्रगतीची प्रयोगशाळा झाले आहे. अजून पुष्कळ काम बाकी आहे !