विशेष लेख: विराट कोहलीने गाड्यांची अडगळ घराबाहेर काढली, तुमचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 08:13 AM2023-04-06T08:13:11+5:302023-04-06T08:13:23+5:30

घरातली सगळी कपाटं उघडून पाहा. ज्या ज्या वस्तूकडे बघून ही वस्तू अनावश्यक आहे, असं तुमचं मन सांगेल ती वस्तू त्याचक्षणी घराबाहेर काढा.

Special Article: Virat Kohli takes the cars out of the house, what about you? | विशेष लेख: विराट कोहलीने गाड्यांची अडगळ घराबाहेर काढली, तुमचं काय?

विशेष लेख: विराट कोहलीने गाड्यांची अडगळ घराबाहेर काढली, तुमचं काय?

googlenewsNext

भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार

घरातली सगळी कपाटं उघडून पाहा. ज्या ज्या वस्तूकडे बघून ही वस्तू अनावश्यक आहे, असं तुमचं मन सांगेल ती वस्तू त्याचक्षणी घराबाहेर काढा. विराट कोहलीला वाटलं की, अरे; आपण गरज नसताना फारच वाहावत गेलो आणि उगाचच एवढ्या आलीशान गाड्या घेतल्या. आता जेवढी गरज आहे तेवढ्याच गाड्या जवळ ठेवाव्यात! - ज्या कधी वापरल्याच गेल्या नाहीत अशा महागड्या गाड्या मी विकून टाकल्या, असं कोहलीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं.

विराट तर क्रिकेटचा सुपरस्टार. आपण त्याच्यासारखे अब्जाधीश नसलो तरी आपापल्या परीने आपणही आयुष्यातला पसारा वाढवत असतोच. गरिबांकडे गरजांच्या प्रमाणात वस्तूंचे प्रमाण व्यस्तच असते; पण मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात ज्यांची गरज कधीच संपली  अशा अनेक गोष्टी असतात, एवढाच फरक!  मनाच्या आणि घराच्या अडगळीत साठलेल्या या वस्तू कमी केल्या नाहीत तर आपल्या आयुष्यातली जळमटं वाढत जातात. 
विसाव्या शतकात जगभर मिनिमलिझम नावाच्या चळवळीला सुरुवात झाली. कलेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या या चळवळीने आयुष्याच्या अनेक अंगांना स्पर्श केला. कमीत कमी वस्तू वापरत किमान गरजा भागवत आयुष्य व्यतीत करणे भारतीय उपखंडाला नवं नाही. पण गेल्या काही वर्षांपासून वस्तूंचा साठा कमी करणं हे एक मोठं आव्हान ठरलं आहे.  मरी कोंडो नावाची जपानी वंशाची बाई पसाऱ्यात जगणाऱ्या अमेरिकन लोकांच्या घरी फिरत त्यांची अडगळ आवरून देते. आता आपल्या सगळ्यांनाच मरी कोंडो होण्याची गरज आहे.

तुम्ही म्हणाल, कष्टाने पै-पै साठवून जमा केलेल्या वस्तू अशा कशा देऊन टाकाव्यात? प्रत्येक वस्तूची एक आठवण आहे. धाकटीचा भातुकलीचा सेट, मोठ्याचे क्रिकेट किट, पंधरा वर्षांपूर्वी स्कीममधून घेतलेला कुकर, वीस वर्षांपूर्वी हप्त्यावर घेतलेलं कपाट.. आम्ही काय टाटा-बिर्ला आहोत का? पण विचार करा, धाकटीने भातुकली खेळणं सोडलं त्याला किती तरी वर्षे झाली. मोठा आता क्रिकेट खेळत  नाहीच; पण तुमच्याकडे राहतसुद्धा नाही ना? स्कीममधून घेतलेल्या कुकरमध्ये स्टीम राहत नाही आणि त्या जुन्या कपाटात नको असलेल्या गोष्टीच ठेवता ना? मग त्यातल्या निदान अर्ध्या गोष्टी कमी करा.

अनावश्यक आणि भरमसाठ गोष्टींचा भार कमी करताना तीन मुद्द्यांचा विचार करा : चांगल्या, पण वापरात नसलेल्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर, टाकून द्यायच्या वस्तूंची योग्य विल्हेवाट आणि उरलेल्या वस्तूंचं वर्गीकरण!- या तीनही मुद्द्यांचा विचार करून ठराविक कालावधीनंतर नियमितपणे घरातली अडगळ दूर केली पाहिजे.

आज  ज्येष्ठ असलेल्या पिढीत घरात आणलेली वस्तू  नष्ट होईपर्यंत घरातच असली पाहिजे, असा विचार होता. एकतर आजच्या मध्यमवर्गाएवढी सुबत्ता त्यांच्याकडे नव्हती. घरात येणारा पैसा कमी होता, त्याचबरोबर उपकरणं, कपडे, दागिने इत्यादी वस्तूंची उपलब्धता कमी होती. फ्रीज, फोनसाठी नोंदणी करावी लागे. कपडे वर्षाकाठी होत. आता मध्यमवर्गाला समोर ठेवून फोफावलेल्या बाजारपेठेबद्दल काय बोलावं? गरजेनुसार पुरवठा हे बाजारपेठेचं उद्दिष्ट असेल तर गरजा निर्माण करणं हे बाजारपेठेसमोरचं मोठं आव्हान आहे. तुमच्या डोक्यात कोंडा आहे? -आमचा शँपू वापरा. तुम्हाला घाम येतो? मग आमच्या कंपनीचे डिओ वापरा.. अशा जाहिरातींतून गरजा निर्माण केल्या जात आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जीवनशैली आरामदायक झाली, यात वादच नाही. पण हा आराम आपण विचारपूर्वक आखलेल्या जीवनशैलीमुळे वाढेल यात शंकाच नाही.

वस्तू कमी करा म्हणजे पैसे खर्च करू नका असं नाही. उलट वस्तू कमी असतील तर तुम्हाला उत्तम उपभोग घेता येईल. धूळखात पडलेल्या सीडी काढून टाका आणि उत्तमोत्तम म्युझिक सिस्टिम घरी आणून संगीताचा आनंद लुटा. बैठकीच्या खोलीत वर्षानुवर्षांपासून ठेवलेल्या शोभेच्या वस्तू काढून टाकल्या तर धूळ झटकण्यासाठी कमी श्रम लागतील आणि घर स्वच्छ दिसेल. परदेशी प्रवासात लागतील म्हणून वर्षानुवर्षे मुंबईच्या उकाड्यात साठवलेले स्वेटर- शाली गरिबांना देऊन टाकल्या तर त्याची जागा लेटेस्ट फॅशनचे कपडे घेतील. म्हणजे, तुमच्याच जीवनशैलीत सुखकारक बदल होतील. पुढच्यावेळी एखादी वस्तू विकत घेताना, ही वस्तू फार गरजेची नाही,  सहा आठ महिन्यात घराबाहेर जाईल मग घ्यायचीच कशाला? -असा विचार येऊन तुमचे पैसेही वाचतील.

आता ही अडगळ दूर करण्याची सुरुवात कशी करायची? - सोपं आहे. घरातून एक फेरफटका मारा. सुरुवात स्वयंपाकघरापासून करा. तिथली कपाटं उघडून प्रत्येक वस्तूकडे बघून मनाला विचारा, ही खरंच गरजेची आहे? गेल्या सहा आठ महिन्यात याचा वापर झाला आहे? येणारे सहा-आठ महिने ही लागणार आहे? आता हेच प्रश्न घरातली सगळी कपाटं उघडून सगळ्या वस्तूंना विचारा आणि ज्या ज्या वस्तूकडे बघून ही वस्तू अनावश्यक आहे, असं तुमचं मन तुम्हाला सांगेल ती वस्तू त्याच क्षणी घराबाहेर काढा.

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार (bhalwankarb@gmail.com)

Web Title: Special Article: Virat Kohli takes the cars out of the house, what about you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.