१५ अब्ज मैलांवरून व्हॉयजर-१ म्हणाला, ‘हाय, इट्स मी!’

By Shrimant Mane | Published: April 27, 2024 08:31 AM2024-04-27T08:31:51+5:302024-04-27T08:32:16+5:30

व्हॉयजर-१ तब्बल ४७ वर्षांपूर्वी अंतराळात गेला होता... अचानक तो ‘हरवला’,पण  ‘नासा’ने धडपड करून त्याला पुन्हा ‘शोधले’, त्याची थरारक कहाणी!

Special Article - Voyager-1, which went into space almost 47 years ago, is back in touch with NASA | १५ अब्ज मैलांवरून व्हॉयजर-१ म्हणाला, ‘हाय, इट्स मी!’

१५ अब्ज मैलांवरून व्हॉयजर-१ म्हणाला, ‘हाय, इट्स मी!’

व्हॉयजर-१. यंत्र असले तरी तो एक प्रवासी आहे. ५ सप्टेंबर १९७७ ला तो पृथ्वीवरून निघाला. त्याचा दोन नंबरचा भाऊ सोळा दिवस आधी, २० ऑगस्टला निघाला होता. कारण, त्याची तयारी आधी झाली होती. या गोष्टीला ४७ वर्षे होत आली. सूर्यमालेतल्या एकेका ग्रहाभोवती चकरा मारण्यात व्हॉयजर-१ ची इतकी वर्षे गेली. तीन संगणकांच्या मदतीने तो त्याचे स्थान, यानाची प्रकृती आणि बाहेरच्या वातावरणाची माहिती पृथ्वीवर पाठवत राहिला. पण, अचानक गेल्या नोव्हेंबरमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या जेट प्राॅपल्शन लॅबोरेटरीचा व्हॉयजर-१शी संपर्क तुटला. त्याचे अखेरचे संदेश निर्बोध होते. टेलिमेट्री वाचता येत नव्हती. कितीतरी दूर गेलेल्या त्या प्रवाशाला आपल्या जन्मगावी नेमके काय कळवायचे आहे ते काहीच उमगत नव्हते. 

बहुतेकांना वाटले, जवळपास पाच दशकांपूर्वीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर. कॉस्मिक किरणे किंवा इतर कारणांनी बिघाड झाला असेल. कदाचित यान निकामी झाले असेल. पण, व्हॉयजर-१ मध्ये धुगधुगी असल्याचे, संदेश मिळत होते. मग, संपर्क तुटण्याच्या कारणांचा शोध सुरू झाला. त्यात आढळले की फ्लाइट डेटा सबसिस्टम म्हणजे ‘एफडीएस’मधील एका भागाची स्मृती गेली आहे. मेंदूचा विशिष्ट भाग बाधित झाल्यानंतर स्मृतिभ्रंश किंवा अर्धांगवायू होतो तसे. यानाच्या आतला व बाहेरचा डेटा पृथ्वीतलावर पाठविणारी एक चिप निकामी झाली होती. त्यामुळे तीन टक्के मेमरी करप्ट झाली असली तरी तिचा संबंध  सॉफ्टवेअर कोडशी होता. 

सध्या व्हॉयजर-१ चे पृथ्वीपासूनचे अंतर आहे तब्बल १५ अब्ज मैल किंवा २४ अब्ज किलोमीटर. एखादा संदेश प्रकाशाच्या वेगाने जाऊनही तिथे पोचायला साडेबावीस तास लागतात. पंधरवडाभर आधी निघालेले व्हॉयजर-२ खूप अलीकडे आहे. कारण, दोन्ही यानांच्या प्रवासाच्या कक्षा वेगळ्या आहेत. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांभोवती कोणी किती चकरा मारायच्या त्याचे वेळापत्रक वेगळे आहे. व्हॉयजर-१ सध्या इंटरस्टेलर म्हणजे आंतरतारिका टापूत आहे. ब्रह्मांडाच्या अनंत अशा पोकळीतला प्लाझ्मा किती दाट किंवा विरळ आहे, चुंबकीय शक्ती किती प्रभावी आहे, अशा प्रकारची माहिती व्हॉयजर-१ जमा करीत आहे. अशावेळी दुरुस्ती करायची तरी कशी, हा प्रश्न पडला. बिघाड साॅफ्टवेअर कोडशी संबंधित! पाच दशकांपूर्वी हे कोड साध्या कागदावर तयार व्हायचे. आताच्यासारखे त्यांचे डिजिटायझेशन झाले नव्हते. आताच्या यानांमध्ये काही बिघाड झाला तर त्याची स्टिम्युलेटरच्या रूपाने जी प्रतिकृती असते तिथेच दुरुस्ती करता येते. व्हॉयजर-१ साठी ही सुविधा उपलब्ध नाही. 

नासाने व्हॉयजर-१ च्या दुरुस्तीसाठी नेमलेल्या टायगर टीममधील शास्त्रज्ञांनी मूळ व्हॉयजर प्रकल्पावर काम केलेल्या श्रीमती लिंडा स्पिल्कर व अन्य काही ज्येष्ठांच्या मदतीने  मूळ साॅफ्टवेअर कोड ‘एफडीएस’मध्ये इतरत्र बसविण्याचा प्रयत्न केला. हे सॉफ्टवेअर कोडचे प्रत्यारोपण होते.  त्यातही अडचण होती.  संपूर्ण कोड बसेल अशी एकच एक जागा ‘एफडीएस’च्या मेमरीमध्ये शिल्लक नव्हती. मग त्या कोडचे तुकडे केले गेले, तेही असे की बदल केल्यानंतरही मूळ कोड व नवा एकत्र कोड यात गडबड व्हायला नको. या दुरुस्तीला पाच महिने लागले. 

गेल्या गुरुवारी, नासाच्या एका डीपस्पेस नेटवर्क अँटिनातून एक सूचना व्हॉयजर-१ कडे पाठवली गेली. ती यानावर पोहोचण्यासाठी लागणारे साडेबावीस तास आणि तिचा प्रतिसाद पुन्हा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तितकाच वेळ अशा दोन दिवसांनंतर व्हॉयजर-१ कडून हाकेला ओ मिळाली. नासाच्या जेपीएल प्रयोगशाळेत  शास्त्रज्ञ- तंत्रज्ञांचे डोळे असे दोन दिवस संगणकांवर खिळलेले होते. टायगर जिंदा है, शैलीत व्हॉयजर-१ चा संदेश पोहोचला आणि सूर्यमालेच्याही पलीकडे बिघडलेले यान दुरुस्त करता येऊ शकते, हा माणसाने विकसित केलेल्या विज्ञानाचा नवा इतिहास लिहिला गेला. 
shrimant.mane@lokmat.com

Web Title: Special Article - Voyager-1, which went into space almost 47 years ago, is back in touch with NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा