विशेष लेखः 95 मिनिटांच्या 'मोदी शो'ने भाजपाला काय दिलं?

By राजा माने | Published: January 2, 2019 12:16 PM2019-01-02T12:16:24+5:302019-01-02T12:22:36+5:30

राजकारणातील कोणत्याही मोहिमेला "इव्हेंट मॅनेजमेंट"च्या कोंदणात सजविणे, ही मोदी-शहांची खास शैली !

Special article: What did the ninety five minute 'Modi Enterview show' give BJP to ? | विशेष लेखः 95 मिनिटांच्या 'मोदी शो'ने भाजपाला काय दिलं?

विशेष लेखः 95 मिनिटांच्या 'मोदी शो'ने भाजपाला काय दिलं?

Next

राजा माने

राजकारणातील कोणत्याही मोहिमेला "इव्हेंट मॅनेजमेंट"च्या कोंदणात सजविणे, ही मोदी-शहांची खास शैली ! त्याच शैली आणि डावपेचांचा सरीपटवरील पहिला डाव म्हणून मोदींची महामुलाखत. आज देशातील सर्वच राजकीय पक्ष, राजकीय पंडित, प्रसार माध्यमे आणि सोशल मिडिया, 1 जानेवारी 2019 रोजी प्रसारित झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या तथाकथित महामुलाखतीचे विश्लेषण करण्यात गुंतला आहे. त्या मुलाखतीकडे राजकारणी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, त्या मुलाखतीचा जनतेवर किती प्रभाव पडला, त्या मुलाखतीचा भाजपला फायदा होणार की विरोधकांना खाद्य मिळणार, असे अनेक मुद्दे पुढे येतात. पण, या मुलाखतीकडे नव्या युगातील "इव्हेंट ओरिएंटेड" राजकारणातील एका टप्प्यावरील नियोजनबद्ध आणि शास्त्रशुद्ध "मोदी शो" म्हणूनच पहायला हवे. बेरोजगारीसारख्या विषयांना बगल देत असतानाच राम मंदिर संदर्भातील भूमिका मात्र त्यांनी स्पष्ट केली. देशाला आणि त्यांच्या विरोधकांना जाणीवपूर्वक चर्चेला विषय दिले आहेत. त्याविषयावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि उमटणाऱ्या सादांवर उपाय योजनांची मोर्चेबांधणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, हाच उद्देश दिसतो.

मोदी-शहांच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या नियोजित वेळापत्रकातील एक इव्हेंट म्हणूनच त्या 95 मिनिटांच्या मुलाखतीकडे पहायला हवे. मुलाखतीत कोणते विषय छेडायचे, त्या विषयाला कुठपर्यंत नेवून ठेवायचे, त्या विषयांचा कोणावर कसा आणि किती परिणाम व्हावा, त्यासाठी भाषा कशी वापरायची आदींसारख्या मुद्द्यांवर अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास करुन आखीव-रेखीव पद्धतीने बांधणी केलेला "मोदी शो" म्हणजेच ती महामुलाखत ! नोटबंदीपासून मित्रपक्षांच्या खदखदी पर्यंतचे सर्व विषय मवाळशैलीत छेडायचे पण त्यांना स्वतःच्या ठोस निष्कर्षापर्यंत मात्र पोहचू द्यायचे नाही, असेच मुलाखतीचे तंत्र आणि सूत्र मोदींनी राखले. चर्चेत गुरफटून ज्याचे-त्याने निष्कर्ष काढत बसावे. या सूत्राचे काटेकोर पालन करतानाच सर्वच विषयांना भविष्यात फुटणाऱ्या फाट्याना सामोरे जाण्यास वाव ठेवणारे पर्याय खुले राहतील याचीही काळजी घेतली. "आघाडी धर्म" या एका शब्दाचा वापर करुन शिवसेनेसह देशातील सर्वच मित्रपक्षांना भविष्यात सोयीने हाताळण्याचा मार्ग खुला ठेवणे असो वा, "एका लढाईत पाकिस्तान प्रश्न संपणार नाही" असे म्हणून त्याप्रश्नावरही भविष्यात त्यावर आणखी बोलण्यास वाव ठेवणे असो, मुलाखतीतील प्रत्येक शब्द भविष्यातील "डॅमेज मॅनेजमेंट"चा विचार करुनच वापरला गेला. त्याच कारणाने नोटबंदीसारखा विषय अर्थशास्त्रीय चांगल्या-वाईट परिणामाच्या चर्चेकडे न नेता वरवरच्या चर्चेत जिरविला. अशी अनेक उदाहरणे हेच सांगतात की मुलाखतीतून कुणाला काय मिळाले या पेक्षाही या महामुलाखतीतून जे साध्य करायचे होते ते मोदी-शहांनी साध्य केले.

राजकीय-सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यासपूर्ण आधार घेवूनच बांधणी असणाऱ्या "इव्हेंट ओरिएंटेड" डिजिटल राजकारणाच्या पर्वाची मुहूर्तमेढ भारतीय लोकशाहीत 2014 साली रोवली गेली. नरेंद्र मोदी-अमित शहा त्या पर्वाचे जनक! नव्या युगाचे राजकारण आणि विशेषतः निवडणुकीचे राजकारण कशा कालबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने हाताळले जावू शकते याचा यशस्वी प्रयोग त्यांनी देशाला दाखविला. त्या प्रयोगातील नायकाच्या देहबोलीपासून भाषा, आवाजाची पट्टी, शब्द प्रयोगांची पेरणी पेहराव्याच्या रंगसंगतीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन आणि अचूक अंमलबजावणीची काळजी घेतली गेली. त्यात 2014 च्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा आणि भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यश मिळाले. लोकसभेच्या 543 जागांपैकी 282 जागा भाजपने जिंकल्या तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या. 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर झालेल्या लोकसभा निडणुकीत राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला असेच यश मिळाले होते. लोकसभेच्या 533 जागांपैकी 404 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तर आज सत्तेवर असलेल्या भाजपला त्यावेळी केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी 30 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तेलगू देसम हा पक्ष होता. पण या दोन्ही ऐतिहासिक निवडणुकांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. 1984 चे राजीव गांधी यांचे यश सहानुभूतीच्या लाटेवर आरुढ झाले होते तर 2014 चे भाजपचे यश "मोदी लाट" निर्माण करणाऱ्या मोदी-शहा प्रणित इव्हेंट ओरिएंटेड डिजिटल राजकारणाच्या पर्वाचे यश होते. त्याच पर्वातील एका टप्प्यावरील मोदी-शहांचे नियोजबद्ध पाऊल म्हणूनच 1 जानेवारी 2019 नववर्षाचा मुहूर्त साधून झालेल्या पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या 95 मिनिटांच्या महामुलाखतीकडे पाहिले पाहिजे.

"अच्छे दिन" चा मंत्र आणि आपल्या आक्रमक शैलीने 2014 साली उभ्या देशाला नरेंद्र मोदींनी संमोहित केले होते. नव्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचे मोठे गाठोडे जनतेच्या डोईवर ठेवून मोदींनी अभूतपूर्व लोकाश्रय संपादन केला आणि देशाची सूत्रे एकहाती आपल्या ताब्यात घेतली होती. आता मोदींच्या त्या संमोहनाच्या जादूची परीक्षा घेणारा काळ सुरू झाला आहे. त्याच परीक्षेला सामोरे जातानाचे पहिले वळण म्हणजेच 1 जानेवारीला सादर झालेला "मोदी शो"!

(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)
 

Web Title: Special article: What did the ninety five minute 'Modi Enterview show' give BJP to ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.