विशेष लेख: ऑलिम्पिकची पदके मिळवण्यात आपला भारत नक्की कुठे पडतोय कमी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 08:07 AM2024-08-11T08:07:28+5:302024-08-11T08:08:00+5:30

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ६ पदके जिंकली आहेत.

Special Article: Where exactly is our India falling short in winning Olympic medals? | विशेष लेख: ऑलिम्पिकची पदके मिळवण्यात आपला भारत नक्की कुठे पडतोय कमी?

विशेष लेख: ऑलिम्पिकची पदके मिळवण्यात आपला भारत नक्की कुठे पडतोय कमी?

रोहित नाईक, उप-मुख्य उपसंपादक

भारतीय संघाने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदकांची कमाई करत यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आपली मोहिम समाप्त केली. कागदावर ही कामगिरी समाधानकारक दिसत असली, तरी प्रत्यक्षात ही कामगिरी निराशाजनकच ठरली आहे.

भारताने यंदा ऑलिम्पिकसाठी ११७ खेळाडूंचा चमू पाठवला. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिमध्ये भारताने १२० खेळाडूंचा चमू पाठवला होता. त्यावेळी भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पटकावलेल्या ऐतिहासिक सुवर्ण पदकासह भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्याआधी, लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके मिळवली होती. यंदा मात्र, पहिल्यांदाच पदकांचा दुहेरी आकडा गाठू, असा गाजावाजा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केला होता. हे लक्ष्य सहज पार होईल, असा विश्वासही वाटत होता. मात्र, घडले भलतेच. दुहेरी आकडा दूर, भारतीय खेळाडूंना टोकियो, लंडन ऑलिम्पिकची कामगिरीही मागे टाकता आली नाही.

अजून काय करावं?
खेळाडूंना सुविधा नाही, सुविधा दिल्या. त्यांना आर्थिक पाठबळ नाही, केंद्र सरकारने 'टॉप्स' योजनेद्वारे आर्थिक पाठबळ दिले. खेळाडूंना विदेशात सरावाची संधी मिळावी, तशी संधी केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिली. खासगी प्रशिक्षक नेमण्याची परवानगी दिली. ज्या ज्या मदतीची गरज होती, ती सर्व मदत केली. मग, नेमकं चुकलंय कुठे? हेच कळेनासे झाले आहे. खेळामध्ये हार-जीत मान्य आहेच. पण, अशा सर्वोच्च स्तरावर सातत्याने थोडक्यात येत असलेल्या अपयशामुळे प्रश्न तर विचारले जाणारच.

गमाविलेल्या त्या पदकांची सल बाेचरी

भारताचे नेमकं कुठे आणि काय चुकतंय, याचा आता विचार करण्याची गरज आहे. भारतीय खेळाडू पदकाची आशा उंचावून रिकाम्या हाताने परतताना दिसले. पोडियमच्या जवळ जाऊन माघारी फिरत असलेल्या आपल्या खेळाडूंना पाहून मोठी निराशा झाली. एक, दोन नव्हे तर तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस आणि कुस्ती या खेळांमध्ये भारताने हातातील पदक अक्षरश: गमावले. जिंकलेल्या सहा पदकांचा आनंद आहेच, पण या गमावलेल्या पदकांची सल देखील आहे.

इथे झाली निराशा...

- तिरंदाजी : मिश्र सांघिक गटात चौथे स्थान.
- बॅडमिंटन : कांस्य लढतीत लक्ष्य सेन पराभूत.
- नेमबाजी : १० मीटर एअर रायफल - अर्जुन बबूताचे चौथे स्थान.
- नेमबाजी : २५ मीटर पिस्टल - मनू भाकरचे चौथे स्थान.
- नेमबाजी : स्कीट - महेश्वरी चौहान-अनंतजीत नरुका यांचे चौथे स्थान.
- कुस्ती : विनेश फोगाट - १०० ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अंतिम सामन्यासाठी अपात्र.
- भारोत्तोलन : केवळ एक किलो कमी उचलल्याने मीराबाई चानू चौथ्या स्थानी राहिली.

काय चुकीचं बोलले पदुकोण?

बॅडमिंटनच्या कांस्य पदक लढतीत लक्ष्य सेनला पहिला गेम जिंकल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. यावेळी त्याला झालेली दुखापतही काहीशी कारणीभूत ठरली. मात्र, यानंतर प्रशिक्षक व माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर टीका केली हाेती.

पदुकाेण यांनी म्हटले की, 'सरकारने यंदा सर्व मदत पुरवली. त्यांनी त्यांचे सर्व काम करत खेळाडूंना प्रत्येक बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला. आता खेळाडूंनी यशासाठी जबाबदारी घ्यावी.' यावर भारताची बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने पदुकोण यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना, 'हा खेळाडूंचा अपमान असून खेळाडू देशासाठी जीव तोडून खेळतात. त्यांचा आदर राखला पाहिजे,' असे म्हटले होते. 

खेळाडू नक्कीच देशासाठी जीवापाड खेळतात, पण प्रशिक्षकही त्या खेळाडूच्या आणि देशाच्या भल्यासाठीच राबत असतो, हेही विसरता कामा नये. शिवाय ज्या व्यक्तीच्या मताचा आपण विरोध करतोय, त्या व्यक्तीने देशासाठी काय केलंय हेही पाहिले पाहिजे.

फारशा सोयी-सुविधा नसताना पदुकोण यांनी बॅडमिंटनमधील विम्बल्डन मानले जाणारे ऑल इंग्लंड जेतेपद पटकावले होते. तसेच, भारताला पहिले जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे पदकही मिळवून दिले होते.
निश्चितच पदुकोण यांच्या काळातील प्रतिकूल परिस्थिती आज नाही. त्यामुळे या आधुनिक युगातील खेळाडूंनी पदके मिळवायलाच हवी.

Web Title: Special Article: Where exactly is our India falling short in winning Olympic medals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.