विशेष लेख: दाराशी तणाव असताना घरात भांडणे कशाला?

By विजय दर्डा | Published: January 30, 2023 10:05 AM2023-01-30T10:05:59+5:302023-01-30T10:07:05+5:30

India Politics: मागच्या घटनांपासून धडा जरूर घेतला पाहिजे; परंतु हेही लक्षात ठेवले पाहिजे, जुन्या जखमांच्या खपल्या आपण जितक्या काढू तेवढ्या जास्त यातना होतील.

Special Article: Why fight at home when there is tension at the door? | विशेष लेख: दाराशी तणाव असताना घरात भांडणे कशाला?

विशेष लेख: दाराशी तणाव असताना घरात भांडणे कशाला?

googlenewsNext

-  विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या बीबीसीच्या एका अनुबोधपटावरून देशाच्या विविध भागांत वादंग माजला आहे. हा अनुबोधपट २००२  साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित असून यूट्यूब आणि ट्विटरवर त्याला ब्लॉक केले गेले आहे. परंतु ज्यांनी तो डाउनलोड करून घेतला होता ते ठिकठिकाणी तो दाखवण्यात गुंतले आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होणार हे उघडच होय. आपल्याकडे तसेही कमी प्रश्न नाहीत. आपले शेजारी चीन, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशाच्या सीमेवरील प्रदेशापासून मालदीवपर्यंत विघटनकारी शक्ती डोके वर काढत आहेत. सीमेवर तणाव असताना आपण फालतू विषयांमध्ये अडकावे, यात कोणते  शहाणपण आहे? 
केवळ गुजरातच नव्हे तर देश किंवा जगात कुठेही जेव्हा दंगली होतात तेव्हा मानवतेला मान खाली घालावी लागते. परंतु गुजरात दंगली होऊन गेल्यावर दोन दशकांनी बीबीसीने हा अनुबोधपट का तयार केला, हा सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कुठल्या तरी अहवालावर हा अनुबोधपट आधारित असल्याचे सांगितले जाते. जरा विचार करा, भारताच्या एखाद्या अंतर्गत मुद्यावर ब्रिटनला एवढे नाचण्याची काय गरज होती? येथेच शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होत नाही काय? गुजरात दंगलीच्या बाबतीत भारतीय न्यायालयांनी यापूर्वीच निकाल दिलेला आहे; असे असताना बीबीसीला मधे येऊन उड्या मारण्याची काय गरज पडली? या अनुभवपटाची निर्मिती ही एक आपापत: घडलेली घटना आहे की समजून उमजून खेळलेली चाल? आपली रेषा मोठी दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा छोटी करणे हे सगळ्यात सोपे काम असते, अशी एक जुनी म्हण आहे. काही विदेशी शक्तींनी भारताचा रस्ता अडवण्यासाठी हा मार्ग स्वीकारलेला दिसतो. वाद आपल्याकडे होणार असेल तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार ना! 

मुद्दा या अनुबोधपटाचा असो किंवा ‘काश्मीर फाइल्स’चा, अथवा इंदिराजींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा; अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनांवर आधारलेले अनुबोधपट किंवा चित्रपटांचा मुद्दा असेल त्यातून तणाव तर आपल्या भूमीवर निर्माण होतो. अडीच दशकांनंतर ‘काश्मीर फाइल्स’ची काय गरज होती? मला वाटते, जुन्या घटना आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत; परंतु केवळ त्यापासून धडा घेण्यासाठी. जखमा पुन्हा उघड्या करून त्या रक्तरंजित करणे केव्हाही योग्य नाही. अशा प्रकारच्या वादांनी आपल्या नव्या पिढीची ताजी चैतन्यपूर्ण मने भरकटतात. त्यांच्यात द्वेषाची घाण पसरवली जाते. आपला युवक अशा दुष्टचक्रात फसला तर देशाची प्रगती थांबेल. आपल्या शत्रूला तेच तर हवे आहे.

सध्या भारत प्रगतीच्या रस्त्यावर वेगाने पुढे जात आहे. ब्रिटनला मागे टाकून आपण जगातली पाचवी मोठी आर्थिक शक्ती झालो आणि लवकरच तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या दिशेने पुढे निघालो आहोत. माहिती-तंत्रज्ञान उद्योगांत आपले तरुण सगळ्या जगात दबदबा निर्माण करत आहेत. गरिबी कमी करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत आहोत. रोजगाराची साधने निर्माण करत आहोत. मुलींना मुख्य प्रवाहात आणले जात असून सगळे अडथळे दूर करून समानतेची भावना प्रबळ करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रगतीच्या रस्त्यावर पुढे जाण्यासाठी शक्ती लागते हे आपण सर्वजण जाणतो. ही शक्ती आपल्याला शिक्षण, अर्जित धन आणि बुद्धीपासून मिळते. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण सातत्याने आणि भरपूर प्रयत्न करत आलो. त्यात आपल्याला यशही मिळाले.

अमेरिकेत आज सुमारे ४० लाख हिंदुस्थानी लोक राहतात आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत हे जाणून आपल्याला आनंद वाटेल. तेथे भारतीयांचे दरडोई उत्पन्न वर्षाला एक लाख पाचशे डॉलर्स इतके आहे; तर अमेरिकन माणसाचे केवळ ५५ ते ६०००० डॉलर्स इतके आहे. या यशामागे भारतीयांची क्षमता आहे हे उघडच होय. आपल्याला ही क्षमता देशामध्ये विकसित करावी लागेल. परंतु काही शक्ती हिंदुस्थानच्या जमिनीवर कायम तणाव आणि रक्त सांडलेले पाहू इच्छितात. बाहेरून ते दहशतवाद पाठवतात. देशामधल्या गाडून टाकलेल्या घटना पुन्हा उकरून काढल्या जातात; जेणेकरून हिंदुस्थान नष्ट होईल. विकासाच्या रस्त्यावर काटे पसरवले जात आहेत. आपल्यामध्येही असे काही लोक बसले आहेत हे दुर्दैवच होय. कधी एखादे प्रकरण पाठ्यपुस्तकातून काढले तर वादंग माजतो; कधी धर्माच्या नावाने, कधी जातीच्या नावाने वादंग उठवले जातात. आपला रस्ता अडवण्यासाठी असे किती वादंग वाट पाहत असतात याची गणतीच करता येणार नाही. आपण जर एक मंदिर उभे करत असाल तर ती चांगलीच गोष्ट होय. परंतु दुसऱ्याच्या प्रयत्नांना आपण धक्का देता कामा नये. जैनांचे तीर्थस्थळ पालीतानाचा मुद्दा असेल किंवा सम्मेद शिखरजीचा प्रश्न असेल, या देशाला आर्थिक ताकद म्हणून उभे करण्यात खूप मोठे योगदान देणाऱ्या जैन समाजाला अखेर कोण त्रास देत आहे? आणि का देत आहे?

‘पठाण’ नावाचा एक चित्रपट आला आणि  काही माथेफिरू शाहरुख खानवर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करू लागले. अरे बाबा, जर तो सिनेमा असेल तर त्याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहा ना. मनोरंजनात जर द्वेषाचे शिंपण कराल तर त्यातून देश उद्ध्वस्त होईल.  आणि हा देश आहे तरी कोणाचा? हा देश तिरंग्याच्या सावलीत राहणाऱ्या प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचा आहे. मग त्याचा धर्म कुठला का असेना. भारतमाता आमची सगळ्यांची माता आहे आणि आपल्या आईवर प्रेम कोण करत नाही? आईसुद्धा आपल्या प्रत्येक अपत्याशी प्रेमाने वागते. आपले प्रत्येक मूल संस्कारी व्हावे असे तिला वाटत असते. केवळ धार्मिक स्थळी जाणे म्हणजेच संस्कार नव्हे. प्रत्यक्षात माणुसकीपेक्षा कोणताही मोठा संस्कार नाही.

आपल्या भारत मातेचे रक्षण करणे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. छोटे छोटे वाद आता आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. प्रत्येक गोष्टीवर आपण भाष्य करणे गरजेचे आहे काय, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारतात. त्याचे स्मरण करा. त्यांचे म्हणणे १६ आणे खरे आहे की, अशा शेरेबाजीतून विषाद पसरतो. गरज आहे ती प्रेम वाटण्याची. मोदीजी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा हात हातात घेऊन बोलतात तेव्हा एक सुखद वातावरण निर्माण होते. संपूर्ण देशभर एक अप्रतिम संदेश जातो. म्हणून जुन्या जखमा गाडून टाका आणि वातावरणात सुखद संदेश पसरवा. ब्रिटिशांच्या जोखडाखालून भारताला सोडवणाऱ्या गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. द्वेषाने त्यांचा बळी घेतला. त्यांनी केवळ हिंदुस्थानला नव्हे तर संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता. आपण गांधींच्या देशात राहतो हे विसरू नका. ही सद्भावाची भूमी आहे. गर्वाने म्हणा, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा !’

Web Title: Special Article: Why fight at home when there is tension at the door?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.