विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 08:02 AM2024-06-20T08:02:27+5:302024-06-20T08:03:00+5:30

लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष, गट, जात किंवा नेत्याचा पराभव झाल्याने निराश झालेल्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याला ‘जबाबदार’ कोण?

Special Article Why is election defeat so painful | विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छ. संभाजीनगर |

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा, गटाचा, जातीच्या नेत्याचा पराभव असह्य झाल्याने नैराश्येत गेलेल्या काही तरुणांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते. आजवर अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एखाद्या निवडणुकीतील पराभवाने एखाद्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येतेच, असे नाही. जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेल्या अनेक राजकीय नेत्यांचा पुढे उत्कर्ष झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

निवडणुकीतील अपयशाने एखाद्या उमेदवाराला नैराश्य येणे ही नैसर्गिक बाब आहे; परंतु पराभव जिव्हारी लावून समर्थकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलावे? नेत्यांप्रति एवढी निष्ठा, प्रतिष्ठा आणि आत्मसमर्पणाची भावना येतेच कुठून? राजकीय नेत्यांमध्ये अशी कोणती दैवी शक्ती, आकर्षण अथवा चुंबकीय तत्त्व असते, म्हणून शेकडो तरुण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.

आपल्याकडे राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट हे अत्यंत जिव्हाळ्याचे, आकर्षणाचे आणि तितकेच इर्षेचे विषय असतात. समर्थकांच्या गटांमध्ये अत्यंत टोकाचे मतभेद दिसून येतात. प्रसंगी हमरीतुमरीवर येण्याचे प्रसंग उद्भवतात. दक्षिणेकडील राज्यात तर नेते आणि अभिनेत्यांचे किती देव्हारे सजवले जातात हे सर्वश्रुत आहे. या समर्थकांकडून राजकीय नेत्यांचे, अभिनेत्यांचे पुतळे उभारले जातात, त्यांच्या प्रतिमेची मंदिरात प्रतिष्ठापना होते, घरावर, वाहनावर प्रतिमा लावल्या जातात. या फॉलोअर्सच्या जीवावर त्यांचे राजकारण, सिनेमाचा गल्ला आणि क्रिकेटपटू जाहिरातींच्या माध्यमातून बक्कळ कमाई करतात. या फॉलोअर्समुळेच एखाद्या अभिनेत्याचा टुकार सिनेमादेखील हिट होऊन जातो! यालाच इंग्रजीत ‘सेलिब्रिटी ऑबसेशन सिंड्रोम’ म्हणतात. असा सिंड्रोम आता राजकीय समर्थकांमध्येही दिसून येऊ लागला आहे.

एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये एका सेलिब्रिटीच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘द सॉरो ऑफ यंग वर्दर’ या कादंबरीने खळबळ माजली होती. त्या सेलिब्रिटीच्या शेकडो समर्थकांनी आत्महत्या केल्या. त्यातूनच ‘वर्दर इफेक्ट’ ही थिअरी पुढे आली.

सामाजिक, वैचारिक भूमिकेतून एखाद्या राजकीय नेत्याचे, पक्षाचे समर्थन करणे अथवा अभिनय क्षमता पाहून अभिनेत्यांना फॉलो करणे ही बाब एकवेळ समजू शकते. परंतु, हल्ली सर्वच क्षेत्रांत अंधभक्ती फोफावली आहे. जातीय अस्मिता, अहंकार टोकदार बनल्याने किंबहुना त्याला खतपाणी मिळत असल्याने अंधभक्तांच्या संख्येत कमालीची वृद्धी झाल्याचे दिसतेच आहे. आपल्याकडच्या राजकारणात तर जात हा अविभाज्य घटक असल्याने निवडणुकांना जातीय रंग चढू लागला आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक हे ताजे उदाहरण. महाराष्ट्रात जवळपास सर्वच मतदारसंघांत अतिशय टोकाचा जातीयवाद पाहायला मिळाला. आजवर गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या गावखेड्यातदेखील उभ्या-आडव्या सामाजिक फटी पडल्या असून, जाती-जातींमधील संवादाच्या, सौहार्दाच्या आणि सहजीवनाच्या गल्ल्या अरुंद बनल्या आहेत. दुसऱ्या समाजातील व्यावसायिकच नव्हे, तर अगदी कीर्तनकारांवरही बहिष्कार टाकल्याच्या घटना समोर येत आहेत. राजकारणाने निर्माण केलेला हा सामाजिक दुभंग पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणारा आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेले तरुण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील होते. चौघांपैकी एक तरुण तर संबंधित नेत्याच्या सोशल मीडियासाठी काम करत होता. मतदारसंघात टोकाचा जातीयवाद सुरू असल्याची जाणीवही त्याला असावी. निवडणुकीत केवळ आपला नेताच नव्हे तर जातदेखील हरली हे  शल्य आणि कदाचित यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येसारखे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. या केवळ आत्महत्या नसून जातीय राजकारणाने घेतलेले  बळी आहेत. जातीचे राजकारण करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना यासाठी जबाबदार धरले पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून अशाप्रकारे जातीयवाद उफाळून येणार असेल, तर उद्या अनेकांना घराबाहेर पडणेदेखील मुश्किल होऊ शकते !

( nandu.patil@lokmat.com )

Web Title: Special Article Why is election defeat so painful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.