विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल?

By विजय दर्डा | Updated: April 14, 2025 07:15 IST2025-04-14T07:13:24+5:302025-04-14T07:15:50+5:30

US-China Trade war tariffs: चीनने कितीही आरोळ्या ठोकल्या तरी अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात रशिया वगळता अन्य कोणताही देश चीनच्या बाजूने उभा राहणे केवळ अशक्य आहे!

Special Article: Will the 'Trump Card' Work in the War Against China in tarrif War? | विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल?

विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल?

-डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
अनेक मोठे प्रश्न जगासमोर आहेत. ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा भाग म्हणून ट्रम्प यांनी जगातील साठ देशांवर आयात शुल्क लावले. मग त्यांनी ९० दिवसांसाठी ते स्थगित का केले? बाजारामध्ये झालेला भूकंप आणि अमेरिकेमध्ये झालेल्या निदर्शनांचा दबाव, की चीनविरुद्ध व्यापारयुद्धात युरोपसारख्या जुन्या मित्रांच्या सहकार्यासाठीची चाल? चीनला घेरण्यासाठी समजून-उमजून आखलेली ही रणनीती किती यशस्वी होईल? 

ट्रम्प यांनी वाढवलेल्या शुल्कामुळे गडबडलेले, घाबरलेले आतल्या आत संतापलेले सर्व साठ देश ‘आता कोणता मार्ग काढावा’ या प्रयत्नात असतानाच ट्रम्प यांनी चीन वगळता बाकी देशांसाठी आयात शुल्कवाढ ९० दिवसांसाठी स्थगित  करत असल्याची घोषणा केली खरी, परंतु ९० दिवसांनंतर ट्रम्प यांचे धोरण काय असेल?- ही मात्र सर्वांसाठी चिंतेची गोष्ट आहे. 

ते कोणती चाल खेळतील, हे समजण्यासाठी ‘ट्रम्प यांनी चीनला कोणतीही सवलत दिली नाही’ या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. चीनवर २०  टक्के आयात शुल्क होते. ते वाढवून १४५ टक्के केले. प्रत्युत्तरादाखल चीननेही आयात शुल्क १२५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. याचा अर्थ दोन्ही देशांत व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. ‘आपण शेवटपर्यंत लढू,  अमेरिकेच्या धमकीला घाबरत नाही’ असे चीनने स्पष्ट केले. अमेरिकेमुळे नाराज झालेले देश आपल्याबरोबर येतील असे चीनला मनातून वाटत असावे. निदान हे देश  तटस्थ राहू शकतात. 

‘सर्वांनी एकत्र येऊन अमेरिकेच्या एकतर्फी दादागिरीचा विरोध केला पाहिजे’, असे शी जिनपिंग यांनी युरोपीय संघाला सांगितले आहे. मात्र चीनने आणखी पुढे जाऊ नये म्हणून ट्रम्प यांनी आधीच इतर सर्व देशांसाठी आयात शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित करून चीनच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. अर्थात आयात शुल्क लागू करण्याच्या आधी ट्रम्प यांनी भावनेच्या भरात आपल्या सहकारी देशांना लुटारू म्हटले. परंतु, व्यापारात कदाचित भाषेला फार महत्त्व नसावे. महत्त्वाचा असतो तो नफा आणि सवलत. अमेरिका जर सवलत देत असेल तर हे देश बरोबर राहतील. कारण कोणत्याही प्रकारे चीनवर  भरोसा ठेवावा असा तो देश नाही.

अशा स्थितीत चीनचे काय होईल? जगातल्या या दुसऱ्या मोठ्या महाशक्तीची अंतर्गत परिस्थिती ठीक नाही. बांधकाम व्यवसाय संकटात आहे. बेरोजगारी सातत्याने वाढते आहे. अशा परिस्थितीत निर्यात कमी झाली तर बहुतेक कारखाने बंद पडतील. एकट्या अमेरिकेला चीन सुमारे  ४४० अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. त्यावर १४५ टक्के आयात शुल्क लागले तर इतक्या महागड्या वस्तू कोण खरेदी करेल? दुसऱ्या देशांमार्फतही चीन अमेरिकेला सामान पाठवू शकणार नाही. कारण त्या देशांवरही ट्रम्प यांचे लक्ष असेल.

अमेरिकेलाही त्रास होईल हे निश्चित. अमेरिकेत महागाई वाढेल; परंतु ‘अमेरिका श्रीमंत देश आहे’, असे ट्रम्प यांनी आधीच म्हटले आहे. याचा अर्थ, नुकसान सोसायला अमेरिकेची तयारी आहे. अमेरिकेला त्रास देण्यासाठी चीन दुसऱ्या मार्गांचाही अवलंब करेल. तांबे आणि लिथियमसारख्या धातूंवर प्रक्रिया करण्यात चीन अग्रेसर आहे. हे कौशल्य अमेरिकेला हस्तगत करता येऊ नये अशी इच्छा चीन बाळगणार. 

अमेरिकन सैन्य थर्मल इमेजिंगसाठी गॅलियम आणि जर्मेनियम नावाच्या धातूचा उपयोग करते. या धातूंच्या पुरवठ्यात चीनने आधीच अडथळे उभे केले आहेत. चीनमधील उद्योग संकटात सापडावेत म्हणून त्यांना  आवश्यक त्या वस्तू मिळू नयेत यासाठी अमेरिकाही प्रयत्न करेल. उदाहरणच द्यायचे तर प्रगत स्वरूपातील मायक्रो चिप. एआयच्या उपयोजनांसाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते.

एक रशिया सोडला तर दुसरा कोणताही मोठा देश उघडपणे बाजूने उभा राहणार नाही ही चीनच्या दृष्टीने सर्वात मोठी अडचण आहे. ट्रम्प यांनी जगाला बरोबर घेऊन चीनच्या विरुद्ध हे आर्थिक युद्ध पुकारले तर चीनसाठी आगामी काळ  संकटांचा असेल. परंतु, ट्रम्प यांना आपले प्रत्येक कार्ड ‘ट्रम्प कार्ड’ आहे असे वाटते. उद्या ते कोणते कार्ड फेकतील हे सांगता येणार नाही.

आरजू काझमींच्या धाडसाला सलाम! 

पाकिस्तानच्या निर्भय पत्रकार आरजू काझमी यांच्याविषयी. १९४७ मध्ये त्यांचे पूर्वज भारत सोडून पाकिस्तानमध्ये आले याचे त्यांना दुःख आहे. आरजू इस्लामाबादमध्ये राहतात आणि पाकिस्तानी हुकूमत, सीआयए  आणि लष्करावर बेधडक तोफा डागतात. 

भारताच्या प्रगतीची प्रशंसा करतात आणि पाकिस्तानला गर्तेत कोणी घातले हेही सांगतात. कित्येक वर्षांपासून त्यांनी निर्भय पत्रकारितेचा ध्वज फडकत ठेवला आहे. परंतु, आता त्यांचे जीवन धोक्यात आहे. त्यांची बँक खाती, सर्व कार्ड्स आणि त्यांचा पासपोर्टही गोठवण्यात आला आहे. त्या संकटात आहेत. 

एक व्हिडीओ प्रसारित करून त्यांनी ही बातमी जगासमोर आणली आणि सांगितले की, मी झुकणार नाही. आरजू, तुमच्या धाडसाला सलाम! तुम्ही सुखरूप राहावे,  यासाठी प्रार्थना...!

Web Title: Special Article: Will the 'Trump Card' Work in the War Against China in tarrif War?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.