विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 09:19 AM2024-06-22T09:19:31+5:302024-06-22T09:20:15+5:30

योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे.

Special Article World eyes on India for treatment of serious diseases | विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असो., महाराष्ट्र|

कोणताही दीर्घकालीन आणि प्राण गंभीर आजार सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवतो. त्यातही कर्करोग म्हटले की भल्याभल्यांचे हातपाय गळून जातात. पण कर्करोगावर उपचार होऊ शकतात आणि वैद्यकीय शास्त्रातील काही आधुनिक उपचार पद्धतींनी, काही कर्करोग बरेही होतात आणि बरेचसे नियंत्रणात येतात.


कर्करोगाच्या संदर्भात किचकट आजार आणि त्यावरील उपचारही बरेच महागडे, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना ‘आता काय करायचे?’ म्हणून धडकी भरते. पाश्चात्त्य देशात विविध आजारांवरील उपचार अतिशय महागडे आणि सधन कुटुंबातील लोकांनाही न परवडणारे असल्याने काही गंभीर आजार उद्भवले की ते भारतात धाव घेतात. योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी नाही.


इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या मान्यताप्राप्त भारतीय वैद्यकीय नियतकालिकात, नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात कर्करोगाचे अंदाजे १४,६१,४२७ रुग्ण होते. हे प्रमाण, दर १ लाख भारतीयांमध्ये सरासरी १०० जण कर्करोगग्रस्त असल्याचे दर्शवते. दर नऊ भारतीयांमधील एकाला आयुष्यभरात केव्हा तरी कर्करोग होण्याची शक्यता असते. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा, स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि १४ वर्षांपेक्षा लहान मुलामुलींमध्ये रक्ताचा कर्करोग (लिम्फॉइड ल्युकेमिया) मोठ्या प्रमाणात आढळून आले. संशोधकांच्या अनुमानानुसार २०२५ पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १२.८ टक्के वाढ होऊ शकते.


कर्करोगाच्या उपचारांसाठी पुढील काही महत्त्वाच्य पद्धती आज उपलब्ध आहेत.


१. शस्त्रक्रिया : यामध्ये कर्करोगाची गाठ आणि आसपासच्या उती काढून टाकल्या जातात. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.
२. केमोथेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी, कर्करोगाच्या गाठीचा आकार कमी करण्यासाठी, केमोथेरपीमध्ये काही विशेष औषधे शिरेवाटे दिली जातात. याचा वापर दुसऱ्या टप्प्यानंतर केला जातो.
३. रेडिएशन थेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, त्यांची वाढ रोखण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यासाठी किरणोत्सर्गी पदार्थांचे उच्च डोस या पद्धतीत वापरतात. शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही अशा प्रमाणात कर्करोगाची वाढ झाली असेल, तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रेडिएशन दिले जाते. 


कर्करोग रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघत नाही. त्यामुळे गोरगरिबांनाच नव्हे, तर मध्यमवर्गीयांसाठीही हे उपचार आर्थिक कुवतेच्या पलीकडे असतात. पाश्चात्त्य नागरिकांची उपचारासाठी भारतात धाव घेण्यामागे केवळ आर्थिक बचत हे कारण नसून भरवशाचा उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी हेदेखील एक कारण आहे.  कर्करोग, हृदयाच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अवयवारोपण अशा अनेक वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून लाखो रुग्ण दरवर्षी भारतात येतात. रास्त दर, उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा, अल्पप्रतीक्षा कालावधी, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, वैविध्यपूर्ण उपचार पर्याय, भाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता.. या सर्व गोष्टींमुळे आपला देश लाखो परदेशी रुग्णांसाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे. परंतु आजमितीला काही ठरावीक खासगी हॉस्पिटल्स आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करत आहेत. मात्र या गोष्टींचे नियोजन मोठ्या प्रमाणात, सर्वसमावेशक दृष्टीने, अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक व्यावसायिक पद्धतीने जगभरात सादर केले गेल्यास भारतात आणखी रुग्ण येतील. परिणामी आपल्याला अधिक परकीय चलन तर मिळेलच; पण त्यामुळे या वैद्यकीय सेवांचा खर्च कमी होऊ शकेल. त्याचा फायदा निश्चितच परदेशी आणि गरीब भारतीय रुग्णांना मिळू शकेल.

(avinash.bhondwe@gmail.com)

Web Title: Special Article World eyes on India for treatment of serious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.