विशेष लेख: कमनशिबी; पण मनस्वी सुधीर नाईकची अधुरी कहाणी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 10:54 AM2023-04-07T10:54:56+5:302023-04-07T10:55:34+5:30
खेळाडू, खेळाडूंचा रत्नपारखी आणि खेळपट्टीचा जाणकार म्हणून सुधीरची गुणवत्ता अफाट होती. पण, नियतीनं त्याच्या गुणवत्तेचं योग्य दान त्याच्या पदरात टाकलं नाही.
क्रिकेटमधले बारकावे ठाऊक असलेला, हुशार असा सुधीर नाईक गेल्याची दुःखद वार्ता क्रिकेट चाहत्यांना नक्कीच शोकाकुल करून गेली आहे. चिवट फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या सुधीरला आयुष्याचा डाव लांबवता आला नाही. त्याला नियतीने ‘जीवदान’ दिले नाही. सुधीर तसा कमनशिबी. मोठे होण्याचे अनेक गुण त्याच्याकडे होते. पण, त्याला घवघवीत यश मिळाले नाही. खरंतर खेळाडू आणि रत्नपारखी म्हणूनही त्याच्याकडे जबरदस्त गुणवत्ता होती. याची चुणूक त्याने मुख्य खेळाडू विंडीजला गेल्याने कमकुवत झालेल्या मुंबई संघाला १९७०/७१ मध्ये रणजी करंडक मिळवून देताना दाखवली होती. अतिशय तरुण, अननुभवी खेळाडूंना घेऊन त्याने अंतिम सामन्यात बलाढ्य महाराष्ट्र संघाचा पराभव केला होता. त्याच्या नेतृत्व गुणांना क्रिकेट पंडितांनी सलाम ठोकला होता. विजय भोसले या बुजूर्ग फलंदाजांची निवड त्याने निवड समितीला करायला भाग पाडली होती. याच भोसलेची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली होती. आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत, प्रसंगी कडकपणे वागून त्याने मुंबईची सद्दी कायम राखली होती. हे एक धवल यश त्याला लाभलं. एरवी त्याची उपेक्षाच झाली.
रणजी स्पर्धेत तो सातत्याने धावा टाकत होता. पण, भारतीय निवड समितीने त्याला उशिरा संधी दिली. १९७४चा अजित वाडेकर संघाचा इंग्लिश दौरा खडतर होता. तीन कसोटींची मालिका भारताला ३/० अशी गमवावी लागली होती. दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीमध्ये दुसऱ्या डावात तर ४२ धावांत सर्व संघ बाद झाला होता.
या कसोटीनंतर दोन वाईट घटना घडल्या होत्या. भारतीय राजदूतांनी दिलेल्या खानपान समारंभात भारतीय संघाचा अपमान करण्यात आला होता आणि ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील एका सुपर मार्केटमध्ये सुधीर नाईकने मोजे चोरल्याचा आळ त्याच्यावर घेतला गेला होता. हे प्रकरण तिथल्या पत्रकारांनी निष्कारण मोठं केलं आणि मनस्वी सुधीरला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. मात्र, संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी उभे राहिले म्हणून त्याला तिसऱ्या कसोटीत सलामीला खेळता आले. दुसऱ्या डावात ७७ धावांची चिवट खेळी करून त्याने आपली जिद्द दाखवून दिली होती. भारतात आल्यावरही सुधीरला या प्रकरणाचा खूप त्रास सहन करावा लागला. तो असं काही करणं शक्यच नव्हतं. जे काही झालं ते गैरसमजुतीतून होतं.
पाहुण्या विंडीज संघाविरुद्ध त्याला मग दोन कसोटी मिळाल्या. वेगवान मारा त्याने धीराने खेळून दाखवला होता. पण, मोठी धावसंख्या न झाल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लगेच संपली होती. क्रिकेटवरचे त्याचे प्रेम अफाट होते. तो टाटाकडूनसुद्धा गंभीर राहत खेळत राहिला. त्याने नंतर मुंबई निवड समितीचेसुद्धा काम पाहिले. आपल्या नॅशनल क्लबमध्ये प्रशिक्षक होत त्याने झहीर, वसीम जाफर.. असे क्रिकेटपटू घडवले. तो इथेच थांबला नाही. त्याने वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीची निगराणी राखण्याची जबाबदारी स्वीकारली. तिथे त्याने २०११ ला भारताला विश्वचषक मिळवून देणारी खेळपट्टी तयार करून त्यातील आपले ज्ञान दाखवून दिले होते.
त्याच्या नावावर आणखी एक अनोखी कामगिरी झाली ती १९७४ च्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या-वहिल्या एक दिवसीय सामन्यात ! भारताकडून या प्रकारातला पहिला चौकार त्याने लगावला होता. अशी ही वेगळीच नोंद. पण, वानखेडे खेळपट्टीवरच एकदा दक्षिण आफ्रिकेने धावांची लूट केली होती. तेव्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्यावर भडकला होता. सुधीरने नेहमीच मनापासून आपल्याकडून काही देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे चीज झाले नाही. तो पहिल्यापासून अभ्यासू. रूपारेलसारख्या कॉलेजमधून रसायनशास्त्र घेऊन तो बी.एस्सी. झाला होता. टाटा ऑइलमध्ये तो इमाने -इतबारे नोकरी करायचा. त्याची पत्नी विदुषी होती... वसुंधरा पेंडसे नाईक ! आपल्या विद्वत्तेची छाप त्यांनी साहित्यात आणि प्राध्यापकीमध्ये सोडली होती. त्या अकाली गेल्या, हेही दुः ख सुधीरच्या वाट्याला आले होते. अलीकडे पार्ल्यात झालेल्या अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभात सुधीरची भेट झाली होती. हातात काठी घेऊन तो आवर्जुन आला होता. क्रिकेट हा त्याचा श्वास होता. अस्सल क्रिकेट रसिकांना त्याची आठवण कायमच राहील.
- संजीव पाध्ये, क्रीडा अभ्यासक