विघ्नहर्त्याच्या मंगल उत्सवाची प्रेरणा कालातीत राहावी, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 06:48 AM2024-09-16T06:48:58+5:302024-09-16T06:49:30+5:30

नव्या युगात डिजिटल आव्हाने स्वीकारताना उत्सवाचे मांगल्य, पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपली आहे, याचे भान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राखले पाहिजे.

Special editorial article on Ganeshotsav | विघ्नहर्त्याच्या मंगल उत्सवाची प्रेरणा कालातीत राहावी, म्हणून...

विघ्नहर्त्याच्या मंगल उत्सवाची प्रेरणा कालातीत राहावी, म्हणून...

पुनीत बालन, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, पुणे

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या।।

जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा।।

अशा शब्दांत ज्ञानेश्वर माउली गणेशवंदनेचा प्रारंभ करतात.  माउली या आत्मरूपाला स्वसंवेद्य म्हणतात. स्वत:च स्वत:च्या चेतनेने जागृत, सजग असलेल्या स्वसंवेद्यतेचे हे वर्णन समाजालाही लागू पडते. कोणताही समाज हा स्वत: चेतन असतो. समाजातील लोक, समूह, संस्था, संघटना यांच्यासोबतच समाजाबाहेरचे घटक याचा प्रभाव समाजावर पडत असतो. त्यातून त्याची चेतना वेळोवेळी आकार घेत असते. गणेशोत्सव हे याच सामाजिक चेतनेचे जागृत उदाहरण.

२०१७-१८ पासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा उत्सवप्रमुख म्हणून काम करत असताना या गोष्टींचे नव्याने भान येत गेले. त्यातून माझ्यातला कार्यकर्ता आणि माणूस सर्वार्थाने समृद्ध झाला. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सुरू केला. त्यानंतर  लोकमान्य टिळकांनी याला सार्वजनिक रूप देऊन त्याचा मोठा प्रसार केला. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध लोकसंघटन आणि जनमत तयार करण्याच्या कामी या उत्सवाने मोलाचे योगदान दिले. तिथपासून आजपर्यंत या उत्सवाने आणि उत्सवाशी जोडलेल्या अनेक घटकांनी मोठे सामाजिक योगदान दिले आहे. कोविडच्या काळात उत्सव बंद पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता खरा; पण विघ्नहर्त्यानेच ‘ऑनलाइन उत्सवा’ची वाट दाखवत त्यावर उपाय सुचवला. देशातला पहिला ऑनलाइन गणेशोत्सव २०२० आणि दुसरा २०२१ या वर्षात आम्ही साजरा केला.

पं. विजय घाटे, पं. राकेश चौरसिया, शंकर महादेवन, जावेद अली, नंदेश उमप आदी कलाकारांच्या कार्यक्रमांसह ऑनलाइन दर्शनाचीही सोय केली. यू-ट्यूब व इतर समाजमाध्यमांद्वारे अक्षरश: करोडो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. दुसरीकडे कोविडच्या काळात लोकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत, अन्नधान्याचा पुरवठा करण्यातही गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला. या ना त्या रूपात गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते कोविड काळात मदतीसाठी सज्ज होते. अनेक गणेश मंडळे आपापल्या परीने विविध सामाजिक कार्यात मदत देत असतात. गणेशोत्सव, गणेश मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांची हीच खरी ताकद आहे. दरम्यानच्या काळात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या  ऐतिहासिक वाड्याच्या पुनरुज्जीवनाचे काम झाले. मी मंडळात आलो तेव्हा भवन खूप जुने झाले होते. इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे वाड्याच्या जुन्या रचनेला धक्का न लावता या वाड्याचे पुनरुज्जीवन केले गेले.

यंदा काश्मीरमध्येही गणेशोत्सव साजरा होत आहे. २०२५च्या गणेशोत्सवापूर्वी काश्मीरमध्ये एक भव्य गणेश मंदिर बांधण्याचा मानस आहे. ही गणेशोत्सवाच्या ‘ग्लोबल’ स्थित्यंतराची नांदी ठरेल. कोणत्याही सार्वजनिक कामाला चिकटून दुष्प्रवृत्ती शिरकाव करण्याची शक्यता असते. परंतु, अशा दुष्प्रवृत्तींपासून मंडळांना अबाधित ठेवण्याबाबत सगळीच मंडळे आग्रही आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने तर धांगडधिंगा, कर्कश आतषबाजी याला पहिल्यापासूनच फाटा दिला आहे.

नव्या युगात डिजिटल आव्हाने स्वीकारताना उत्सवाचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याचे भान प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने राखले पाहिजे. हा उत्सव सुरू झाला त्यावेळचे त्याचे उद्दिष्ट वेगळे होते. पण आजही लोकसंघटन, लोकप्रबोधन आणि लोकशासनासाठी याचा प्रभावीपणे वापर करणे शक्य आहे. त्या दृष्टीने योग्य कार्यक्रम आखले तर हा उत्सव कालातीत आणि प्रेरणादायी ठरू शकेल.

Web Title: Special editorial article on Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.