मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:54 AM2022-09-27T10:54:13+5:302022-09-27T10:55:04+5:30

अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि जिवंत माणसांना पकडून त्यांचा जीव घेतात. माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते.

special editorial article on kidnapping school children social media facebook whatsapp rumors police | मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

Next

राही भिडे,
ज्येष्ठ पत्रकार

कानोकानी अफवा पसरविण्याचे दिवस कधीच संपले,  वाट्टेल त्या अफवा पसरवून दंगे, धोपे करण्यासाठी आता समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, समाजमन दुभंगल्याने मुजफ्फरनगरची दंगल झाली होती. गोवंश हत्येच्या अफवांनी कितीतरी जणांचा बळी घेतला. आता मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवेतून संतप्त झालेला जमाव कायदा हातात घेऊन दिसेल त्याला मारहाण करीत सुटला आहे. गेल्या दोन वर्षांंपासून या घटना घडत असतानाही अशा प्रकारच्या अफवांचे निराकरण करण्यात पोलीस, समाज आणि सरकारला अद्याप यश आलेले नाही.

दोन वर्षांपूर्वी ओडिशात समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या दोघांचा मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून बळी घेतला गेला. त्यानंतर, पालघरमध्ये दोन साधूंना अशाच प्रकारे जमावाने मारले. अशा घटनांना नंतर हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन असे धार्मिक वळण देण्याचे प्रकारही झाले. राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला गेला. पालघर साधू हत्याकांडात तर थेट सोनिया गांधी यांनाही  ओढले गेले. योगी आदित्यनाथांपासून अनेक जण त्यावर बोलले. त्यानंतर, उत्तर प्रदेशातच एका साधूची हत्या झाल्याने, महाराष्ट्रावर तिकडून होणारी टीका थांबली. 

कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची आपली वृत्ती असल्याने, अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांचे फावते. दंगली घडवून त्यातून आपली पोळी भाजणारे काही कमी नाहीत. ज्या वेगाने अफवा पसरविल्या जातात, त्याच वेगाने त्यांचे निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. आताही सांगलीत दोन साधूंना मारहाण करण्यामागे गैरसमजच जास्त आहेत. तिथल्या घटनेवर पडदा पडत नाही, तोच नांदेड, बुलडाण्यातही मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली.

अपहरणकर्ते शहरात फिरत असल्याचे संदेश ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असून, त्याच धास्तीतून राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. नाशिकमध्ये मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप दिला. पोलीस वेळीच पोहोचल्याने या तरुणाची सुटका झाली. जळगावमध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. पुणे आणि नागपुरातही या अफवा पसरल्याने घबराट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका महिला मुले चोरत असल्याचा संशय आल्याने मारहाण करण्यात आली. कुठलीही खात्री न करता, तसेच महिलेस बाजू मांडण्याची संधी न देता या महिलेस चपलांनी मारहाण करण्यात आली. ही महिला बेघर असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईप्रमाणेच नागपूर व पुण्यातही मुले चोरणाऱ्या टोळीबाबतची अफवा पसरली आहे. नागपूर शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर एक चित्रफीत व्हायरल झाली. या टोळीने एका मुलाचे अपहरण केल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी तातडीने मुलाला शोधले. त्याच्या वडिलाचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला, घरी परतताना दुधाच्या कॅनचे झाकण कुठेतरी पडले. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता. 

पुण्यातही अशीच अफवा पसरली असल्याने पालक घाबरले आहेत. नेहमीप्रमाणे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे; परंतु अशा किती प्रकरणांत कारवाई झाली, याचे उत्तर मिळत नाही. खोट्याला अफवेचे पंख मिळाले, तर खोट्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त होतो.  एखाद्या अफवेत इतकी ताकद असते, की एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच जमाव संतप्त होतो. अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि मॉब लिंचिंगला जन्म देतात. त्यात गुंतलेल्या प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते. निष्पापांना मारहाण करणे हा संतप्त जमावाचा उद्देश असतो. अफवांप्रमाणे हल्ली व्हिडीओ चित्रफिती पसरत जातात, मग सुरू होते, मॅाब लिंचिंगची मालिका.

Web Title: special editorial article on kidnapping school children social media facebook whatsapp rumors police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण