भारतीय क्रिकेटमधल्या कर्ण - अर्जुनाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:30 AM2021-12-17T08:30:59+5:302021-12-17T08:31:34+5:30

एकाकडे अर्जुनाची गुणवत्ता आणि वैभव.. तर दुसरा कर्ण. शापित; पण, तितकाच पराक्रमी ! दोन सुपरस्टार एका म्यानात राहत नाहीत, क्रिकेटमध्येही नाहीत.

special editorial on team india cricket story of virat kohli and rohit sharma | भारतीय क्रिकेटमधल्या कर्ण - अर्जुनाची कहाणी

भारतीय क्रिकेटमधल्या कर्ण - अर्जुनाची कहाणी

googlenewsNext

द्वारकानाथ संझगिरी, ख्यातनाम क्रीडा समीक्षक

विराट कोहली आणि रोहित शर्मा ! भारतीय क्रिकेटचे दोन राजपुत्र ! एक जवळपास परिपूर्ण फलंदाज,दुसरा शैलीदार. एक थेट आक्रमक, दुसरा  प्रेमाच्या फुंकरीने चेंडूला सीमापार पाठवणारा कलाकार ! एकाकडे  अर्जुनाची गुणवत्ता आणि वैभव, दुसरा कर्ण; शापित पण, तितकाच पराक्रमी ! दोघांचे स्वभाव वेगळे.

विराटच्या अंगप्रत्यंगातून आक्रमकता व्यक्त होते.  मैदानावर कॅमेरे ते काम करतात. अर्थात आक्रमकता ही विराटच्या बाबतीत, ब्रँड वाढवण्यासाठी केलेली गोष्ट नाही. ती नैसर्गिक आहे. रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करतो पण, शरीराची भाषा तेवढी आक्रमक नाही.

विराट फिट आहे. रोहितकडे तो फिटनेस नाही. अधूनमधून दुखापती त्याला सतावत असतात.

दोघं साधारण एकाचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले. पण, विराट कसोटी क्रिकेट आधी खेळला आणि बघता बघता तिथे मोठा झाला. इतका की, सचिन, द्रविड बरोबर त्याचे नाव घेतलं जाऊ लागलं.

रोहितने  लागोपाठ दोन शतक ठोकून कसोटीत पदार्पण केलं. पण, पुढे भारताबाहेर तो कसोटीत मोठा परफॉर्मन्स देऊ शकला नाही. वनडेत तो मोठा होत गेला. द्विशतक ठोकण्याचे विक्रम केले. पण, विराट त्याच्यापेक्षा मोठा झाला.

टी २० मध्ये मुंबई इंडियन्सला वारंवार कर्णधार म्हणून जिंकून दिल्यानंतर रोहितचं वलय वाढलं. २०१९ च्या विश्वचषकात त्याने डोळे दिपवणारी पाच शतकं  ठोकली. विराटने सुद्धा धावा केल्या ; पण, सुंदरींच्या घोळक्यात शतक हीच ऐश्वर्या राय असते ! - तिथून ते दोघं संघातले सुपरस्टार झाले. आणि त्यानंतर स्पर्धा सुरू झाली. २०१९ च्या विश्वचषकावेळी दोघांचं नीट जमत नाही अशी कुजबुज सुरू झाली.

आता विराट म्हणतो,‘‘ तसं काहीच नाही. आमचे संबंध उत्तम आहेत.’’

पण, असं पूर्वी सुनील गावस्कर आणि कपिल देवही म्हणाले होते. १९८४ साली बेजबाबदार फटका खेळल्यानंतर कपिल देवला इंग्लंड विरूद्ध पुढच्या कलकत्ता कसोटीत वगळलं होतं. त्यानंतर प्रचंड गदारोळ उठला. भांडणाबद्दल लिहिलं गेलं. काही दिवसांनी सुनील कपिलच्या घरी चंदीगढ इथे गेला आणि दोघांनी जाहीर केलं, ‘‘ आमच्यातले मतभेद हा पत्रकारांचा कल्पनाविलास आहे.’’-  खरंतर तेव्हाही दोघांमध्ये आग धुसमुसत होती.

पत्रकारांचा कल्पनाविलास  आगीपेक्षा मोठा असू शकतो. पण, ते धुक्याला धूर म्हणत नाहीत.

एका संघात दोन व्यक्तिमत्त्व लार्जर दॅन लाईफ झाली की, चढाओढ असते.  इगोला फुंकर घातली जाते. मग, ठिणग्या उडतात. जगभर असं घडलंय.  सोबर्स - कन्हाय, विव रिचर्ड्स - ग्रिनीच, इम्रान - जावेद, असे अनेक. आज माध्यमं अधिक आक्रमक आहेत. त्यामुळे आगीत तेल जास्त ओतलं जातं. शिवाय ब्रँड, पैसे खूप मोठे आहेत . त्यामुळे स्पर्धा वाढलीय. त्याचा परिणाम त्या दोन व्यक्तींवरही होतो. सचिन, द्रविड, गांगुलीच्या काळात काय धुसफुशी नव्हत्या?- पण, त्या हॉटेलच्या बाहेर  क्वचित यायच्या !

पण, ह्यामुळे संघावर परिणाम होतो का?, पतौडीच्या काळी, ज्येष्ठ खेळाडू त्याच्या हाताखाली खेळत. मी एकदा त्याला विचारलं होतं, ‘‘ ते त्यांचं पूर्ण सहकार्य देतात?’’ 

तो म्हणाला, ‘‘प्रत्येकाला किमान आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा असं वाटतं ना?’’ 

मी म्हटलं, हो. 

तो म्हणाला, ‘‘बस्स, शेवटी त्याचा फायदा संघालाच होतो ना?, मला पुरतं तेवढं’’ 

खरंय.

वनडेचं नेतृत्व गेल्यामुळे विराट दुखावला असेलच. त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकली नसेल, पण, ७० टक्के सामने तर, जिंकले आहेत. त्याचा कर्णधार म्हणून परफॉर्मन्स उत्तम आहे. विराट दुखावलेला वाघ आहे. तो झेप घेणार. सचिनचं नेतृत्व गेल्यावर तो भन्नाट खेळला होता. आठवा १९९८ साल.

रोहितसुद्धा कसोटीत मोठा फलंदाज व्हायच्या दृष्टीने पावलं टाकतोय. इंग्लंडमध्ये त्याने सिद्ध केलं की, तो देशाबाहेर धावा करू शकतो. तो कसोटीचा उपकर्णधार असल्यामुळे त्याला  कसोटी सिंहासन खुणावत असेलच ! आत्ता जायबंदी असेल पण, उपकर्णधार झाल्यामुळे संघातल्या त्याच्या जागेला बळकटी प्राप्त झालीय. त्याचाही परफॉर्मन्स सुधारेल... बदल आणि स्पर्धा यातून चांगलंही निपजतं की !

पण, एक खरं, दोन सुपरस्टार एका म्यानात राहत नाहीत. क्रिकेटमध्येही नाहीत.

Web Title: special editorial on team india cricket story of virat kohli and rohit sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.