विशेष लेख अन्वयार्थ: ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट; एसटीचा फायदाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:53 AM2023-11-02T09:53:07+5:302023-11-02T09:53:32+5:30
‘बंद पडण्याच्या शक्यतेपासून पुन्हा उभारीपर्यंतचा प्रवास’ एसटीने गेल्या दीडेक वर्षात केला! असे होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल!
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
दोन ते अडीच वर्षे कोरोना आणि साडेपाच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे एसटीची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली होती. अनेक जाणकारांनी भविष्यात एसटी कायमची बंद पडेल, अशी भाकितेसुद्धा केली होती. मे २०२२ मध्ये एसटीने पुन्हा नव्याने आपल्या प्रवासी सेवेचा ‘श्रीगणेशा’ केला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांना सर्व बसमधून अर्ध्या तिकिटात प्रवास या सवलतीमुळे तसेच महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे एस.टी. महामंडळात पुन्हा आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे राहण्याची क्षमता निर्माण झाली आहे. केवळ १५ ते १८ महिन्यांमध्ये अस्तित्वहीन ते आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणापर्यंतचा एसटीचा प्रवास फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे. असे काही होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल. खासगी वाहने कमी असल्याने एस.टी. महामंडळ १९९० पूर्वी आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. कारण त्यांना फारशी स्पर्धा नव्हती. कोरोना काळ व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपानंतर पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झाली.
पण, अल्प उत्पन्नामुळे एसटीचा मासिक तोटा वाढत राहिला. वेतन, डिझेल व देखभाल खर्च भागविणे कठीण झाले. तथापि, मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत राज्य शासनाला वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक मदत द्यावी लागत होती. परंतु, मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली. तत्पूर्वी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली. शासनाच्या या दोन निर्णयांमुळे एसटीच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाला द्यावी लागणारी रक्कम ३०० ते ३५९ कोटींच्या घरात गेली. त्यामुळे शासनाकडून घ्याव्या लागणाऱ्या मदतीचा आकडा कमी झाला आहे.
असे आहे एसटीचे गणित
- सध्या एसटीमधून दिवसाला साधारण ५५ लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. महिला प्रवाशांची संख्या पूर्वी दिवसाला साधारण सहा लाखांच्या घरात होती ती आता दुपटीपेक्षा जास्त वाढून १४ लाख झाली आहे. त्यातच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना तिकीट भाड्यात पूर्ण सवलत दिल्याने त्यांची संख्या दिवसाला साधारण पाच ते सहा लाख इतकी झाली आहे.
- ऑगस्ट २०२३ मध्ये तर एसटीचे एकूण उत्पन्न ८०७.५५ कोटी रुपये आहे. त्यात वेतन, डिझेल व देखभाल खर्च ८५४.९३ कोटी रुपये इतका असून, फक्त ४७.४२ कोटींची तूट आहे.
- त्यानंतर सप्टेंबरमधील एकूण उत्पन्न ७५३.४४ कोटी रुपये इतके असून, खर्च ७७९.७७ कोटी रुपये इतका आहे. म्हणजेच तुटीचा आकडा २६ कोटी ३३ लाख इतका कमी झाला आहे.
दिवाळीतही होईल फायदा
दिवाळीमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन ही तूट भरून निघेल व एसटी नफ्यात येईल यात शंका नाही. परंतु योग्य नियोजनाबरोबरच भविष्यात बसेसची संख्या वाढवावी लागणार आहे. कारण महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवासी वाढल्याने इतर प्रवाशांना गाडीत बसायला जागा मिळत नाही. परिणामी, त्यांची गैरसोय होते. प्रवाशांना गुणात्मक सेवा देण्यावर भर द्यावा लागणार आहे. सवलतीच्या माध्यमातून एसटीकडे वळलेला प्रवासी कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी आपला दर्जा आणि गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे! योग्य निर्णय घेतले, या निर्णयांची सक्षमपणे अंमलबजावणी झाली, तर ते निर्णय फायदेशीर ठरू शकतात आणि समाजासाठीही कल्याणकारी ठरू शकतात, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. याच मार्गावरून प्रवास करण्याची आपल्याला गरज आहे.