विशेष मुलाखत: भारताचा CAG होतो, आता लोणची घालण्यात गर्क आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 08:36 AM2022-07-20T08:36:48+5:302022-07-20T08:38:01+5:30
भारताचे माजी महालेखापरीक्षक राजीव मेहरिशी सध्या लोणची घालतात! लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाची थोडी चव!
आपण लोणचं घालायला कसे शिकलात?
लोणचं कसं घालतात हे मी माझ्या आजी आणि आईकडून शिकलो. विद्यार्थी दशेत असताना मी स्वयंपाक करायचो. दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असतानाही मी स्वयंपाक चालू ठेवला होता. लोणचंही घालायचो. माझी आई जयपूरहून वेगवेगळ्या प्रकारची लोणची मला पाठवायची. बोलता बोलता मी लोणचं घालणं शिकलो.
अधिकारी म्हणून पार पाडायच्या ढीगभर कामातून आपल्याला वेळ कसा मिळतो?
लोणचं घालणं हे मनावरचा ताण दूर करण्याचं प्रभावी साधन आहे. माझं कुटुंब, मित्रांसाठी मी स्वयंपाक करतो. वेळ घालवण्यासाठी ते खूप छान असतं.
व्यावसायिक तत्त्वावर लोणची घालायला लागलात, तेव्हा प्रतिसाद कसा होता?
दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यावर माझी धाकटी सून आस्था जैन ही कल्पना घेऊन माझ्याकडे आली. आता मी उत्पादन विभागाचा प्रमुख आहे आणि ती वितरण बघते. आमचा ब्रँड असा जन्माला आला.
‘पिकली, द ट्रस्ट ऑफ दादा’ या अनोख्या नावाची काय गंमत आहे?
माझ्या सुनेने लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप रजिस्टर केली ती शौर्य पिकल्स अँड मसालाज् या नावाने. शौर्य हे माझ्या नातवाचं नाव. मी त्याचा दादा म्हणून हे नाव! माझ्या लोणच्याला काही माप नाही. मला एक अंदाज असतो आणि तो बरोबर ठरतो. मीठ किती घालायचं, मेथी, धने, सुंठ यांचे प्रमाण काय, हे मला सांगता येणार नाही. अंदाजाने पदार्थांचं मिश्रण करतो.. ते उत्तम जमतं!
हे सगळं कसं सुरू झालं?
८० च्या दशकात मी दिल्लीत होतो. एके दिवशी माझ्याकडचं लोणचं संपलं. जयपूरहून आईकडचं लोणचं येण्याची वाट पाहण्याऐवजी मी स्वतःच तो प्रयोग करायचं ठरवलं. तो यशस्वी झाला. तेव्हापासून हे चालू आहे.
किती प्रकारची लोणची तुम्ही तयार करता?
सध्या मी वीस प्रकारची लोणची तयार करतो. त्यामध्ये वांगी, कारलं, फणस, ब्लूबेरी, आवळा, सुका खजूर, चिनी संत्रं, करवंद आदींचा समावेश आहे. शिवाय भिन्न भिन्न चवीचं आंबा आणि लिंबाचं लोणचं तर असतंच! या लोणच्यात मसाला कमी असतो. कांदा आणि लसूण घालत नाही.
तुम्ही कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेता का?
मी किमतीकडे न पाहता उत्तम दर्जाचा माल घेत असतो. लोणच्यात बाल्सेमिक विनेगर घातलं जातं, जे अत्यंत महाग आहे. काही ठराविक प्रकारचं मोहरीचं तेल भरतपूर या माझ्या गावाकडून आणतो. तिथे लोणच्याचा मसाला तयार करण्याची यंत्रं आहेत; पण मी तयार मसाला घेत नाही.
नीती आयोगाचे माजी कार्यकारी प्रमुख अमिताभ कांत यांच्या व्यतिरिक्त तुमची उत्पादनं कोण कोण वापरतं? पंतप्रधान, राष्ट्रपती...
मी नावं घेणार नाही; पण एवढं नक्की सांगेन, की नोकरशाहीतले माझे काही मित्र आहेत तसेच अन्य काही क्षेत्रातले लोकही माझी लोणची वापरतात.
तुम्ही अनेक राजकारण्यांबरोबर काम केलं आहे. प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी शैली असते. तुमचा संबंध आलेल्या काही नेत्यांविषयी सांगाल?
देशात जे काही घडतं, त्याची जबाबदारी राजकारण्यांवर असते. त्यातल्या बहुतेकांचे पाय जमिनीवर असतात आणि त्यांना सगळं ठाऊक असतं. दर पाच वर्षांनी त्यांना लोकांना सामोरं जायचं असतं. आम्ही तर आयुष्यात एकदाच सनदी परीक्षा देतो. मी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांबरोबर काम केलं आहे; पण त्यांना योग्य-अयोग्य समजून सांगताना मला कधीही अडचण आली नाही. चुकीच्या गोष्टी करायला मला कोणी भाग पाडलं नाही. वादंग उद्भवणार नाही, अशा पद्धतीने आपला मुद्दा ठामपणे मांडता आला, तरी तेवढं पुरेसं असतं!
केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या सचिवांशी अनौपचारिक बैठका कशा सुरू झाल्या?
२०१४ मध्ये सूत्रं हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सचिव पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या पाक्षिक बैठका घ्यायला त्यांनी सुरुवात केली. कामाचं स्वरूप अधिक चांगल्या रीतीने समजावं, हा हेतू त्यामागे होता. पंतप्रधानांना बऱ्याच गोष्टींची माहिती असते. ते अत्यंत अनुभवी आहेत. तुम्ही काय म्हणता, याकडे ते नीट लक्ष देतात. परिणामी वेगवेगळ्या कल्पना, माहिती घेऊन लोक येतात, त्यावर या बैठकात चर्चा होऊ शकते. आम्हा सर्वांसाठी एकत्र येऊन चर्चा करण्याची ही उत्तम संधी होती, हे नक्की!