वेग

By admin | Published: August 22, 2016 06:16 AM2016-08-22T06:16:22+5:302016-08-22T06:16:22+5:30

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते.

Speed | वेग

वेग

Next


मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते. वास्तवातील उच्च प्रतीची कंपने तुम्हाला मनापर्यंत नेतात. अतिशय कमी कंपनातील मन वास्तव व्यवहाराचं दर्शन घडवतं. मन आणि वास्तवावर स्वामी विवेकानंद बोलताना हा भेद स्पष्ट करतात. ते मनच असते जे आपलं शरीर घडवते. शरीर असणे आणि घडविणे यात फरक आहे. म्हणून मनावर संस्कार करायचे. म्हणून विशेषत: मुलांबाबत वागताना त्यांच्या आणि आपल्या मनाचा विचार करावा लागतो. त्यात परिस्थिती महत्त्वाची, भवताल महत्त्वाचा.
काळ बदलला तसा माणसांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी मैदानी खेळ महत्त्वाचे वाटत. त्यात फक्त शरीर कमावणे एवढाच उद्देश नव्हता. मनही स्वच्छ प्रसन्न शुभ्र घडविणे महत्त्वाचे होते. सांघिक भावना महत्त्वाची होती. हे खेळ कमी झाले. आता ते आॅलिम्पिकमध्येच बघायचे आणि इतर देशांतील खेळाडूंना पदके मिळाली तर चुकचुकायचे एवढेच आपल्या हातात. एखाद्या सिंधूने मुसंडी मारली तर नाचायचे. जयजयकार करायचा. पण अशा सिंधू एवढ्या विशाल भारतात बिंदू होत आहेत हे मान्य करायला हवंय. आपल्याला अजून अंगण आहे. पण तेही हरवत चाललं आहे. मैदानं अतिक्रमित होत आहेत. बिल्डर, दलाल, माफिया यांनी देशाचं बांधकाम गिळंकृत केलं आहे. आपणही अतिक्रमणात राहू लागलो, पूररेषेत घरं बांधून नद्यांना गॅलरीतून बघू लागलो. पण कधीतरी महापूर येणारच, घरांची नासधूस होणारच. निसर्ग जसजसा आवळला जातो तसतसा तो कधीतरी उद्दाम होतोच. आपल्या जगण्याचा वेग आणि मोकळ्या हवेचा, आरोग्याचा विचार यांचं गणित जमवताना आयुष्य ओढलं जातंय हे आपल्या कधी लक्षात येणार?
प्रगती झाली आणि संध्याकाळचा परवचा आणि शुभंकरोती इतिहासजमा झाले. परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची दोन मुले टीव्हीवर गेम खेळत होती. मुलगा हातातल्या रिमोटवर बटनं दाबून प्रचंड वेगाने गाडी चालवत होता. इतर गाड्यांना धडाड धडकत होता. झाडाला ढुशा मारीत होता. रेलिंग तोडत होता. आई आणि इतर टाळ्या वाजवीत होते. जेवढे जास्त अपघात तो करेल तेवढा तो पराक्रमी, शूर. मी सहज विचारले, कारे खरी गाडी अशीच चालवशील? त्याने माझ्याकडे ढुंकून न बघता अजून जोरात चालवीन असं फुशारकीने सांगितलं. गुन्हे करण्याची सवय लावणारे खेळ खेळत आपण मोठे होणार आणि ती मुले रस्त्याने कसरत करीत बाइक चालवणार.
वास्तवाच्या वेगाने पछाडलेल्या आपणाला मनाचा वेग आवरा हे म्हणण्याचा काय अधिकार. बेफाम हा आयुष्याचा मंत्र होत असताना मनाला आवरा, हे बैलगाडीत बसल्यासारखेच होणार. बैल तर कधीच कत्तलखान्यात गेलेत आणि आपले ब्रेक फेल झालेत.
-किशोर पाठक

Web Title: Speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.