आता तरी बीटी घालवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:46 PM2017-10-08T23:46:18+5:302017-10-08T23:46:34+5:30
गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.
गत काही दिवसांपासून विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतकरी वा शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातही आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले आहेत. विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांची संख्या तर कितीतरी पट अधिक आहे. एका अर्थाने हे सगळे बीटी कपाशीचे बळी आहेत. कपाशीचे सर्वाधिक नुकसान करणाºया बोंडअळीला प्रतिबंध करणारे बियाणे म्हणून बीटी कपाशीची प्रचंड भलावण केल्या गेली. प्रारंभीच्या काळात बीटी बियाण्यांमुळे शेतकºयांचा कीटकनाशकांवरील खर्च कमी झालाही; पण लवकरच बीटी कपाशीवरही बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसू लागला. त्यामुळे पुन्हा एकदा कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली. यावर्षी तर प्रतिकूल पर्जन्यमान व हवामानामुळे बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. परिणामी मनाई असलेल्या व अपवादात्मक स्थितीत वापरावयाच्या अतिजहाल कीटकनाशकांची बेसुमार फवारणी झाली आणि त्याचाच परिपाक मोठ्या प्रमाणातील मृत्यूंच्या रूपाने समोर आला आहे. वास्तविक बीटी कपाशीचे भारतात आगमन झाले त्यावेळीच डॉ. वंदना शिवांसारख्या पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध केला होता; परंतु त्यांना कुणी जुमानले नाही. बीटी कपाशी बियाणे अपयशी सिद्ध झाल्याची कबुली, ते बियाणे भारतात आणणाºया बहुराष्ट्रीय कंपनीने २०१० मध्येच दिली होती. गुलाबी बोंडअळीने स्वत:मध्ये बीटी प्रतिबंधक क्षमता विकसित केल्याचे सदर कंपनीने आनुवंशिक अभियांत्रिकी मान्यता समिती म्हणजेच जीईएसीला अधिकृतरीत्या कळविले होते. बीटी बियाण्याच्या अपयशाचा दृश्य परिणाम हा आहे, की २००६ च्या तुलनेत २०१३ मध्ये कीटकनाशकांचा वापर जवळपास तिप्पट झाला होता. उपलब्ध आकडेवारीनुसार २००६ मध्ये देशात एकूण ४६०० मेट्रिक टन कीटकनाशकांचा वापर झाला, तर २०१३ मध्ये तो ११५९८ मेट्रिक टनांवर पोहचला. बीटी कपाशीचे अपयश सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की गत काही वर्षात राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा बनलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्येही बीटी कपाशीची भूमिका आहे. उपलब्ध आकडेवारी व वस्तुस्थितीचे विश्लेषण असे दाखविते, की ज्या भागात बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्याच भागांमध्येच मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, सरकारने आता तरी या जीवघेण्या बियाण्यांवर अविलंब बंदी लादावी!