आध्यात्मिक अनुभवाची शिदोरी उज्जैन कुंभमेळा!

By Admin | Published: April 17, 2016 02:22 AM2016-04-17T02:22:03+5:302016-04-17T02:22:03+5:30

उज्जैन येथे येत्या २२ एप्रिलपासून महिनाभर कुंभमेळा सुरू होणार आहे. या निमित्ताने उज्जैन नगरीत साधू, महंतांचे आगमन झाले आहे. इथले वातावरण आध्यात्मिक झाले आहे

Spiritual experience Shidori Ujjain Kumbh Mela! | आध्यात्मिक अनुभवाची शिदोरी उज्जैन कुंभमेळा!

आध्यात्मिक अनुभवाची शिदोरी उज्जैन कुंभमेळा!

googlenewsNext

प्रासंगिक : सुमेधा उपाध्ये

उज्जैन येथे येत्या २२ एप्रिलपासून महिनाभर कुंभमेळा सुरू होणार आहे. या निमित्ताने उज्जैन नगरीत साधू, महंतांचे आगमन झाले आहे. इथले वातावरण आध्यात्मिक झाले आहे. याच वातावरणाचा घेतलेला हा भक्तिमय वेध...

अनेकदा कुंभमेळ्यासंदर्भात, त्यातील साधूंबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. चांगले आणि वाईट हे दोघेही हातात हात घालून वषार्नुवर्ष चालले आहेत. समाजात ज्या अपप्रवृत्ती दिसतात त्याचा प्रत्येय कुंभतही येत असावा पण त्यावरून आपण कुंभमेळाच नको असं म्हणू शकत नाही. यातील असंख्य महात्मे कुंभमेळा झाला की आपल्या दृष्टीसही पडत नाहीत. त्यांना प्रसिध्दी आणि पैसा हवा असता तर ते व्यवहारी जगातील गणित सोडवत इथंच राहिले असते. पण तसं होत नाही.

उज्जैन नगरी सध्या साधू-महात्मे यांच्या आगमनाने फुलली आहे. वर्षानुवर्षे तपश्चर्येत मग्न असणारे हे महात्मे दर बारा वर्षांनी सार्वजनिक जीवनात येतात. संसारी व्यक्तिंशी यांची गाठभेट होते. कुंभमेळा संपला की, पुन्हा सारे आपापल्या स्थानी जातात. या सर्वांची पुन्हा भेट सहसा होत नाही. कारण आपापली स्थानं सोडून ही मंडळी संसारी माणसांच्या संपर्कात फारशी येत नाहीत. म्हणून त्यांना भेटण्याच्या ओढीनं उज्जैन कुंभमेळ्याची वाट धरली आणि दोन आखाड्यांच्या पेशवाईतही आम्ही सहभागी झालो. महाराष्ट्रातील दत्तसेना पीर योगी दयानाथजींच्या आशीर्वादाने त्यांच्याबरोबरच या कुंभमेळ्यासाठी आलेल्या अनेक साधू महात्म्यांच्या भेटीला गेली. लांबसडक जटा, रुद्राक्ष आणि तेजस्वी डोळे ही तपस्वी साधूंची ओळख. वयाचा अंदाज येणार नाही. तपश्चर्येच्या तेजामुळे खरे वय कळत नाही, पण साधारणत: १०० ते १३० च्या दरम्यान वयोमान असलेले अनेक महात्मे पहायला मिळाले. भोलागिरीजी महाराजांची तपश्चर्या तर अगदी आश्चर्य वाटण्याजोगी!
गेली ४५ वर्ष त्यांचा एक हात वरच आहे. उर्ध्वबाहू तपश्चर्या त्यांनी केली आहे. आपण मुंबईतल्या लोकलमध्ये एक हात वर धरून पाच मिनिटे उभं राहिलो, तरीही आपला हात भरून येतो, हाताला रग लागते. इथे तर वर्षानुवर्ष हात वर आणि केवळ हाताची नखं वाढत जातात. दुसरे महात्मे गेली कित्येक वर्षे एका पायावरच उभे आहेत. अशा अनेक हटयोगींची इथं भेट झाली, पण प्रत्येकातील विनम्रता वाखाणण्यासारखी. अहंकाराचा लवलेशही नाही. प्रत्येक तंबूत जलपान आणि चहानं स्वागत ठरलेलं. जेवणाच्या वेळी गेलो तर प्रसाद नक्की मिळतोच. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदभाव इथं नाही. आत्मभाव महत्त्वाचा. आदरातिथ्य या साधूंकडून शिकावं. बरं हे सर्व होत असताना अनेक जण त्यांना नमस्कार करताना दहा पाच रुपये समोर ठेवतात. आपल्याला सवय झालीय पैसे द्या आणि सर्व इच्छापूर्तीचा आशीर्वाद मागायचा. मात्र, ही मंडळी त्या पैशाला न मोजताच त्यांच्या इथं सेवा करणाऱ्याला ते उचलून देतात ते पैसे मोजण्याचेही कष्ट घेत नाहीत. व्यवहारी जगात इतक्या सहजतेनं पैसे न मोजताच आपण कुणाला दिलेयत असं उदाहरण पाहण्यात नाही. राहणीमान तर इतके साधे की, आपण कधी विचारच केलेला नाही. एक तंबू आणि धुना बस. उज्जैन नगरीत डासांची संख्या जास्तच वाढलीय, पण ज्या-ज्या ठिकाणी धुना होती, तिथं डासांची फिरकायची हिंमत नव्हती.
एक वेगळं विश्व या महात्म्यांचं आहे. केवळ परमात्म्याच्या चिंतनात लीन असलेले हे सर्व महात्मे कुंभमेळ्याला येतात आणि पेशवाईच्या वेळी नगरीत प्रवेश करतात. हा थाट मात्र अवर्णनीय आहे. प्रत्येक आखाड्याचं वैशिष्ट्य आहे. आवाहन आखाडा आणि निरंजनी आखाडा या दोघांच्या पेशवाई अगदी त्यांच्यात सहभागी होऊन अनुभवता आल्या. पेशवाई म्हणजे थोडक्यात साधू महात्म्यांचेही शक्तिप्रदर्शनच असते. यात हत्ती, घोडे, उंट, रथ, बँड, भक्तिगीतांच्या तालावर थिरकणारी पावलं आणि नागासाधूंचे हटयोगाचे प्रयोग सारेच आश्चर्यजनक. निरंजनी आखाडाचे प्रमुख नरेंद्रगिरीजी महाराज सद्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या पेशवाईचा थाट जरा मोठाच होता. शक्तिप्रदर्शनात कुठेही कमतरता ठेवली नव्हती. अगदी विमानातून पुष्पवृष्टीही करण्यात आली. त्यातली चार फुलं आमच्याही अंगावर पडल्यानं आम्हीही कृतार्थ झालो. एरवी आमच्यावर कोण पुष्प उधळणार? दिसायला आपल्यासारखे सर्वसामान्य वाटतात, पण या महात्म्यांना एवढी तपश्चर्या करण्याचं बळ कोण देत असावं, हा विचार डोक्यात पिंगा घालत राहतो. या सृष्टीतील अनेक गूढ-गुपीत अजून उकललेली नाहीत, हे सत्य आहे.
भारतीय संस्कृतीत अनेक परंपरांना पुराणकथांची जोड आहे. समुद्र मंथनातून पडलेल्या अमृत थेंबांचा आणि सध्याच्या नद्यांचं पावित्र्य या संदर्भात अनेकांच्या मनात शंकाकुशंका येतात. तेव्हा पडलेले थेंब नक्कीच आत्ता नसतीलही, पण आपल्या संस्कृतीला हजारो वर्ष झाली, ती आजही टिकून आहे, ती केवळ या परंपरा जपणाऱ्यांमुळेच. प्रत्येक परंपरेचं महात्म्य जाणून ते टिकवणे आवश्यक आहे. या कुंभमेळ्यात अनेक परदेशी नागरिक पाहायला मिळाले. त्यांना भारतीय संस्कृतीचं आकर्षण आहे. ते हे सर्व शिकण्यासाठी स्वत:चा देश सोडून इथं येताहेत. आत्मीयतेनं सारे शिकण्याचा प्रयत्न करताहेत. आपण मात्र याकडे पाठ फिरवतोय. या तंबूत अनेक महात्मे उच्च विद्याविभूषित असल्याचं समजलं. अत्याधुनिक साधन सहजतेने वापरतात. व्यवहारी जगातील मोठमोठ्या पदव्या घेतलेल्या असतानाही ते परमेश्वराचरणी लीन आहेत. सुट्टीमध्ये आपण पर्यटनस्थळी जातो, तसेच एकदा तरी अशा धार्मिक परंपरांच्या उत्सवालाही भेट दिली, तर खरे-खोटे काय हे अनुभव मिळू शकतात. अनेकदा विनोदानं असं म्हटलं जातं, कुंभमेळा म्हणजे माणसं हरवण्याचं ठिकाण. मात्र, मला आध्यात्मिक शक्तीचं वरदान लाभलेली माणसं याच कुंभमेळ्यात गवसली.

Web Title: Spiritual experience Shidori Ujjain Kumbh Mela!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.