अध्यात्म - क्षणोक्षणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:22 AM2017-11-29T00:22:54+5:302017-11-29T00:25:28+5:30
पाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो.
- डॉ. गोविंद काळे
पाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो. काल मात्र चिमण्यांच्या चिवचिवटापेक्षा कावळ्यांची काव काव अधिक तीव्रपणे ऐकायला येत होती. १०-२० कावळे एका ठिकाणी दिसत होते. काही चोचा मारत होते तर काही उडून पुन्हा पुन्हा येत होते. माझ्या काठीच्या आवाजाने कावळे पळाले. पाहतो तर काय? गतप्राण झालेले चिमणीचे पिलू. बाजूची माती काढून लहानसा खळगा तयार केला. पिलाला पुरले. वरती एक दगड ठेवला आणि रस्त्याला लागलो. रे.ना.वा. टिळकांची कविता आठवली ‘क्षणोक्षणी पडे उठे परि बळे’
‘क्षणोक्षणी’ शब्दाने मला जागे केले. फुकट गेलेल्या क्षणांचा हिशेब मांडू लागलो तेव्हा लक्षात आले- सारे आयुष्यच फुकट गेले. प्रत्येक क्षण मातिमोलच झाला. ही निराशा नव्हे; पण खरेच, सांगावे असे काय आहे आपुल्या आयुष्यात. ‘क्षणत्यागे कुतो विद्या?’ डिग्री म्हणजे विद्या नव्हे याचा साक्षात्कार झाला. माणसाचा जन्म मिळूनही जिणे मात्र कवडीमोलाचे आपण जगतो. जीवनाचा अर्थ कळत नाही. तरुण वयात गीता, भागवत हातात घेण्याची बुद्धी झाली नाही. आता भागवत रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘सोन्यापेक्षाही क्षण अधिक मूल्यवान समजेल तो साधू. ज्याला वेळेची किंमत नसते त्याला अंतकाळी खूप पश्चात्ताप होतो.’ एका मेलेल्या चिमणीच्या पिलाने मला स्वप्नातून जागे केले होते. मानवी जीवनातील क्षणाचे महत्त्व कळून आले. सावंतांचा पांडुरंग सांगत नव्हता का, बोलता बोलता त्याच्या बाबांनी क्षणात प्राण सोडले. ना आजारपण ना डॉक्टर. क्षणार्धात खेळ खलास. हा क्षण जीवनाच्या अनेक कंगोºयांचे दर्शन घडवितो. तोच तर साक्षीभूत होऊन राहतो. क्षणाचे महत्त्व ओळखता आले पाहिजे. ‘‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणाचा’’ प्रेमाचा एक क्षण अनुभवण्यासाठी मरणाचा वर्षाव पत्करणा-या त्या प्रेमिकालाही क्षणाचे महत्त्व जाणवते हे विशेष. संत तुकोबांनी क्षणाची महती सांगून सर्वांनाच सावधान केले आहे.
क्षणाक्षणा हाचि करावा विचार
तरावया पार भवसिंधु
नाशिवंत देव जाणार सकळ
आयुष्य खातो काळ सावधान
क्षणाक्षणाचा विचार म्हणजेच
तर अध्यात्म.