अध्यात्म - शीखपंथाचे आद्य धर्मगुरू गुरुनानकदेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 06:00 AM2018-10-06T06:00:44+5:302018-10-06T06:02:15+5:30
शोधबोध
प्रा. अरुण ब. मैड
शीख पंथाचे पहिले धर्मगुरू नानकदेव यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील पंजाबात तळवंडी या गावात झाला. तळवंडी हे गाव आजच्या पाकिस्तानात लाहोरपासून ६० किमी अंतरावर असून ‘नानकाना साहेब’ या नावाने हे ठिकाण ओळखले जाते. नानकदेव यांचा जन्म १५ एप्रिल रोजी झाला, असे मानतात. नानकदेवांच्या वडिलांचे नाव काळूचंद ऊर्फ कल्याणराय असे होते, तर आईचे नाव त्रिपताका असे होते. अयोध्यानरेश दाशरथी रामाचा पुत्र लव हा नानकदेवांच्या कुळाचा आदिपुरुष होता, असे त्यांचे मत होते. त्यांचे पूर्वज हे काशी येथे जाऊन वेदसंपन्न होऊन आले, तेव्हापासून त्यांचे कुलनाम ‘वेदी’ असे पडले. बालपणीच नानकदेव इतर मुलांसमवेत खेळण्यापेक्षा एकटेच कुठेतरी झाडाखाली जाऊन शांत बसत, नाहीतर साधुसंतांच्या सहवासात जाऊन त्यांचे विचार ऐकत. अन्नपाण्याच्या बाबतीतही ते फार उदासीन होते. पंडित गोपाळ पांडे त्यांचे शिक्षक होते. वडील कल्याणराय राजदरबारचे पटवारी होते. त्यामुळे त्यांच्या एकुलत्या एक मुलाला शिक्षक घरी येऊन शिकवीत असत. गणित, हिंदी, उर्दू, पारशी या विषयांचा ते अभ्यास घेत. परंतु, नानकदेवांना हे शिक्षण निरर्थक, कुचकामी वाटे. त्यांचा ओढा धार्मिक ग्रंथांकडे असे. वेद, कुराण त्यांनी बालवयातच समजून घेतले. वडिलांनी नानकदेवांना व्यापार ‘सच्चा सौदा’ कर म्हणून सांगितले व २० रुपये भांडवल म्हणून दिले. नानकदेवांनी ते २० रुपये रस्त्यात भेटलेल्या फकिरांना पोटभर भोजन देऊन संपवले व घरी येऊन वडिलांना मी कसा ‘सच्चा सौदा’ केला, हे सांगितले. वैतागलेल्या वडिलांनी ‘तू गायी वळण्याच्या योग्यतेचा आहेस’, म्हणून गायी वळण्यास पाठवले. परंतु, तेथील मुलांना, गोपाळांना एकत्र करून ते हरिकथा सांगत. वडिलांनी त्यांचे उपनयन करण्याचे ठरवले. तेव्हा उपनयन हा विधी निरर्थक आहे, असे सांगून तो संस्कार करून घेण्याचे टाळले.
पंडित व्रजनाथ शर्मा यांच्याकडे ते संस्कृत शिकू लागले. पंडितजींना त्यांनी ‘ओम नम: सिद्धम’ या मंत्राचा अर्थ विचारला तेव्हा त्यांना तो समाधानकारक सांगता आला नाही. तेव्हा शिष्यानेच त्यांना मंत्राचे विवरण सांगितले. गुरुजींनी थक्क होऊन नानकदेवांच्या पुढे हात जोडले. वडिलांनी शेवटचा उपाय म्हणून त्यांचा विवाह लावून दिला. नानकदेवांना ‘आधी प्रपंच करावा नेटका’ हे तत्त्व मान्य होते. बटाला येथील मूलचंद खत्री यांची मुलगी सुलखनी ही नानकदेवांची पत्नी झाली. या युगुलास पुढे श्रीचंद व लक्ष्मीचंद असे दोन पुत्र झाले. कल्याणराय यांनी मुलाच्या काळजीपोटी मुलगी नानकी व जावई जयराम यांच्या ओळखीने सुलताजपूर येथे सरकारी मोदीखाना धान्यकोठीवर प्रमुख म्हणून नोकरी मिळवून दिली. परंतु, त्यातही त्यांचे मन फारसे रमले नाही. हळूहळू ते सर्व सांसारिक व्यवहारातून अलिप्त होत गेले.
त्यांच्या तळवंडी गावाजवळून एक ओढा वाहत होता. नानकदेव दररोज ओढ्यावर स्नानासाठी जात असत. एक दिवस जवळच असलेल्या एका गुहेत ते ध्यान लावून बसले असता तीन दिवस त्यांची समाधी लागली. घरातील मंडळींनी शोध घेतल्यानंतर नानकदेव ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज त्यांनी बांधला. नानकदेवांना तीन दिवसांच्या चिंतनात समाधी अवस्था प्राप्त झाली आणि परमेश्वराचा साक्षात्कार झाला. जगातली, समाजातली दु:खे, अज्ञान दूर करण्याचा आदेश त्यांना मिळाला होता, त्यानुसार गुहेतून बाहेर पडताच ईश्वरी संदेश सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. प्रवचनातून त्यांचा एकच संदेश होता, ‘कुणीही हिंदू नाही, कुणीही मुसलमान नाही. सर्वच त्या एका ईश्वराची लेकरे आहेत.’ पुढील पाच तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. १) नाम व गान- ईश्वराच्या नामाचा जप करून गुणगान करणे, २. दान - आपल्या कमाईतून काही भाग दान करणे, ३. अश्नान-स्रान - दररोज स्रान करून शुचिर्भूत होणे आवश्यक आहे, ४. सेवा - परमेश्वर व मानव यांची सेवा करणे, ५. सिमरन -(स्मरण) आत्मसाक्षात्कार ईश्वराची कृपा होण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण व प्रार्थना करणे आवश्यक आहे. ही तत्त्वे त्यांनी आपल्या पंथाच्या प्रचारार्थ सांगितली व त्यानंतर नानकदेव घरदार सोडून सद्धर्माच्या प्रसारार्थ बाहेर पडले.
इ.स. १४४७ मध्ये त्यांना झालेल्या साक्षात्कारानंतर त्यांनी हिंदुस्थानात व आसपासच्या देशांत यात्रा केल्या. पुढील आयुष्यात त्यांनी २४ वर्षे तीर्थयात्रा केल्या. या यात्रांच्या दरम्यान त्यांनी विविध धर्मांच्या अधिकारी व्यक्तींशी धार्मिक चर्चा केली. दुष्ट रुढी, अंधश्रद्धा मानव समाजाचा कसा घात करत आहेत, हे पटवून दिले. त्यांच्या धर्मातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा परिचय करून घेतला. १. नानकदेवांनी इ.स. १४९७ ते १५०९ मध्ये आताच्या बांगलादेशमार्गे ब्रह्मदेशपर्यंत यात्रा केली. २. त्यांनी दुसरी यात्रा दक्षिण भारत पार करून श्रीलंकेपर्यंत केली. ही यात्रा इ.स. १५१० ते १५१५ मध्ये केली. ३) नानकदेवांची तिसरी यात्रा इ.स. १५१५ ते १५१७ मध्ये हिमालयमार्गे तिबेटपर्यंत केली. काही इतिहासकारांच्या मते ते चीनपर्यंत गेले होते. ४) चौथी यात्रा मध्यपूर्वेच्या देशापर्यंत केली होती. या यात्रेत ते इराण, इराक, मक्का, मदिना, बगदाद, आजच्या अफगाणिस्तानमार्गे केली. जाताना गुजरातेतील लखटकाबंदरातून त्यांनी मक्केला प्रयाण केल्याचे सांगतात. आज शुष्क झालेल्या लखटकाबंदराजवळ नानकदेवांच्या स्मृत्यर्थ एक गुरुद्वारा उभारलेला आहे व त्यात अनेक वस्तू जपून ठेवल्या आहेत.
नानकदेवांबद्दल अनेक आख्यायिका आजही पंजाबात सांगितल्या जातात. लाहोरमधील धनोचंद व्यापाऱ्याने नानकजींना घरी भोजनासाठी बोलावले. गावातल्या प्रतिष्ठितांनाही निमंत्रण दिले. स्वागतासाठी दारासमोर विविध रंगांचे शेकडो झेंडे उभारले. नानकदेव येताच त्यांना हे झेंडे पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी कुणाकडे तरी चौकशी करताच कळले की, ‘एक झेंड्याचे मोल एक लाख रुपये आहे, याप्रमाणे जितके झेंडे तितके लाख रुपये धनीरामच्या तिजोरीत आहेत.’ धनीराम स्वागताला पुढे येताच नानकदेवांनी धनीरामाच्या हातावर सुई ठेवली व सांगितले, पुढच्या जन्मी पुन्हा भेटशील तेव्हा मला ही सुई परत कर.
‘धनीराम म्हणाला, गुरुदेव हे कसं शक्य आहे? स्वर्गात जाताना मी ही सुई कशी काय सोबत नेणार? तेव्हा नानकदेव म्हणाले, ही संपत्ती जशी तू स्वर्गात नेणार आहेस, तशीच सुई पण घेऊन जा. धनीचंद काय समजायचे ते समजला. त्या दिवसापासून त्याने मोठ्या प्रमाणात संपत्तीचे वाटप सुरू केले.
वडिलांनी व्यापारासाठी २० रुपये दिले. त्यातून नानकदेवांनी ‘सच्चा सौदा केला’ ते २० रुपये गोरगरिबांना भोजन देऊन संपवले. त्यानंतर, शीख पंथात ‘लंगर’ची व्यवस्था सुरू झाली. प्रत्येक गुरुद्वारात लंगर असतो. गुरूंचा प्रसाद म्हणून सर्वजण गुरुद्वारात भोजन करतात. शिखांच्या या पहिल्या गुरूंचे २२ सप्टेंबर १५३९ रोजी महानिर्वाण झाले.
‘कुणीही हिंदू नाही, कुणीही मुसलमान नाही. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत’, ही धर्मशिकवण देणारे शीखपंथीयांचे पहिले धर्मगुरू म्हणजे गुरुनानकदेव. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे गुरुनानकांच्या असामान्य गुणांचे दर्शन बालपणापासूनच घडत होते. शैक्षणिक अभ्यासक्रम निरर्थक, कुचकामी वाटणाºया नानकदेवांचा ओढा धार्मिक ग्रंथांक डे होता. नोकरी, प्रपंच या सगळ्यात फार न रमता नानकदेवांनी सद्धर्माच्या प्रसारासाठी घर सोडले. भारतासह आसपासच्या देशांत २४ वर्षे तीर्थयात्रा करत त्यांनी धर्माचा प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. ईश्वरनामाचा जप व गुणगान करणे, दान करणे, दररोज स्रान करणे, परमेश्वर आणि मानवाची सेवा करणे आणि ईश्वरनामाचे स्मरण करणे, ही पाच तत्त्वे सांगितली. शिखांच्या या पहिल्या गुरूंचे २२ सप्टेंबर १५३९ रोजी महानिर्वाण झाले.