थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

By रवी टाले | Published: November 14, 2018 06:59 PM2018-11-14T18:59:38+5:302018-11-14T19:02:46+5:30

स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळतात.

Spit is our birthright! | थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा तर भारतीयांना जणू काही आजारच जडलेला आहे.जे तंबाखू, गुटखा, खर्रा, पान खातात त्यांना तर कुठेही पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळालेला असतो.जे उपरोल्लेखित पदार्थांचे सेवन करीत नाहीत अशाही अनेकांना ऊठसूठ कुठेही थुंकण्याची सवय असते.

नकारात्मक बातम्यांच्या धबधब्यात मध्येच एखादी खूप छान बातमी वाचण्यात येते. दुर्दैवाने अनेकदा प्रसारमाध्यमेही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा उचित स्थान देत नाहीत. अनेकदा उचित स्थान न मिळाल्यामुळे सर्वसामान्य वाचकांचेही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष होते. पुणे महापालिकेने गत आठ दिवसात रस्त्यांवर थुंकणाऱ्या १६० जणांना दंड ठोठावला आणि एवढेच नव्हे तर त्यांना त्यांनी केलेली घाण साफ करायला लावली, ही अशीच एक बातमी! पुणे महापालिकेने त्यासाठी १६ पथके गठित केली आहेत. ही कारवाई किती सातत्यपूर्ण रीतीने होते आणि पुणेकरांमध्ये त्यामुळे किती सुधारणा होते, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल; पण सर्वच पालिकांनी या बाबतीत पुणे पालिकेचा कित्ता गिरविणे खूप गरजेचे आहे.
स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळतात. ज्यांना परदेश गमनाची संधी मिळते ते तर मायदेशी परतल्यानंतर तेथील स्वच्छता आठवून उसासे सोडतातच; पण ज्यांना तशी संधी मिळत नाही तेदेखील चित्रपटांमध्ये किंवा दूरचित्रवाणीवर परदेशातील प्रसंग बघून आमचा देश असा स्वच्छ का नाही, म्हणून हळहळतात! दुर्दैवाने बहुतेकांचे उसासे आणि हळहळणे तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. उसासे सोडून किंवा हळहळून झाल्यावर लगेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविताना त्यांना त्याची आठवणही नसते!
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा तर भारतीयांना जणू काही आजारच जडलेला आहे. जे तंबाखू, गुटखा, खर्रा, पान खातात त्यांना तर कुठेही पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळालेला असतो; पण जे उपरोल्लेखित पदार्थांचे सेवन करीत नाहीत अशाही अनेकांना ऊठसूठ कुठेही थुंकण्याची सवय असते. पिंक टाकणाºयांकडे तुच्छ नजरेने बघणारे अनेक उच्चभ्रू तोंडातील च्युर्इंग गम कुठेही थुंकतात, तेव्हा कुठेही थुंकणाºया ‘डाऊन मार्केट’ लोकांपेक्षा आपणही काही कमी नाही, याची जाणीवही त्यांना नसते!
काही दिवसांपूर्वी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका खासदारांनी भारत हा थुंकणारा देश आहे, या शब्दात संपूर्ण देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते. ते म्हणाले होते, ‘‘आम्हाला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आम्ही थुंकतो, आम्ही थकतो तेव्हा आम्ही थुंकतो आणि हे असंच सुरू असतं.’’ त्या खासदार महोदयांनी कोणत्याही प्रकारे अतिशयोक्ती केलेली नव्हती. खरोखरच काहीही कारण नसताना नाहक थुंकणारे अनेक लोक आपण रोज आपल्या अवतीभोवती बघत असतो. खेदाची बाब ही आहे, की तसे करताना आपण काही चूक करतोय, हे त्यांच्या गावीही नसते. त्यांच्या अशा वर्तणुकीवर कुणी आपत्ती प्रकट केलीच, तर आपत्ती प्रकट करणारा कुणी परग्रहवासी आहे की काय, अशा प्रकारचे भाव चेहºयावर आणत निर्लज्जासारखे हसून मोकळे होतात. अशा वेळी एखाद्याने पोलिसांकडे तक्रार करायचा विचार केल्यास, पोलीसच त्याची खिल्ली उडवण्यास मागेपुढे बघणार नाहीत आणि स्वत:च पिंक टाकून अशा तक्रारीचा कसा काहीही उपयोग होत नाही, हे समजावून सांगायला लागतील!
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणल्यास वाट्टेल तिथे थुंकण्याच्या भारतीयांच्या सवयीला बराच आळा बसू शकतो, असे अनेकदा सुचविण्यात येते; मात्र अशा प्रकारे बंदी आणून कोणत्याही पदार्थाच्या सेवनास अटकाव केला जाऊ शकत नाही, हा अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे. गुटखा या तंबाखूजन्य पदार्थाचेच उदाहरण घ्या! काय फायदा झाला गुटख्यावर बंदी आणून? उलट माफियांमध्ये गुटखा माफिया ही नवी जमात उदयास आली. दुसरी गोष्ट म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवरील करांमधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने सरकारी पातळीवर अशी बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतला जाण्याची सुतराम शक्यता नाही. तंबाखू हे एक नगदी पीक आहे. अफूप्रमाणे तंबाखूच्या शेतीवर बंदी आणल्यास मोठ्या संख्येतील शेतकºयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय बºयाच औषधींमध्ये उपयोगी रसायन म्हणून तंबाखूचा वापर होतो. त्यामुळे तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी आणणे हा उपाय ठरू शकत नाही.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेप्रमाणे दंडात्मक कारवाई करणे आणि जनजागृती घडवून आणणे हे दोनच उपाय व्यवहार्य दिसतात. दंडात्मक कारवाईमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या कर्मचाºयांना आणखी एक कुरण उपलब्ध होईल हे खरे; पण किमान सार्वजनिक ठिकाणी तरी थुंकण्यास काही प्रमाणात का होईना अटकाव निश्चितच होईल. भावी पिढ्यांमध्ये जागृती घडवून आणण्याचे लाभ दृष्टीस पडण्यास वेळ लागेल; पण तो लाभ कायमस्वरूपी ठरेल. हल्ली सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत शाळकरी मुलांमध्ये बरीच जागृती दिसून येते. जोडीला तंबाखूचे दुष्परिणाम आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीमुळे जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा कशी डागाळते, यासंदर्भात शाळकरी मुलांना जागृत केल्यास एक-दोन पिढ्यांनंतर का होईना, फरक निश्चितच दिसू लागेल!

 

Web Title: Spit is our birthright!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.