पाटीदारांमध्ये फूट?
By admin | Published: November 26, 2015 10:08 PM2015-11-26T22:08:14+5:302015-11-26T22:08:14+5:30
आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा धारण केलेल्या गुजरात राज्यातील पटेल (पाटीदार) समाजात फूट पाडण्याचे त्या राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत
आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा धारण केलेल्या गुजरात राज्यातील पटेल (पाटीदार) समाजात फूट पाडण्याचे त्या राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल स्वत: त्याच समाजाच्या असल्या तरी त्यांनी आपले सरकार पाटीदारांची आरक्षणाची मागणी मुळीच मान्य करणार नसल्याचे अत्यंत नि:संदिग्धपणे याच आठवड्यात सांगून टाकले. त्यांच्या या निर्णयाची अत्यंत कडवट प्रतिक्रिया त्यांना त्यांच्याच महेसाणा जिल्ह्यात बुधवारी अनुभवास आली. सध्या गुजरातेत नगरपालिकांच्या निवडणुकांचा हंगाम असून प्रचारासाठी स्वगृही गेलेल्या आनंदीबेन यांच्या पुढ्यात त्यांच्याच समाजाच्या काही स्त्री-पुरुष आंदोलकांनी निदर्शने केली व त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमारही केला. आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाला उग्र स्वरुप धारण करुन देणारा हार्दीक पटेल हा युवा नेता सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असताना काहींनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन करावे, हे विशेष. परंतु याच आंदोलनात सहभागी झालेल्या ‘सरदार पटेल ग्रुप’च्या काही नेत्यांना आनंदीबेन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आणि भाजपाला आपला सहर्ष पाठिंबा जाहीर केला. परंतु मौज म्हणजे या संघटनेचे अध्यक्ष व हार्दीक पटेलच्या अनुपस्थितीत आरक्षण आंदोलन पुढे चालविणारे नेते लालजी पटेल यांनी मात्र तत्काळ खुलासा करताना, मुख्यमंत्र्यांना भेटलेले लोक आमच्या संघटनेचे सदस्यच नसल्याचे जाहीर करुन टाकले. त्यांच्या या खुलाशावर मग लगेचच लालजी पटेल काँग्रेसचे एजंट असल्याचा प्रतिखुलासाही येऊन गेला. विशेष म्हणजे लालजी पटेल काँग्रेसचे एजंट आहेत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाच्या सदस्यांनी काँग्रेसला मतदान करावे असा प्रचार करीत आहेत असा आरोप करणाऱ्या लोकानी मुख्यमंत्री आनंदीबेन यांची भेट घेऊन तेच काम केले व भाजपाला आपला पाठिंबा जाहीर केला. पण सर्वात मोठा विनोद म्हणजे सरदार पटेल ग्रुप ही एक अराजकीय सामाजिक संघटना आहे आणि निवडणुकांशी तिचा काहीही संबंध नाही, असेही याच लोकानी जाहीर करुन टाकले. यावर लालजी पटेल यांच्या मते भाजपा पाटीदार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे व त्यांच्या या आरोपात सकृतदर्शनी तरी तथ्य आढळून येते आहे.