उत्स्फूर्त लोकजागर

By admin | Published: September 3, 2016 05:57 AM2016-09-03T05:57:03+5:302016-09-03T05:57:03+5:30

शासनाने आरंभलेल्या अवयवदान महाभियानास राज्यभरात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता निकट भविष्यात अवयवदानाची एक मोठी लोकचळवळच राज्यात

Spontaneous hobbies | उत्स्फूर्त लोकजागर

उत्स्फूर्त लोकजागर

Next

शासनाने आरंभलेल्या अवयवदान महाभियानास राज्यभरात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता निकट भविष्यात अवयवदानाची एक मोठी लोकचळवळच राज्यात उभी राहील असा विश्वास बाळगायला हरकत नाही. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी अवयवदानाचा अर्ज भरून एक आदर्श निर्माण केला. आरोग्य विभागाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे निर्माण झालेले सकारात्मक वातावरण हजारो लोकांच्या मनात नवजीवनाची आशा पल्लवीत करेल, यात शंका नाही. दान ही संकल्पना परमार्थाचे परमोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु या संदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अद्यापही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढलेली प्रचंड तफावत ही देशापुढील फार मोठी समस्या झाली आहे. या संदर्भातील आकडेवारी विचारात घेता प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने दर वर्षी देशात चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्के एवढेच आहे. दोन ते अडीच लाख किडनींची गरज असताना केवळ सात हजार लोकांचे प्रत्यारोपण होते. इतर अवयवांच्याबाबत तर परिस्थिती आणखी विदारक आहे. ५० हजार हृदयांची गरज असताना फक्त ५० हृदये मिळू शकतात. यकृताबाबत ५० हजारामागे एक हजार एवढी मोठी तफावत आहे. एकट्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत १२ हजार रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे देशात दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यु होतो. या सर्व लोकांनी अवयव दान केल्यास अवयवांची ही गरज पूर्ण होऊ शकते. पण जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेच्या अभावामुळे ते शक्य होत नाही आणि मग काळा धंदा करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मुंबईच्या एका रुग्णालयात अलीकडेच उघडकीस आलेले किडनी रॅकेट हा त्याचाच परिपाक होय. देशाच्या अनेक भागात हा गोरखधंदा सुरू आहे. आर्थिक विवंचनेपोटी अवयव विकायला काढणारे गरजू, अवयवासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार रुग्ण आणि या दोघांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणारे दलाल अन् डॉक्टर्स अशी अभद्र साखळीच मग निर्माण होते. या निराशाजनक परिस्थितीत बदल घडवून आणायचा असल्यास लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे अत्यावश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने राज्यात सुरू झालेला हा लोकजागर महत्त्वाचा असणार आहे.

Web Title: Spontaneous hobbies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.