वसंत
By admin | Published: April 6, 2017 12:10 AM2017-04-06T00:10:43+5:302017-04-06T00:10:43+5:30
संस्कृत साहित्यात वसंताचे वर्णन ठायी ठायी आले आहे. शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतुला संवत्सराचे द्वार मानले आहे.
-डॉ. रामचंद्र देखणे
संस्कृत साहित्यात वसंताचे वर्णन ठायी ठायी आले आहे. शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतुला संवत्सराचे द्वार मानले आहे.
‘‘जैसे ऋतुपतींचे हार।
वनश्री निरंतर।
वोळगे फळभार।
लावण्येशी।।’’ ज्ञाने. ३/१००
फळभाराने विनम्र झालेली वनश्री आपल्या वनशोभेच्या सौंदर्याला घेऊनच ऋतुपती वसंताच्या द्वारात स्वागताला उभी आहे, हे ज्ञानदेवांचे रूपकही किती सुंदर आहे. महाकवी कालिदास, भारवी, श्रीहर्ष, जयदेव या विदग्ध महाकवींनी वसंताला उभे करूनच आपल्या काव्यसौंदर्याला नटविले आहे. सजविले आहे. या साऱ्यांनी वसंताची ओढ आणि आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कालिदास हा तर वसंतवेडा कवी होता. ऋतुराज वसंताच्या आगमनामुळे वनश्रीच्या रंगरूपात होणारे बदल रघुवंशात कालिदासाने सूक्ष्मतेने टिपले आहेत. ‘कुसुम जन्मततो’ अशी सुरुवात करून वसंताच्या आगमनाची चाहुल कोण कोण देतात याचे आल्हादकारक वर्णन कालिदासाने केले आहे. कुमारसंभवात वसंताच्या उन्मादक सौंदर्याची किमया अत्यंत प्रभावीपणे त्याने मांडली आहे. उमेने शिवाच्या सेवेसाठी त्याच्या तपोवनात पाऊल टाकावा आणि तिथे मदनाच्या प्रभावामुळे अकालीच वसंत कसा अवतरावा आणि त्याच्या दर्शनाने तपोवनाचे ‘प्रमदवन’ कसे बनावे, याचे चित्रण कालिदासाने केले आहे. कालिदासाच्या या वसंतवर्णनात यौवनाच्या पहिल्या भरातील प्रीतीचा आवेग ओसंडून वाहत आहे. महाकवी भारवीने मंद मंद पदन्यासाने नूपुरांची रुणझुण, रसिकांच्या कानी भरणाऱ्या मदालसा रमणीच्या रूपात वसंताला पाहिले आहे. श्रीहर्षाने आपल्या ‘नैषधीय चरितात’ विरही नलाला असह्य होणारा विरहाचा वसंत कल्पकतेने चितारला आहे. वासंतिक सौंदर्याचा विरही जनांना होणारा तापही अनेक संस्कृत कवींनी व्यक्त केला आहे. जयदेवांनी गीत गोविंदात विरहाने व्याकुळ झालेल्या कृष्णप्रीतीचे हळुवार भावचित्र उभे केले आहे. कोकिळेच्या मंजूळ स्वरांनी बहरलेल्या वसंतातही कृष्णाची भेट न झाल्याने वसंतच राधेला दु:सह वाटतो आहे असे वर्णन करून जयदेवांनी वसंत आणि प्रीती यांचे दृढ नातेच सांगितले आहे आणि आंतरिक प्रीती हाच जणू उभयतांच्या मनात फुललेला वसंत आहे. याचा विरह होऊ नये म्हणून वसंतालाच पुन्हा आवाहन केले आहे. चित्रही मानवी मन, वसंत आणि प्रीती याचे नाते सांगून जाते. वसंत हा आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने पडतात. पण वसंतऋतुत पुन्हा पालवी फुटते. तसेच निराशा झटकून मानवी जीवनात चैतन्याची नवी पालवी निर्माण करणाऱ्या तसेच एकीकडे निसर्गाच्या स्वाभाविक सौंदर्याला बहरून टाकणाऱ्या तर दुसरीकडे चैतन्यरूप सौंदर्याला उजळविणाऱ्या या वसंताकडे पाहण्याची एक आगळी दृष्टी मात्र माणसाजवळ हवी.